
>> दिव्या नेरुरकर सौदागर
आपला खरा चेहरा आणि वेळोवेळी धारण केलेला मुखवटा या द्वंद्वात माणूस अडकत जातो. यात खऱया चेहऱयाची ओळखच हळूहळू बुजत जाते. अशी हरवलेल्या चेहऱयाची माणसं, त्यांची खरी ओळख मिळवण्याची केविलवाणी धडपड म्हणजे मनाची कसोटी पाहण्याचीच वेळ. खरंच व्यवहारात जगताना खरं खरं जगणं इतकं अवघड आहे?
मुखवटा… हा शब्द उच्चारल्यावर आपल्या मनात वेगवेगळे विचार यायला लागतात. तसं बघायला गेलं तर आपल्या लहानपणापासून आपण सर्वांनीच वेगवेगळ्या चेहऱयांचे मुखवटे घातलेले आहेतच. आपला जिवलग मित्र जसा आपल्याबरोबर असतो तशी ही मंडळी आगळ्या रंगात आणि वेगळ्या ढंगात वाढदिवसाची पार्टी किंवा कुठलाही इवेंट असो त्या कार्यक्रमाची शान वाढवायचीच. पूर्ण वातावरण बदलवून त्यात रंगत आणायची.
मला आठवतंय, माझ्या लहानपणी मला मिळालेले आणि आई-बाबांकडून घेतलेले असे वेगवेगळे मुखवटे बरीच वर्षं मी जपून ठेवले होते. त्या मुखवटय़ांबरोबर आम्ही सगळी लहान मुलं खेळत असू. वेगवेगळ्या चेहऱयांचे हे मुखवटे खरंच खेळात गंमत आणायचे. एक तुटला किंवा हरवला तरी आम्हा मुलांना खूप वाईट वाटायचं.
आमचा एक खेळ होता. जो मुखवटा घालू त्याप्रमाणे वागायचं. मग तो विदुषक असो किंवा कुठलाही प्राणी. आणि मग त्याप्रमाणे वागायला नाही जमलं तर तो मुलगा किंवा मुलगी आपोआप खेळातून बाद व्हायची.
त्या वेळी आम्हाला कुठे माहीत होतं की, हा आमचा खेळ आयुष्यभर आम्हाला खेळायला लागणार आहे. हे सगळे मुखवटे नंतर आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होणार आहेत. आमचं पूर्ण आयुष्य व्यापून टाकणार आहेत. क्षणाक्षणाला आमच्याबरोबरही असणार आहेत. अगदी आपल्या जिवलग मित्रासारखे.
आज आपली सगळ्यांची थोडी फार हीच परिस्थिती झाली आहे. आपण हे मुखवटे जर पांघरले नाहीत तर आपण समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकले जाऊ की काय, ही भीती आपल्या सगळ्यांच्याच मनात बसली आहे. त्यामुळे आपल्याला क्षणोक्षणी ‘मी ठीक आहे’ (I am Ok) हा मुखवटा घालावा लागतोय. कधी तरी ठीक नसतानासुद्धा!
या मुखवटय़ांचंसुद्धा तसं बघायला गेलं तर चुकत काहीच नाही. जिवलग मित्राला न सांगता आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी जशा कळतात आणि तो जसा आपल्याला सांभाळून घेतो तसंच या मुखवटय़ांनाही आपल्या मनातल्या सगळ्या भावना कळत असतात आणि तेही आपल्याला बरंच सांभाळून घेत असतात. आपण जरा का कुठे डगमगायला लागलो तर लागलीच ते आपला ताबा घेऊन परिस्थिती सांभाळून घेतात. दुसऱयाला ‘आपण ठीक आहोत’ हे भासवून देतात, पण कधी कधी त्यांचं हे असं आपल्याला सांभाळून घेणं कुठे तरी आपल्यालाच नंतर कठीण होत जातं. मग या मुखवटय़ांशी भांडावसं वाटतं. ‘मला सोडून जा’ हेही ठणकवायचं असतं.
