होळकरांचे श्रीगणराय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धनश्री देसाई

इंदूरच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या वाडय़ात स्थापन होणारे श्रीगणराय म्हणजे वैविध्यपूर्ण परंपरांची सरमिसळ. कलेला आणि कलाकारांना मानाचं स्थान असणाऱया होळकरांच्या राज्यात इंदुरात कलासंस्कृतीची भरभराट झाली. गणेशोत्सवानिमित्त होळकरांच्या गणरायाच्या स्थापनेची माहिती सांगणारा हा लेख.

गणेशोत्सव म्हटलं की, आपल्या श्रद्धा, आपल्या परंपरा आणि संस्कृतीची आठवण होते. अनेक ठिकाणच्या गणरायांची काही वैशिष्टय़े आणि प्रसिद्धी आहे. त्याला काही धार्मिक, ऐतिहासिक किंवा पौराणिक कारणं आहेत.

इंदूरच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या वाडय़ात स्थापन होणारे श्रीगणराय म्हणजे वैविध्यपूर्ण पद्धती आणि परंपरेची सरमिसळ आहे. दरबारात कलेला आणि कलाकारांना मानाचं स्थान होतं. होळकरांच्या राज्यातच कला आणि संस्कृतीची इंदुरात भरभराट झाली.

इंदूरला होळकरांच्या राजदरबारात मोरोपंत खरगोणकर म्हणून कलाकार होते. रांगोळय़ा, कलाकृती असे त्यांचे वैविध्यपूर्ण आणि कलात्मक काम होते. गणपती स्थापन करण्याच्या परंपरेतूनच खरगोणकर कुटुंब होळकरांचं जिवश्चकंठश्च झालं.

गणपती स्थापन होणार, पण मग गणपतीची मूर्ती कशी असणार? यावर चर्चा करताना होळकरांनी खरगोणकरांना सांगितले की, राजदरबारात स्थापन होणारे गणपती, आपल्या हस्तेच निर्माण व्हावेत अशी आमची इच्छा आहे; परंतु गणपतींचे निर्माण असे व्हावे की, त्याची चर्चा झाली पाहिजे आणि हिंदुस्थानात कुठेही मूर्तीची तशीच रचना झालेली नसावी.

खरगोणकर यांनी होळकर घराण्याचे ऐश्वर्य, संपन्नता, संस्कार व परंपरेला साजेसे असे वैभवपूर्ण गणपती बनवणे सुरू केले. मोरोपंत खरगोणकरांनी स्वतःच्या घरीच गणपती बनवायला सुरुवात केली. मग त्यासाठी मुहूर्त म्हणून वसंत पंचमीच्या मुहूर्ताला त्यांनी आधी तीन गणपती बनवून त्यांची षोडशोपचारे पूजा करून मग संकल्प घेऊन होळकरांचे गणपती बनवण्यास सुरुवात केली. कारण होळकरांचे भव्यदिव्य गणपती बनवणे सोपे काम नव्हते. होळकर यांच्या पगडीची वेगळीच ओळख असल्याने मल्हारराव होळकरांनी गणपतींनाही मल्हार पगडी घातलेली मूर्ती हवी असे आदेश दिले. मल्हार पगडी, श्रीमंत बैठक आणि राजस रूप घेऊन खरगोणकर यांच्या हस्ते होळकरांचे मानाचे गणराज आपल्या आसनांवर स्थानापन्न झाले.

गणपती बनवल्यानंतर होळकरांचे आदेश होते की, मूर्ती आपण आमच्या दरबारात आणू नये, गणरायांना मानानं घ्यायला आम्हीच आपल्या घरी येऊ आणि गणपती बसायच्या शुभमुहुर्तावर हत्ती, पालखी, दरबारी आणि होळकरांचे सरदार किबे, फडणीस, बिंगले, पळशीकर अशा समस्त शासकीय इमामात गणपती घ्यायला होळकर राजे यायचे. विधिपूर्वक संकल्प घेऊन गणपती पालखीत बसवले जायचे. त्यानंतर हत्ती सोंड वर करून गणरायाला सलामी द्यायचे. होळकर शासक प्रभो प्रार्थना करायचे व त्याचबरोबर बँड, ढोलक, वाजत्र्यांच्या नादाबरोबर होळकरांचे मानाचे मंगलमूर्ती मोठय़ा रुबाबाने राजदरबारात स्थापन केले जायचे. 225 वर्षांपूर्वीचीही परंपरा आजही तशीच सुरू आहे.

मोरोपंत खरगोणकरांनंतर मग त्रिंबकराव खरगोणकर यांनी वारसा आपल्या मुलाला सखाराम खरगोणकर यांना दिला आणि आता श्याम खरगोणकर हे तो वारसा जपत पुढील पिढीला त्यांचे महत्त्व सांगत आहेत. होळकरांचे वंशज आजही खरगोणकर यांच्या निवासस्थानी येऊन राजेशाही इमामात पालखीतून गणपती घेऊन जातात. त्याआधी संकल्प घेऊन सुपारी आणि विडय़ाचे पान देऊन मग मूर्ती पालखीतून मिरवणूक काढत, सनई-वाजत्र्यांच्या सोबतीनं गणरायांना सलामी देत वाडय़ात आणले जाते.

1980पासून खरगोणकर परिवारातले श्याम खरगोणकर मूर्तीची घडवण करतात. ते सांगतात, मूर्तीचे निर्माण सुरू करायला वसंत पंचमी हा मुहूर्त जुन्या काळापासून सुरू आहे. आजही आम्ही तोच वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त गाठून तीन गणपती बनवतो. त्यांची पूजा करतो आणि मगच होळकरांचा गणपती बनवण्यास सुरुवात होते. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर बनवलेले लहान गणपती हे राजवाडय़ाच्या मोठय़ा गणपतींची रचना करताना त्यांच्या गर्भात ठेवले जाते. याचा समज असा की. राजवाडय़ातील गणपतींची रचना ही वसंत पंचमीच्या मुहूर्तावरच केली गेली आहे. हे सर्व पिढय़ान् पिढय़ा असेच सुरू आहे. मुख्य म्हणजे, गणपती बनवणे हा त्यांचा व्यवसाय नाही; परंतु वारसा जपला गेला पाहिजे आणि येणाऱया पिढीला त्यांच्या पिढीचे ऐतिहासिक महत्त्व कळले पाहिजे. म्हणून लहानपणापासून समस्त कुटुंब गणपती एकत्र बसून बनवतात. कुटुंबात सर्वाना गणपती बनवता येणं हा वारसाच आहे.

होळकरांच्या गणपतीबरोबरच होळकारांच्या राज्यातले सुभेदार, दिवाण आणि सरदार (सरदार किबे, पळशीकर, फडणीस)यांचे कुटुंबदेखील आजही खरगोणकर यांच्याकडूनच गणपती घेऊन जातात. असे हे वैशिष्टय़ असलेले होळकरांचे गणपती याही वर्षी भक्तांच्या भेटीस आले आहेत!

[email protected]