लेख – साठीची ‘प्रकाशवाणी’

488

>> दिलीप जोशी, [email protected]

टेलिव्हिजन संकल्पनेवर विसाव्या शतकाच्या मध्यालाच सखोल विचार होऊ लागला होता. रेडिओ लहरींद्वारे एके ठिकाणी केलेले कार्यक्रम रेडिओ सेटवरून सर्वत्र पोहोचवता येतात. तसंच प्रकाशकणांचा वापर करूनही करता येईल ही कल्पना व्यापक होती. संशोधन सुरू झालं आणि आता आपण जसा टीव्ही पाहतो तशा टीव्हीचा जनक होण्याचा मान जॉन बेअर्ड यांना मिळाला. जगातला पहिला व्यावसायिक टीव्ही 1945 मध्ये अमेरिका येथे सुरू झाला. त्याच्या प्रक्षेपणासाठी उंचच उंच टॉवर बांधले जाऊ लागले. दूरवरची माणसं कार्यक्रम घरबसल्या एका चौकोनी खोक्यात पाहता येतात याचा विस्मय लोकांना वाटू लागला. हळूहळू कुतूहल कमी होत टीव्ही ही घरातली अविभाज्य वस्तू झाली. टेलि म्हणजे दूरस्थ आणि व्हिजन म्हणजे दिसणे यावरून ‘टेलिव्हिजन’ हा शब्द आला आणि पुढे तो त्याच्या टीव्ही या संक्षिप्त नावानेच रूढ झाला.

याचं स्मरण आज होण्याचं कारण म्हणजे परवा 15 सप्टेंबरला हिंदुस्थानी दूरदर्शनला साठ वर्षे पूर्ण झाली. युरोप-अमेरिकेत टीव्ही आल्यानंतर 14 वर्षांनी आपल्याकडे दिल्लीत टीव्ही अवतरला. त्याला ‘दूरदर्शन’ असं सार्थक नाव देण्यात आलं. त्यावेळी केवळ सरकारी अधिपत्याखाली असलेल्या दूरदर्शनवर सरकारी आणि सरकारी धोरणानुसार होणारे सामाजिक कार्यक्रम दाखवले जाऊ लागले. वेळही संध्याकाळी दोन तासांचीच असायची. आपल्यासारख्या विकसनशील देशाला आरंभीच्या काळात देशभर टीव्हीचं जाळं विणणं शक्य नव्हतं.

मला आठवतं की, एकोणीसशे साठच्या सुमारास अमेरिकेला जाऊन आलेल्या आमच्या एका परिचिताने तिथल्या टीव्हीवर क्रिकेटची मॅच दाखवली जात असल्याचं कॅलेंडर आणलं होतं. त्या रंगीत चित्रात एवढय़ाशा पडद्यावर दिसणारे खेळाडू आणि प्रेक्षकांची गॅलरी पाहताना कमालीचं आश्चर्य वाटलं होतं. याच सुमारास दिल्लीहून आमचे एक नातेवाईक आले. त्यांच्या मुलांना या कॅलेंडरचं फार आश्चर्य वाटलं नाही. कारण दिल्लीत तोपर्यंत टीव्ही आला होता. परदेशी टीव्हीवर रंगीत दिसतं हे मात्र त्यांना विशेष वाटलं.

तोपर्यंत आपल्याकडे मुंबईत आकाशवाणीने चांगलाच जम बसवला होता. व्हॉल्व्ह असलेला मोठय़ा आकाराचा रेडिओ घरात असणं हीच प्रतिष्ठsची गोष्ट होती. त्याची जागा पुढे ट्रान्झिस्टर रेडिओने घेतली, पण टीव्ही वगैरेची कल्पना नव्हती. मुंबई दूरदर्शन 2 ऑक्टोबर 1972 मध्ये सुरू झालं तेव्हा मी कॉलेजच्या दुसऱया वर्गाला होतो. कॉलेजच्या हॉलमध्येच त्याचं पहिलं प्रक्षेपण पाहिलं.

