‘कार्टूनिस्टस् कंबाईन 2020’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धनंजय शिंदे 

नेहमीपेक्षा वेगळ्या, विनोदी पद्धतीनं रेखाटलेली व्यंगचित्रं आणि त्यातील रंगरेषा लक्ष वेधून घेतातच. महाराष्ट्राने अशा व्यंगचित्रांची, व्यंगविनोदांची एक समृद्ध परंपरा जोपासली आहे. या परंपरेतील महत्त्वाचा भाग असणाऱया कार्टूनिस्टस् कंबाईन या संस्थेद्वारे व्यंगचित्रकारांचे संमेलन आज मुंबईत पार पडत आहे.

जागतिक व्यंगचित्रकलेचा इतिहास मोठा आहे. प्राचीन परंपरा आहे. कलांचा विकास होत होता. चित्रकलेचा विकास झाल्यानंतर त्याची पुढची पायरी म्हणजे व्यंगचित्रकला. महाराष्ट्रात व्यंगचित्रकलेचा पाया शं. वा. किर्लोस्कर यांनी घातला. त्यांना महाराष्ट्रातील व्यंगचित्रकलेचे पितामह म्हणतात. त्यानंतर महाराष्ट्रात व्यंगचित्रकलेचा प्रसार झाला तो माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांमुळे. त्यांच्या ‘मार्मिक’ साप्ताहिकाने महाराष्ट्राला, मराठी माणसाला वेड लावले. व्यंगचित्रकलेची गोडी लावली. व्यंगचित्रकलेची ताकद काय असते तेही त्यांनी दाखवून दिली. त्यांच्या व्यंगचित्रांनी प्रभावित होऊन व्यंगचित्रकारांची एक पिढीच तयार झाली. त्या व्यंगचित्रकारांना माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकत्र केले आणि ‘कार्टूनिस्टस् कंबाईन’ या संस्थेची स्थापना केली. त्या गोष्टीला 26 वर्षे झाली.

दरवर्षीचा कार्टूनिस्टस् कंबाईन या बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थेतर्फे विविध शहरांत संमेलने आयोजित केली जातात. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार संजय मिस्त्राr यांची या संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली या वर्षी चोगले हायस्कूल, ऍक्टिव्हिटी सेंटर, श्रीकृष्ण नगर, बोरिवली, मुंबई येथे होत आहे. आतापर्यंत ही संमेलने मुंबई, पुणे, नाशिक, नांदेड, नागपूर या शहरांतून मोठय़ा प्रमाणात झाली आहेत. दरवर्षी संमेलनात ज्येष्ठ व्यंगचित्रकाराला जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. या वर्षी हा पुरस्कार नुकतेच दिवंगत झालेले व्यंगचित्रकार विकास सबनीस यांना देण्यात येणार आहे.

या संमेलनाला महाराष्ट्रातून असंख्य व्यंगचित्रकार येतात. त्यांच्यासाठी वैचारिक मेजवानी असते. त्यासाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल या कार्यक्रमात आहे. व्यंगचित्रविषयक वेगवेगळे परिसंवाद, चर्चा, व्याख्याने यात आहेत. ‘वस्त्रहरण’ या गाजलेल्या नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. शिवसेनेचे उपविभागप्रमुख सुनील डहाळे यांनी या संमेलनाचे आयोजन केले आहे.

श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ, कार्टूनिस्टस् कंबाईन आणि कार्टूनिस्टस् कॅफे क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजिन केले जात आहे.या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ देशभरातील व्यंगचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहेत. त्यात देशभरातील व्यंगचित्रकारांची 250 व्यंगचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत. या प्रदर्शनात रसिकांना माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे, राज ठाकरे, शि. द. फडणीस, विकास सबनीस, यशवंत सरदेसाई, संजय मिस्त्राr, योगेंद्र भगत, प्रभाकर वाईरकर, ज्ञानेश सोनार, प्रशांत कुलकर्णी, खलील खान, चारुहास पंडीत, घनश्याम देशमुख, विनय चाणेकर, वैजनाथ दुलंगे अशा ज्येष्ठ व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे पाहण्याची संधी मिळणार आहे. शनिवार, 29 फेब्रुवारी व रविवार, 1 मार्च रोजी हे संमेलन चोगले हायस्कूल, ऍक्टिव्हिटी सेंटर, श्रीकृष्ण नगर, बोरिवली येथे सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत असेल.

महाराष्ट्रात व्यंगचित्रकलेचा इतिहास फार जुना आहे. ब्रिटनमध्ये ‘पंच’ नावाचे व्यंगचित्र नियतकालिक सुरू झाले. त्यात भरपूर व्यंगचित्रे असत. परदेशी गोष्टींची नक्कल होते. त्याप्रमाणे त्या ‘पंच’ व्यंगचित्र नियतकालिकापासून प्रेरणा घेऊन हिंदुस्थानात ‘हिंदू पंच’, ‘पारसी पंच’ अशी अनेक व्यंगचित्रमय नियतकालिके निघाली. इंग्रजी ‘पंच’ नियतकालिकात फिल मे, टेनियल असे व्यंगचित्रकार व्यंगचित्रे काढत. तसे हिंदुस्थानातील या व्यंगचित्र नियतकालिकात बाजीराव यादव, कृष्णराव यादव हे व्यंगचित्रे काढत असत. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याची ताकद व्यंगचित्रकलेत आहे. आदरणीय शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत असत, ‘‘हजार शब्दांची ताकद, हजार अग्रलेखांची ताकद एका व्यंगचित्रात आहे’’ आणि बाळासाहेबांच्या ‘मार्मिक’मधील व्यंगचित्रांनी ते सिद्ध केले आहे.

या वर्षीच्या या व्यंगचित्र संमेलनात विषयांची रेलचेल आहे. ज्यामुळे व्यंगचित्र रसिकाला एक मेजवानी मिळणार आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे रंगमंच येथे संपूर्ण दोन दिवस कार्यक्रम चालेल आणि माननीय बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे देशभरातील मराठी व्यंगचित्रांचे प्रदर्शन असेल. महाराष्ट्रात विविध शैलीचे अनेक व्यंगचित्रकार आहेत. रंगीत व्यंगचित्रे काढणाऱया व्यंगचित्रकारांच्या शैलीमध्येही प्रचंड विविधता आहे. नव्या तंत्रामुळे आताचे व्यंगचित्रकार व्यंगचित्रे काढण्यासाठी कॉम्प्युटरचा वापर करतात. त्या नव्या, नावीन्यपूर्ण व्यंगचित्रे या व्यंगचित्र संमेलनात पाहायला मिळतील. त्याचबरोबर नुकतीच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि कार्टूनिस्टस् कॅसो क्लबचे अध्यक्ष संजय मिस्त्राr यांनी अखिल भारतीय व्यंगचित्रकला स्पर्धा घेतली होती. त्याला जगभरातून प्रचंड प्रतिसाद लाभला. त्यातली बक्षीसपात्र ताजी व्यंगचित्रे पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

– [email protected]