
>> डॉ. अ. ल. देशमुख
कोरोना महामारीने संपूर्ण जगाला, विशेषकरून मानवी जीवाशी संबंधित असलेल्या सर्वच क्षेत्रांना बाधित केलं आहे. खोल जाऊन विचार केला तर या सर्व क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त नुकसान झालंय ते म्हणजे शिक्षणक्षेत्राचं. राज्यातील शाळा-महाविद्यालये जवळपास दोन वर्षे बंद होती. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांवर शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक स्तरावर तात्पुरते आणि कायमस्वरूपी काही परिणाम झाले असून ते अभ्यासणे, समजून घेणे महत्त्वाचे आहे.
ऑनलाइन अध्यापनामुळे (काहींना तेही मिळाले नाही) विद्यार्थ्यांच्या पाठ्य घटकांमधील संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत. मोबाईल, लॅपटॉप वापरणे किंवा प्रत्येक गोष्टीचे फक्त स्क्रीनशॉट घेणे यामुळे विद्यार्थ्यांचा वाचनाचा आणि लेखनाचा वेग मंदावला आहे. शुद्धलेखनाच्या चुकांत वाढ झालेली आहे. जोडाक्षर, अवघड स्पेलिंग्ज लिहिता येत नाहीयेत. शिकण्याची, अभ्यास करण्याची लिंक तुटली आहे. त्यामुळे मुले अभ्यासापासून दुरावली आहेत, त्यांना अभ्यास करण्याचा कंटाळा आलाय. त्यात गोडी राहिली नाहीये. शिक्षकांच्या अध्यापनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं प्रमाण (अटेन्शन स्पॅन) कमी झालंय. बेफिकीर वृत्ती वाढली आहे. शारीरिक हालचाली मंदावल्यात. स्वभावात चिडचिडेपणा वाढलाय. सततच्या तणावाने अंतर्मनावर नकारात्मक अदृष्य आघात झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची कार्यक्षमता आणि आत्मविश्वास कमी झाला आहे. विद्यार्थ्यामध्ये धाक, भीती, आदर, सकारात्मकता, जोश, आव्हान पेलण्याची क्षमता, शिस्त राहिलेली नाही. विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला असून ते प्रभावी, स्वमत प्रगट करू शकत नाहीत. भाषा विषयातल्या उपयोजित लेखनामध्ये हे जाणवते. कोरानामुळे विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन कमतरता किंवा अक्षमता हा प्रश्न निर्माण झाला आहे. समूह किंवा मित्रांचा सहयोग बंद झाल्यामुळे मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या विद्यार्थ्यांची फार मोठी हानी झाली आहे.
आता शाळा सुरू झाल्या आहेत. दहावी, बारावीच्या तर बोर्ड परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. शैक्षणिकदृष्ट्या झालेली हानी शंभर टक्के भरून काढणे शक्य नसले तरी काही प्रमाणात भरून काढण्यासाठी शासन, शाळा, शिक्षक आणि पालक यांनी सर्वसमावेशक आणि व्यापक नियोजन करण्याची गरज आहे. आपल्यासमोर हे आव्हान आहे, शिवधनुष्य आहे. ते पेलणारे धनुर्धर आपण आहोतच यात तिळमात्र शंका नाही.
शाळा सुरू झाल्या असल्या तरी अजून उपस्थितीचा प्रश्न (समस्या) आहे. काही ठिकाणी त्या एक दिवसाआड याप्रमाणे सुरू आहेत. शिक्षक त्यांचा ‘पोर्शन’ पूर्ण करण्यात (पळवण्यात) गर्क आहेत. मित्रांनो, नुसता पोर्शन पूर्ण करून आता चालणार नाही. त्याबरोबरीने आपल्याला विद्यार्थ्यांची मानसिकता सकारात्मक करणे, मनातला न्यूनगंड काढणे, भीती कमी करणे, सतत प्रोत्साहन देणे, लेखनाचा सराव करून घेणे, रोज वाचनाची अनुभूती देणे, नवनव्या अभ्यास स्वयंअध्ययन-स्वयंमूल्य मापनाच्या पद्धती सांगणे, नावीन्यपूर्ण आणि कृतीशील अध्यापन करणे, गृहपाठ देणे हेही काम आपल्याला करायचे आहे. हे केले तरच विद्यार्थी खऱ्या अर्थाने पुन्हा उभारी घेतील आणि परीक्षेत यशस्वी होतील.
