पुस्तकाच्या पलीकडे… ठिपक्यांची रांगोळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. अनिल कुलकर्णी

पुस्तकांच्या पलीकडेच खरा जीवनाचा संघर्ष पदोपदी जाणवतो. तो सोडवण्यासाठी पुस्तकातलं ज्ञान उपयोगी नक्कीच पडतं, पण प्रसंग जगताना केवळ पुस्तपं वाचून जमत नाही, तर माणसांना वाचता यायला हवं, माणसांचं निरीक्षण करता यायला हवं, माणसांना जपता यायला हवं, माणसांच्या भावना गोंजारता यायला हव्यात, माणसांमध्ये चैतन्य फुलवता यायला हवं. मैत्रीचं नातं विकसित करता यायला हवं. म्हणजे मग जीवन सुसह्य होतं. पुस्तकातली माणसे केवळ वाचण्यासाठी नसतात, तर त्यांचा आदर्श आपल्यामध्ये उतरवण्यासाठी असतात. पुस्तकातली वाक्यं केवळ पाठ करण्यासाठी नसतात, तर जगण्याला आधार देणारी असतात, जगणं शिकवणारी असतात. आशय केवळ परीक्षेसाठी पाठ करण्यासाठी नसतो, तर जीवनात जे वेगवेगळे विषय येतात त्याची उकल करण्यासाठी असतो. एकत्र जमून आनंद शोधता यायला हवा. आनंदाचे क्षण आणि जागा शोधता आल्या की, जगणं सुलभ होतं.  

आनंद शोधण्यासाठी पुणे येथील रमणबाग प्रशालेच्या 1953-54 या वर्षांतल्या विद्यार्थिनी ज्या आता 84 पुढील आजी झाल्या आहेत, त्यांनी पुस्तकातल्या  व पुस्तकांच्या पलीकडच्या आनंदाचे क्षण मिळवण्यासाठी एकत्र जमण्याचे ठरवले. या भेटण्यात सर्वजणी वेगळेपण जपत व आपापले अनुभव, सामाजिक कार्य याबद्दल भरभरून बोलत होत्या. यामध्ये मानसशास्त्र्ा पुस्तकाच्या लेखिका श्यामला वनारसेही होत्या. 

मानसशास्त्र्ा पुस्तकात नाही, तर ते माणसांच्या सहवासात आहे, त्यांच्या मनात आहे हेच त्यांच्याकडे पाहून कळत होते. 

‘मंगलम’च्या संचालिका अमृता तळवळकर यांनीसुद्धा सर्वांचा वाढदिवस जोरदार साजरा केला. प्रत्येकीला ओवाळणं, सुगरण होऊन खाऊ घालणं, घास भरवणं हे केलं. या वयात हे कोण कोणासाठी करतं या जाणिवेने प्रत्येकीला भरून आलं. भरून येण्यासाठीच, भरून येणाऱया क्षणांसाठी कधी कधी जगायचं असतं. कोरडं जगण्यापेक्षा ते केव्हाही चांगलं. क्षणिक असली तरी रांगोळी सुख देऊन जाते तसे आयुष्यातले सुखाचे क्षणही क्षणिक असले तरी रांगोळीप्रमाणे मनाचा ताबा घेतात. 

संथ झालेला हा प्रवाह निरखता निरखता लक्षात आलं की, भेटण्याचा खळाळ तसाच आहे. कुरकुरणाऱया काठीची सोबत आहे, ऐकायला येत नाही आणि आपलं कोणी ऐकत नाही याची थोडी खंत आहे. तरी मन मात्र गाणं गुणगुणत आहे, पुनर्भेटीच्या पुनःप्रत्ययाचा आनंद. 

‘ऐ जाते हुए लम्हों जरा ठहरो, जरा ठहरो’ असंच सर्वांना वाटलं असावं. आठवणी शेअर करायला व एकमेकांना भेटायला, उत्सव, आनंद साजरा करायला परिपत्रक लागत नाही. इच्छाशक्ती, प्रेम व जिव्हाळा असेल तर वय आडवं येत नाही. दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी पौड इथल्या मंगलम वृद्धाश्रम येथे 84 वर्षांपुढील सर्व विद्यार्थ्यांनी वाढदिवस साजरा केला. मंगलम वृद्धाश्रम केवळ वृद्धाश्रम नाही, तर सहलीचे एक सामाजिक चळवळीचे पेंद्र बनत आहे. इथेच आपण भेटून शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करायची व एकमेकांना भेटायचे हे या विद्यार्थिनींनी ठरवले. ज्या शाळेमुळे आपण घडलो, आपलं व्यक्तिमत्त्व घडलं, समाजामध्ये नावलौकिक झाला, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे एकत्र आले. वय नाही तर सय साथ देते तोपर्यंत माणसं एकमेकांना प्रेम असेल तर नक्कीच भेटतात. ऑनलाइन जमान्यात भेटी दुर्मीळ झाल्या आहेत. कमेंट, स्मायली, शेअरने वेळ मारून नेली जात आहे. 

समोरासमोर भेटण्याचा, गप्पा मारण्याचा, चेहरे वाचण्याचा आनंद, एकमेकांशी शेअर करण्याचा आनंद मानणारी पिढी अजूनही अस्तंगत झालेली नाही. 

एकमेकांना भेटायचं, सुखदुःखं वाटून घ्यायची, खुशाली समजून घ्यायची हे पुस्तकांचे, शाळेचेच संस्कार आहेत. प्रेम करणं, प्रेम कसं करावं,  सुख कसं वाटावं, हे पुस्तकात नसतं, तर ते पुस्तकांच्या पलीकडे असतं. तेच आपण शोधायचं असतं. सुखाचे क्षण ऑफलाइनमध्येच  येतात. ऑनलाइन जग आभासी आहे. आभासी जगात माणसं रमत नाहीत. प्रिय माणूस ऑफलाइनच हवा. क्षण येती, विरुनी जाती, पण आनंदाचे उत्सव मात्र स्मृतीत राहती हेच खरं.  

– [email protected]