संचित- संगीतातल सुधीर पर्व!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिलीप जोशी

 

शंभराहून अधिक चित्रपटांना संगीत देणारे, शेकडो सुरेल गाणी गाणारे, गोवा मुक्तीलढय़ात भाग घेणारे आणि ज्यांच्या संगीतातील ‘खुश है जमाना आज पहिली तारीख है’ किशोरदांच्या स्वरातलं दर एक तारखेला रेडिओवरून अनेक वर्षे सादर होणारं आपलं गाणं विक्रमी झाल्याचा अनुभव घेणारे बाबूजी एक त्र+जु व्यक्तिमत्त्व होते. हे अनुभवायला मिळाले हे भाग्य!

 

एक काळ असा होता की, मुंबई, दादर-शिवाजी पार्क परिसरात अनेक दिग्गज संगीतकार राहायचे. सी. रामचंद्र तर हिंदी सिनेसृष्टी गाजवतच होते, पण मराठी चित्रपट आणि भावगीत-भक्तिगीतांच्या बहराच्या काळातला सुधीर फडके तथा बाबूजी, यशवंत देव आणि प्रभाकर जोग असा सूर-स्वर समुच्चय तिथे एकवटला होता. या सर्व संगीतकारांचं राहणीमान अगदी साधं होतं. दादरच्या रस्त्यांवरून चालत जाताना अनेक दिग्गज दिसत असत. लोकांना कुतूहल वाटायचं. कुणी म्हणायचं ‘…ते बघ सुधीर फडके.’ तर कुणी पुढे होत नमस्कार करायचं. पत्रकारितेत आल्यावर या सर्वांना भेटण्याची संधी मिळाली. सी. रामचंद्र यांना त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी तर देव आणि बाबूजींना त्यांच्या घरी. उतारवयात बाबूजी वेळ असेल तेव्हा संध्याकाळी फिरायला बाहेर पडत. त्यांच्या घरासमोरच असलेल्या सेना भवनच्या कोपऱयावरून संध्याकाळचं एखादं वृत्तपत्र घेत. ज्या प्रेसमध्ये आमचं ‘खगोल वार्ता’चं काम चालायचं तिथून परतताना बाबूजी बऱयाचदा भेटले. नमस्कार केला की ते हसून स्वीकार करत. ही खूप मोठी माणसं आहेत हे ठाऊक असूनही त्यांच्याशी बोलताना कधी दडपण येत नसे. हेही त्यांचंच मोठेपण.

बाबूजी राहात असलेल्या शंकर निवासमध्ये ठाकूर यांच्याकडे काही कामानिमित्त जायचं होतं. जिना चढताना, नेमका मजला विसरलो. तेवढय़ात समोरून बाबूजी उतरताना दिसले. मला गोंधळलेलं पाहून स्वत:च म्हणाले, ‘कुणाकडे जायचंय आपल्याला?’ मी स्तिमितच झालो. त्यावेळी मी अवघा 23 वर्षांचा आणि बाबूजी हे संगीत क्षेत्रातलं जगात गाजलेलं गायक व्यक्तिमत्त्व. ‘ठाकुरांकडे’ मग त्यांनी नेमकं कुठे जायचं ते सांगितलं आणि मंद स्मित केलं.

बाबूजींना पहिल्यांदा पाहिलं ते त्यांच्या गीतरामायण कार्यक्रमात, तेही दहाव्या-बाराव्या वर्षी. त्या काळात घरोघर त्यांच्या या कार्यक्रमाची चर्चा चालायची. पुणे आकाशवाणीने वर्षभर घरोघर पोहोचवलेलं ‘गीतरामायण’ मराठी मनात कायमच गुंजत राहिलं. बाबूजींनी विविध स्वरांना त्यात सामावून घेतलं होतं. ‘सावळा ग रामचंद्र’ हे गाणं बाबूजींच्या सहचारिणी ललिताबाईंनी गायिलं होतं. काही गीतं वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, मालती पांडे यांनी गायिली. ‘चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला’ या गाण्याचे गायक तर ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले होते… आणि ‘मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे’ हे आर्त गीत साक्षात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं होतं.

