लेख – शी जिनपिंग यांचे सैन्य शुद्धीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

गेल्या काही वर्षांत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये (पीएलए) सुरू असलेली शुद्धीकरण मोहीम ही केवळ प्रशासकीय बदल नसून तो चिनी लष्करी इतिहासातील एक मोठा भूपंप आहे. 2024 ते 2026 या कालावधीत शी जिनपिंग यांनी ज्या प्रकारे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना पदावरून हटवले आहे, ते पाहता ही मोहीम 1989 च्या तियानानमेन घटनेनंतरची सर्वात मोठी व्यापक कारवाई मानली जाते. पीएलएच्या रॉकेट फोर्सपासून ते सेंट्रल मिलिटरी कमिशनपर्यंत झालेली ही ‘नेतृत्व खात्मा’ प्रक्रिया चीनच्या आगामी लष्करी महत्त्वाकांक्षेवर, विशेषतः तैवान आक्रमणाच्या (2027) योजनेवर गंभीर परिणाम करणारी आहे.

चीनचे सैन्य म्हणजेच पीपल्स लिबरेशन आर्मी एका ऐतिहासिक संकटात सापडली आहे. 2026 च्या सुरुवातीपर्यंत हे संकट सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या (CMC) सर्वोच्च शिखरावर पोहोचले, जेव्हा CMC चे उपाध्यक्ष जनरल झांग यूशिया आणि संयुक्त कर्मचारी विभागाचे प्रमुख जनरल लियू झेनली यांची चौकशी सुरू झाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेण्यासाठी सीएमसीकडे पाहणे आवश्यक आहे. 2026 च्या सुरुवातीला चीनच्या संरक्षण धोरणाचे मार्गदर्शन करणाऱ्या या सात सदस्यीय मंडळाचे अस्तित्व जवळपास संपले होते. आता त्यात केवळ अध्यक्ष शी जिनपिंग आणि एकच सदस्य उरले आहेत.

ही ‘नेतृत्व खात्मा’ प्रक्रिया केवळ CMC पर्यंत मर्यादित नाही. या शुद्धीकरण मोहिमेचा फटका रॉकेट पर्ह्स (जे चीनच्या अण्वस्त्र आणि धोरणात्मक क्षेपणास्त्र क्षमतेचे रक्षक आहेत), नौदल, हवाई दल आणि विविध थिएटर कमांड्सनाही बसला आहे. 2023 पासून शेकडो वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्यात आले आहे किंवा ते सार्वजनिक जीवनातून गायब झाले आहेत.

अंदाजे 20 ते 25 वरिष्ठ जनरल आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पदभ्रष्ट करणे ही सामान्य बाब नाही. यामध्ये रॉकेट पर्ह्स, नौदल आणि खुद्द सीएमसीचे महत्त्वाचे सदस्य सामील आहेत. जनरल झांग यौशिया (जे शी यांचे जवळचे सहकारी मानले जात होते), लियू गुओझोंग, हे वेइदोंग आणि मिया हुवा यांसारख्या दिग्गज नेत्यांचे जाणे हे सिद्ध करते की, शी जिनपिंग यांनी ‘कोणालाही सोडणार नाही’ हे धोरण अमलात आणले आहे.

निष्कासनाची मूळ कारणे – भ्रष्टाचार की सत्तासंघर्ष?

शी जिनपिंग यांनी भ्रष्टाचाराला कारण म्हणून पुढे केले असले तरी त्यांच्या सैन्य शुद्धीकरणामागे ‘राजकीय निष्ठा’ हे मुख्य सूत्र आहे. लष्करी बढतीसाठी कोटय़वधी रुपयांची लाचखोरी, क्षेपणास्त्र खरेदीमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे आणि इंधन पुरवठ्यासारख्या संवेदनशील विषयात झालेली अफरातफर यामुळे पीएलएच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रॉकेट पर्ह्समधील मिसाईल इंधनात पाणी मिसळल्याच्या बातम्यांनी चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाच्या गुणवत्तेची पोलखोल केली आहे.

शी यांनी स्वतः नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली, जे दर्शवते की, चिनी कम्युनिस्ट पक्षात आता केवळ ‘शी’ यांना पूर्णपणे समर्पित असणाऱ्यांचीच गरज आहे. झांग यौशिया यांच्यावर झालेले ‘पार्टी अनुशासन भंगा’चे आरोप हे सूचित करतात की, पक्षात होणाऱ्या गटबाजीमुळे शी जिनपिंग यांना आपल्या सत्तेला धोका वाटू लागला होता.

