ठसा – नाझिमा

>> दिलीप ठाकूर

आपली चित्रपटसृष्टी अलिखित नियमानुसार चालते आणि असेच का असे विचारताही येत नाही. एकदा का एका प्रकारच्या भूमिकेसाठी काwतुक झाले, तो चित्रपट यशस्वी ठरला की, त्याच प्रकारच्या भूमिकेसाठी त्या कलाकाराला निर्माता व दिग्दर्शकाकडून मागणी येते आणि मग तो कलाकार त्याच भूमिकेत अडकून जातो. नाझिमा या अभिनेत्रीचे तेच झाले. साठच्या दशकात बालकलाकार म्हणून नाझिमाने कारकीर्दीला सुरुवात केली. ‘काबुलीवाला’, ‘देवदास’, ‘अब दिल्ली दूर नहीं’ अशा अनेक चित्रपटांत बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या. त्यानंतर वयात आल्यावर सहनायिका म्हणून वाटचाल सुरू केली. ‘निशान’ या चित्रपटात ‘है तब्बसूम तेरा जैसे धूप खिला हो रात मे’ हे गाणे संजीव कुमार व नाझिमा याच जोडीवर आहे. ‘आरजू’ चित्रपटातील ‘जब इश्क कही हो जाता है’ हे गाणेदेखील नाझिमावरच आहे, पण त्या काळातील नायिकांच्या स्पर्धेत टिकून राहणे फार अवघड होते. हिंदी चित्रपट कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईटकडून रंगीत चित्रपटाकडे चालला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत बबिता, अनुपमा, हेमा मालिनी, लीना चंदावरकर, रेखा, राखी, जया भादुरी, रेहाना सुल्तान, राधा सलुजा यांचे एकामागोमाग आगमन झाले आणि टिकून राहण्यासाठी नाझिमा ही नायिकेच्या बहिणीच्या, मैत्रिणीच्या भूमिकेकडे वळली व त्यातच अडकली. ‘आरजू’ चित्रपटात राजेंद्र कुमारची, तर ‘आये दिन बहार के’ या चित्रपटात आशा पारेखच्या बहिणीची भूमिका साकारल्यावर नाझिमाकडे बहिणीच्या व मैत्रिणीच्या भूमिका आल्या. त्यातही ‘प्रेम नगर’मध्ये हेमा मालिनीची, तर ‘मनचली’मध्ये लीना चंदावरकरच्या बहिणीची भूमिका साकारताना दादही मिळवली. ‘मनचली’ चित्रपटात संजीव कुमार तिला प्रेमाने पुष्पी म्हणतो.

नाझिमाने ‘अभिनेत्री’, ‘औरत डोली’, ‘मेरे भय्या’, ‘अमीर गरीब’, ‘संन्यासी’, ‘दया ए मदिना’, ‘अंजाना’, ‘अनुराग’ अशा अनेक चित्रपटांतून छोटय़ा छोटय़ा भूमिका साकारल्या. अशा छोटय़ा भूमिका सातत्याने मिळवत राहणे कालांतराने अधिकाधिक अवघड होत जाते आणि मग मागे पडणे नशिबी येते. असे कलाकार कुठे आहेत, काय करतात याचाही फारसा कोणी शोध घेत नाहीत. तसे करणे कोणाला आवश्यकही वाटत नाही. कधी छायागीत कार्यक्रमात वा जुने चित्रपट पाहताना असे पडद्याआड जात असलेले चेहरे दिसतात इतकेच. नाझिमाबद्दल हेच झाले आणि रविवार 10 ऑगस्ट रोजी तिच्या निधनाची बातमी आली. वयाच्या 77 व्या वर्षी नाझिमा (मूळ नाव मेहरुन्निसा रहमान) चे निधन झाले. 25 मार्च 1948 रोजी नाशिकमध्ये जन्म झालेल्या नाझिमाला दोन मुले आहेत. विस्मरणात गेलेली नाझिमा तिच्या मृत्यूच्या बातमीमुळे क्षणभर जुन्या सिनेरसिकांच्या डोळ्यांसोर तरळून गेली इतकेच!