ग. दि. माडगुळकरांचं काव्य, बाबूजींचं अवीट गोडीचं संगीत आणि सीताकांत लाड यांचा ध्यास यातून आकशवाणीवरचा हा एक अजरामर कार्यक्रम झाला. पुढे ते मराठी संगीतातलं कैलास लेणं ठरला. कालांतराने बाबूजी त्यातील निवडक गाण्यांचा कार्यक्रम करू  लागले. ते सावरकरांपासून विनोबांपर्यंत सर्वांनी ऐकले. देशविदेशांत गीतरामायण गाजलं.

25 जुलै 1919 रोजी जन्मलेल्या आणि कोल्हापूरला बालपण गेलेल्या श्रीराम फडके या मुलाचा गळा गोड असल्याची कल्पना त्याच्या वकील वडिलांना आली. वामनराव पाध्ये बुवांकडे त्याचं संगीत शिक्षण सुरू झालं. शास्त्रीय संगीताचा पाया पक्का झाला. अकस्मात  रामची आई गेली आणि वडील विमनस्क झाले. वकिली थांबली. गरिबीचे दशावतार लहान वयातच बाबूजींनी अनुभवले. गाण्याची नैसर्गिक पुंजी सोबत घेऊन देशभर भ्रमण केलं. स्वत:ला घडवलं आणि पुढे उत्कृष्ट संगीतकार-गायक म्हणून ते सिद्ध केलं.

मात्र सर्वात आधी मी त्यांना पाहिलं ते एका दु:खद प्रसंगात. प्रबोधनकार ठाकरे यांच्या अंतिम संस्काराच्या वेळी ते आले होते. अनेक नेत्यांची भाषणं त्यावेळी झाली. बाबूजींनी मात्र ‘विष्णुमय जग,  वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ…’ हा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग उत्कटतेने गायिला. सर्वांचे डोळे पाणावले.

पुढे पत्रकारितेत आल्यावर गतकाळातील, विविध क्षेत्रांतील दिग्गजांचे (ऑडिओ) ध्वनिमुद्रण, क्वचित फिल्म या गोष्टींच्या ऐतिहासिक ‘संचिता’चा ‘महाराष्ट्र गाथा’ असा स्वत:पुरताच ‘प्रकल्प’ ठरवला. त्यात गाडगेबाबांचं ध्वनिमुद्रण मिळालं. बाळासाहेबांना फोन केल्यावर त्यांनी श्रीकांतजींकडे मला पाठवलं आणि प्रबोधनकारांचं ध्वनिमुद्रित भाषण त्यांनी दि}ं. गांधीजी, नेहरू यांची ध्वनिमुद्रणं उपलब्ध होती. काही दुर्मिळ गोष्टी प्रभाकर दातार यांच्याकडून मिळाल्या तर काही बरीच भ्रमंती करून मिळवल्या. तो ध्वनिमुद्रण संच सर्वसमावेशक असावा असा प्रयत्न होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ध्वनिमुद्रण बाबूजींकडे असल्याचं ऐकून त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांनी स्वागत करून मनमोकळय़ा गप्पा केल्या. टीव्हीवर सुरू असलेल्या ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ कार्यक्रमातल्या गाण्यांना दाद देत बाबूजी अभावितपणे सुरेल तान घेत होते. मला हवं ते ध्वनिमुद्रण त्यांच्याकडे नव्हतं. पण आता सारं यूटय़ूबवर उपलब्ध आहे. शंभराहून अधिक चित्रपटांना संगीत देणारे, शेकडो सुरेल गाणी गाणारे, गोवा मुक्तीलढय़ात भाग घेणारे आणि ज्यांच्या संगीतातील ‘खुश है जमाना आज पहिली तारीख है’ किशोरदांच्या स्वरातलं दर एक तारखेला रेडिओवरून अनेक वर्षं सादर होणारं आपलं गाणं विक्रमी झाल्याचा अनुभव घेणारे बाबूजी एक त्र+जु व्यक्तिमत्त्व असल्याचं अनुभवायला मिळालं.

[email protected]