त्या दिवशी माझी एक मैत्रीण हेच मला सांगत होती. तिला तिच्या मुखवटय़ांचा त्रास होत होता. ‘मला आता स्वतःला सांभाळून घेणं कुठे तरी जमत नाहीये.’ असा तिच्या बोलण्याचा सूर होता. ती मुळातच काहीशी अबोल आणि बुजरी होती, मात्र तिला पहिल्यापासूनच तिचा बुजरेपणा इतरांना दाखवायचा नव्हता. म्हणून तिने इतरांसमोर जास्तीत जास्त मोकळं आणि बोलपं राहण्याचा मुखवटा घातला होता. तिला स्वतःचं खासगी आयुष्य आवडायचं, पण ‘लोक काय म्हणतील?’ या विचाराने तिने स्वतःच्या मित्रमैत्रिणींना गरजेपेक्षा जास्त वेळ देऊन ‘मी कूल आहे’ हा मुखवटा धारण केला होता. तिच्या नातेवाईकांमध्येही कधीही सोशल मीडियावर हजर असणारा तिचा एक मुखवटा होता. आता झालं असं होतं की, तिला हे सगळे मुखवटे असह्य झाले होते. तिला आता स्वतःचं असं आयुष्य जगायचं होतं जे बिना मुखवटा असेल.
तिला आताशा इतरांच्याही मुखवटय़ांचा पंटाळा येऊ लागला होता. ‘लोकांचं बाहेर एक आणि आत एक असं वागणं बोलणं का असतं,’ हा तिचा भाबडा प्रश्न होता.
आपल्या सगळ्यांनाच या असल्या प्रश्नांची उत्तरं माहीत असूनदेखील कळत नसतात. कारण या लोकांमध्ये कधी तरी आपणदेखील आलेलो असतो. काही वेळा नाईलाज म्हणून हे मुखवटे आपल्याला धारण करावे लागतात, पण नंतर या मुखवटय़ांची आपल्याला इतकी सवय होते की, आपण आपली दग्gग्हत्ग्tब् विसरायला लागतो. कधी कधी एक मुखवटा कमी काय म्हणून त्यावर दुसराही मुखवटा पांघरला जातो, पण हे कधी तरी अति व्हायला लागतंच. आपली मनःशांती ढळायला सुरुवात होते.
मग आपल्याकडून अतिविचार किंवा विचारांपासून पळ काढणे असे मार्ग निवडले जातात. हे सर्व असह्य होत असेल तर मनःशांतीसाठी ध्यानधारणा किंवा योगसाधनेचा आधार घेतला जातो, पण तिथेही आपलं मन काही एकाग्र किंवा शांत होत नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण ओढून ताणून आपल्या चेहऱयावर धारण केलेले मुखवटे. जेव्हा आपण खरोखर स्वतःला शोधत असतो, स्वतःशी प्रामाणिक होत ‘मी कोण?’ याचा शोध घेत असतो तेव्हा हे मुखवटे आपल्याला आपला आरसा दाखवत असतात आणि आपली स्वतःची मूळ ओळख आपल्यालाच करून देत असतात. त्यामुळेच आपल्या मनाचे द्वंद्व सुरू होत ‘स्व’चा शोध सुरू होतो.
अशा वेळी हा आरसा आहे तसा बघणं, स्वतःला प्रामाणिकपणे आहे तसं स्वीकारणं किंवा नाकारणं हे सर्वस्वी आपल्या हातात असतं. एकदा का स्वीकारायचं ठरवलं की, पुढच्या सगळ्याच गोष्टी सोप्या होत जातात. म्हणजेच,
z तणावमुक्त जीवन
z आनंदी, समाधानी मन
z मनमोकळा स्वभाव
z आत्मविश्वास
z स्वतःच्या भावनांवर ताबा
अशा हव्याहव्याशा गोष्टी आपसूकच मिळत जातात, पण एकदा का या मुखवटय़ांच्या आहारी जायचं ठरवलं तर मात्र नुकसान होतं. जे आधीपासूनच लक्षात न येता हळूहळू कळत जातं. हे नुकसान म्हणजेच,
z चिडचिड होणे
z भावनावेग होणे
z स्वतःच्या बोलण्या, वागण्यावरचे नियंत्रण सुटले
या सर्व मनस्तापातून जायचे नसेल तर आपल्या या मुखवटय़ांवर जास्त अवलंबून न राहता स्वतःच्या ‘आंतरिक आवाजा’वर (Inner Voice) जास्तीत जास्त विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागणे श्रेयस्कर!
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
n [email protected]




























