दिल्लीतल्या टीव्हीवर मात्र आपल्या मराठी लोकांनी खूप मोलाची कामगिरी त्या काळात केली. इंग्लंडमध्ये बीबीसी टीव्हीवर खास प्रशिक्षण घेऊन आलेले ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना दिल्ली दूरदर्शनवर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मोजक्या वेळात दर्जेदार कार्यक्रमही देता आले. मात्र त्याचं प्रक्षेपण फारच मात्र मर्यादित क्षेत्रात असल्याने तिथे मराठी कार्यक्रमांना फार वाव नव्हता. पुलंच्या स्वभावानुसार त्यांनी रेडिओला ‘आकाशवाणी’ म्हणतात तसं टीव्हीला ‘प्रकाशवाणी’ म्हणावं असं सुचवलं होतं असा किस्सा सांगितला जातो. हा खरोखरच समर्पक शब्द होता. अर्थात ‘दूरदर्शन’ शब्द त्याआधीच रूढ झाला होता. पुलंच्या लेखनातून त्यांचे दिल्ली दूरदर्शनवरचे कितीतरी अनुभव नोंदलेले आहेत. विख्यात दिग्दर्शिका सई परांजपे यांनाही दिल्ली दूरदर्शनवर काम करण्याची संधी मिळाली होती.

त्या काळात देशाच्या विविध क्षेत्रांतल्या दिग्गज मंडळींचं जमेल तेवढं चित्रीकरण दूरदर्शनने केलं. प्रख्यात शास्त्राrय गायक आमीर खान यांची तेव्हा घेतलेली फिल्म नंतरच्या प्रक्षेपणात पाहिल्याचं आठवतं. आजही दिल्ली दूरदर्शनच्या जतनालयात (अर्काइव्ह) अनेक दुर्मिळ माहितीपट जतन केलेले असतील.

कालांतराने मुंबई आणि नंतर देशातील अनेक शहरांत दूरदर्शन पोहोचलं. त्या काळातल्या कार्यक्रमात सुरुवातीला दिल्लीहून प्रक्षेपित होणाऱया कार्यक्रमांचं प्राबल्य असायचं. तमस, बुनियाद, नुक्कड, हमलोग वगैरे मालिका आज पन्नाशी उटलेल्यांच्या लक्षात असतील. मुंबई दूरदर्शनवर ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ हा तबस्सुम यांनी सादर केलेला प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखतींचा कार्यक्रम व्हायचा. दर गुरुवारीच दिसणारा चित्रपट गीतांचा ‘छायागीत’ कार्यक्रम बघायला मंडळी शेजारीपाजारी जायची. कारण चार-सहा घरांमागे एक टीव्ही असायचा. मराठी कार्यक्रम सुरू झाल्यावर ‘आमची माती, आमची माणसं’, ‘प्रतिभा आणि प्रतिमा’, ‘गजरा’, ‘चिमणराव’, ‘आमची पंचविशी’ अशा कितीतरी कार्यक्रमांची सहज आठवण झाली.

1981 मध्ये हिंदुस्थानात प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धा होणार होत्या. त्यावेळी जगाचं लक्ष त्याकडे लागणार हे लक्षात घेऊन त्यावेळचे माहिती प्रसारणमंत्री वसंत साठे यांनी इंदिरा गांधींकडे रंगीत टीव्ही प्रक्षेपणाचा आग्रह धरला आणि देशी टीव्ही रंगीत झाला. कलर टीव्ही हा त्यावेळी केवढा आकर्षणाचा विषय होता. पुढे काळ झपाटय़ाने बदलला. पाश्चात्त्य तंत्रज्ञान आपल्याकडे यायला तेव्हा किमान 25 वर्षे लागायची. आता ते क्षणात येतं. उपग्रह वाहिन्यांमुळे आणि कॉम्प्युटर तंत्रज्ञानाने जग तांत्रिकदृष्टय़ा कमालीचं जवळ आणलं.

1990 च्या दशकात तर दूरदर्शनची मक्तेदारी संपली. अनेक वाहिन्या 24 तासांचे कार्यक्रम घेऊन आल्या. टीव्ही सेटचं स्वरूप बदललं. सगळीच तंत्रक्रांती झाली. तरीही ‘दूरदर्शन’ची ती प्रसिद्ध धून अजूनही कानात घुमते. एका नव्या पर्वाच्या आरंभाची आठवण करून देते.

आपली प्रतिक्रिया द्या