लेख – विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्प : दिशाभूल

>> दयानंद पाटील

विरार-डहाणू चौपदरीकरण खूप लांबले असून प्रत्यक्षात हा प्रकल्प केव्हा पूर्ण होऊन या मार्गावरून प्रवासी वाहतूक केव्हा सुरू होईल याबाबत निश्चित शाश्वती नाही. जेव्हा केव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तोपर्यंत डहाणू विभागातील प्रवासी संख्या इतकी वाढलेली असेल की, प्रवाशांना आताच्या घडीपेक्षा कितीतरी पटीने त्रासदायक प्रवास करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत डहाणू लोकलच्या किमान फेऱ्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहेत. रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण कसा करता येईल याचा अभ्यास करावा.

विरार ते डहाणू या पश्चिम रेल्वेमार्गावर चौपदरीकरणाचा (Quadrupling) मोठा प्रकल्प मुंबई उपनगरी रेल्वेच्या सुधारित क्षमतेसाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडअंतर्गत राबविला जात आहे, परंतु या प्रकल्पासंबंधी 2018 आणि 2025 मध्ये मिळालेल्या माहितीच्या अधिकारातील उत्तरांमध्ये उल्लेखनीय विसंगती दिसून येते.

हे उत्तर केवळ तारीख बदलण्यापुरते मर्यादित नसून प्रकल्पाच्या संपूर्ण नियोजनाच्या पद्धतीच बदलल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. नागरिकांचा विश्वास डळमळीत करणारी ही स्थिती केवळ प्रशासकीय गोंधळ नाही, तर भविष्यातील नागरी सुविधा, रेल्वेचे लोड व्यवस्थापन आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय यावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे.

2018 मध्ये काय सांगितलं होतं? ः एक स्पष्ट व वेळबद्ध आराखडा

दिनांक 5 मार्च 2018 रोजी MRVC ने हितेश सावे, जनसंपर्क अधिकारी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था यांच्या RTI अर्जाला उत्तर देताना प्रकल्पाच्या कार्यपद्धतीचा तपशीलवार आराखडा दिला होता. त्यानुसार ः

जमीन संपादन ः डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित.
मातीचे काम व पूल बांधकाम ः डिसेंबर 2021 पर्यंत.
रेल्वे ट्रक व स्थानक बांधणी ः मार्च 2023 पर्यंत.

एकूण पूर्णता कालावधी ः 5 वर्षे. अट होती की, जमिनीचे संपादन वेळेवर पूर्ण व्हावे.
यामध्ये प्रकल्पाचे टप्पे निश्चित करण्यात आले होते आणि त्यानुसार कामांची वेळेत पूर्तता अपेक्षित होती.

2025 मध्ये काय उत्तर दिलं गेलं? 23 जुलै 2025 रोजी त्याच कार्यालयातून दिलेल्या उत्तरात मात्र पुढील मुद्दे समोर आले ः

कोणतेही टप्पे निश्चित करण्यात आलेले नाहीत – म्हणजे 2018 मध्ये ज्या स्पष्ट टप्प्यांची माहिती दिली गेली होती, ती आता नाकारण्यात आली आहे.
एकाच टप्प्यात प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याचे सांगण्यात आले – प्रशासनाच्या अंमलबजावणीतील बदल स्पष्ट दिसतो.
संभाव्य पूर्णता तारीख – जून 2027. याचा अर्थ आधी ठरवलेल्या 5 वर्षांच्या ऐवजी आता किमान 10 वर्षे लागणार.
टेस्टिंग व कमिशनिंगसाठी कोणतीही ठोस तारीख नाही – म्हणजे प्रत्यक्ष सेवेत प्रकल्प केव्हा येईल हेही स्पष्ट नाही.

वस्तुस्थिती काय?

2018 मध्ये ‘सर्व काही नियोजनबद्ध आहे, तारीखा ठरल्या आहेत’ असा विश्वास देण्यात आला.
पण 2025 मध्ये त्याच कार्यालयातर्फे ‘टप्पेच ठरले नव्हते’ असे म्हणणे हे प्रशासनाने जबाबदारीपासून हात झटकण्यासारखे वाटते.
ही विसंगती केवळ तांत्रिक नाही, तर नागरिकांच्या विश्वासाला तडा देणारी आहे. या प्रकल्पासाठी शेकडो कोटींचे बजेट, जमिनीचे अधिग्रहण आणि हजारो नागरिकांचे भविष्य दावणीला लागले आहे.

प्रकल्पाच्या विलंबाचे परिणाम

वाढलेला खर्च ः प्रत्येक वर्षी विलंबामुळे प्रकल्प खर्चात वाढ होते.

गैरसोयींमध्ये वाढ ः सध्याच्या दोन मार्गांवरील वाढत्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी चौपदरीकरण गरजेचे आहे.

रेल्वे सुरक्षा व वेळापत्रकांवर परिणाम ः गाडय़ांचे वेळापत्रक जुळवण्यात अडथळे येतात.

शेवटी प्रश्न उरतो – जबाबदारी कोण घेणार?

एकाच कार्यालयातून दोन वेगवेगळी आणि परस्परविरोधी उत्तरे म्हणजे माहिती अधिकाराच्या मूलभूत हेतूला हरताळ फासणं आहे. प्रश्न राहतो की, 2018 मध्ये ज्या टप्प्यांची माहिती देण्यात आली होती ती चुकीची होती का? की नंतरच्या टप्प्यात निर्णय बदलण्यात आले? आणि त्यासाठी कोणती बैठक किंवा शासकीय पत्र व्यवहार झाला याची माहिती का उपलब्ध होत नाही?

विरार-डहाणू चौपदरीकरण खूप लांबले असून प्रत्यक्षात हा प्रकल्प केव्हा पूर्ण होऊन या मार्गावरून प्रवासी वाहतूक केव्हा सुरू होईल याबाबत निश्चित शाश्वती नाही. जेव्हा केव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तोपर्यंत डहाणू विभागातील प्रवासी संख्या इतकी वाढलेली असेल की, प्रवाशांना आताच्या घडीपेक्षा कितीतरी पटीने त्रासदायक प्रवास करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत डहाणू लोकलच्या किमान फेऱ्या वाढविणे अत्यंत आवश्यक आहेत अशा सर्व प्रवाशांच्या अपेक्षा आहेत. रेल्वे प्रशासन याची दखल घेऊन हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण कसा करता येईल याचा अभ्यास करावा तसेच डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासंदर्भात ठोस पावले उचलली जावीत. एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन)मुख्यतः दिशाभूल करणाऱ्या तारखा देऊ नयेत.

(लेखक डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सचिव आहेत)