या शुद्धीकरणाचा लष्करी कार्यक्षमतेवर दुहेरी परिणाम झाला आहे.एक अल्पकालीन फटका आणि दुसरे म्हणजे दीर्घकालीन अनिश्चितता.

नेतृत्वातील या पोकळीमुळे ‘कमांड चेन’ पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सीएमसीचे सातपैकी पाच सदस्य गायब होणे किंवा चौकशीच्या घेऱ्यात असणे याचा अर्थ असा की, लष्कराच्या उच्च पातळीवर निर्णय घेणारा कोणीही उरलेला नाही. त्यामुळे लॉजिस्टिक्स, खरेदी आणि दैनंदिन लष्करी ऑपरेशन्स ठप्प झाले आहेत. नवीन आणि अनुभवहीन अधिकाऱ्यांना बढती दिल्याने जुन्या अनुभवी अधिकाऱ्यांच्या ज्ञानाचा (Institutional Knowledge) अभाव निर्माण झाला आहे. लष्करी कमांड म्हणजे केवळ पद भूषवणे नव्हे, तर जटिल युद्ध परिस्थितीत काम करण्याचा अनुभव असणे होय. या शुद्धीकरणामुळे अत्यंत अनुभवी आणि युद्ध-प्रशिक्षित अधिकारी बाहेर फेकले गेले आहेत. त्यांच्या जागी येणारे तरुण किंवा कमी अनुभवी अधिकारी निर्णय प्रक्रियेत तितकेच वेगवान असतीलच असे नाही.

शी जिनपिंग यांचा असा दावा आहे की, या साफसफाईमुळे लष्कर अधिक निष्ठावान आणि ‘एकसंध’ होईल. भ्रष्टाचारमुक्त वातावरण आणि केवळ शी यांच्या आदेशाचे पालन करणारी नवीन फळी भविष्यातील युद्धासाठी (विशेषतः तैवानसाठी) अधिक प्रभावी ठरेल, असा त्यांचा होरा आहे. शुद्धीकरणाचा उद्देश लष्कराला अधिक ‘सक्षम’ बनवणे असला तरी त्याचे तत्काळ परिणाम नेतृत्वाच्या पोकळीच्या स्वरूपात दिसत आहेत.

या शुद्धीकरणाचा सर्वात मोठा धोका म्हणजे उर्वरित अधिकारी वर्गावर पडलेला मानसिक दबाव. जर जगणे केवळ निष्ठsवर अवलंबून असेल तर खरी परिस्थिती मांडण्याचे धाडस कोणीही करणार नाही. युद्ध इतिहासात असे अनेकदा घडले आहे की, नेतृत्वाच्या भीतीपोटी कमांडरनी रणभूमीवरील खरी परिस्थिती लपवून ठेवली. ज्यामुळे मोठी रणनीतिक चूक झाली.

या शुद्धीकरणामुळे चिनी लष्कराची अंतर्गत गुंफण विस्कळीत झाली आहे. जेव्हा बढत्या अचानक रद्द केल्या जातात आणि मार्गदर्शक अटक केले जातात, तेव्हा लष्करी तुकड्यांना एकत्र ठेवणारे नेटवर्क तुटते. त्यामुळे अधिकारी वर्ग अधिक सावध झाला असून स्वतःला सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य देत आहे. आधुनिक युद्धात जिथे वेगवान निर्णय घेणे गरजेचे असते तिथे ही सावधगिरीची वृत्ती मोठी बाधा ठरू शकते.

अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव कमी-जास्त होत असताना, चिनी लष्कराची ही कमजोरी भारतासाठी एक महत्त्वाची रणनीतिक संधी असू शकते. लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चिनी लष्कराची आक्रमकता काही काळ मंदावण्याची शक्यता आहे. कारण पीएलए सध्या स्वतःच्या अंतर्गत नेतृत्वाच्या प्रश्नांवर जास्त लक्ष पेंद्रित करत आहे. चीनच्या या ‘अंतर्गत शुद्धीकरणामुळे’ इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील लष्करी समतोल बदलत आहे. अमेरिका आणि भारतासारख्या देशांना या काळात आपली रणनीती अधिक मजबूत करण्याची संधी मिळाली आहे.