पाठ्यक्रमाची पुढील गटांत विभागणी करावी.
1. सेतू अभ्यासक्रम
2) स्वयंअध्ययनासाठीचे सोपे घटक
3) ऑनलाइन शिकवण्याचा भाग
4) वर्गात शिकवलाच पाहिजे असा जास्तीत जास्त काठिण्य पातळी असलेला पाठ्यक्रम
याप्रमाणे नियोजन करून कार्यवाही झाली तर बऱ्याच समस्या कमी होतील. पाठ्यक्रमाच्या विभागणीनंतर शाळेच्या (वर्गाच्या) दैनंदिन वेळापत्रकातही आपल्याला काही उपयुक्त बदल करावे लागतील. भाषा विषयाच्या शिक्षकांनी आपल्या सप्ताहातील तासिकांपैकी एक तासिका लेखनाला आणि एक तासिका वाचनाला द्यावी. प्रत्येक विषय शिक्षकांनी वर्गात रोज दहा मिनिटे अनुलेखन (डिक्टेशन) द्यावे. तरच विद्यार्थ्यांचे लेखनावर प्रभुत्व निर्माण होईल. असे न केल्यास तुमचा ‘पोर्शन’ पूर्ण होईल; पण मुलांना तो उत्तरपत्रिकेत लिहिता आला नाही तर त्याचा काय उपयोग?
आपण म्हणाल, हे सगळं कसं करणार? शक्य आहे का? वेळ किती देणार आणि कुठून आणणार? खरं आहे. यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन तास शाळा जास्त भरवणे. याला दुसरा पर्याय काहीही नाही. संपूर्ण पिढी घडवायची जबाबदारी आपली आहे. आपण त्यासाठी सक्षम, समर्थ, सबल ही आहोत फक्त आपली मानसिकता हवी.
विद्यार्थ्यांची जबाबदारी
इयत्ता पहिली ते दहावी या संपूर्ण प्रवासात सर्वात सोपा प्रवास आणि सोपी परीक्षा दहावीची आहे. फक्त त्याचे स्वरूप (सिस्टिम) विद्यार्थांनी नीट समजून घेतले पाहिजे. मार्च 2022 च्या बोर्ड परीक्षेसाठी शासनाने प्रत्येक विषयाचा 25 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. त्यावर प्रश्नपत्रिकेत प्रश्न येणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याने, पालकांनी हा कमी केलेला अभ्यासक्रम नीट माहिती करून घ्यावा.
अभ्यासपद्धती / स्वयंअध्ययन
दहावीच्या उत्तरपत्रिकेत मुद्द्यांना गुण असतात. प्रत्येक विषयातील मुद्दे लक्षात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना खिशात मावेल अशी प्रत्येक विषयासाठी छोटी वही करावी. या वहीत फक्त मुद्दे, महत्त्वाचे शब्द, तत्ते, सूत्रे लिहून काढावीत. मोकळा वेळ मिळेल तेव्हा ही वही सतत वाचावी. उत्तरातले सार पाठ होऊन जाईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
बोर्डाच्या प्रत्येक विषयाच्या कृतिपत्रिकेत (प्रश्नपत्रिकेत) सर्वसाधारणपणे 80 टक्के प्रश्न पाठ्यपुस्तकातील धडा संपल्यानंतर जे स्वाध्याय दिलेले आहेत त्यातले विचारले जातात. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वाध्यायासाठी स्वतंत्र वही करावी व त्यामध्ये उत्तरासह स्वाध्याय लिहून काढावेत. त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी तर होईलच; पण त्याबरोबरीने लेखनाचाही सराव होईल आणि आत्मविश्वास वाढेल.
आकलनासहीत वाचन
मी खूप वाचतो, पण माझ्या काही लक्षातच राहत नाही. प्रत्यक्ष परीक्षेत काही आठवत नाही, अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी सर्वत्र दिसून येतात. यासाठी आपली वाचन पद्धती बदलून ती ‘आकलनासहित वाचन’ या पद्धतीने करायला हवी. यासाठी प्रत्येक विषयातल्या प्रश्नांना, उपप्रश्नांना संक्षिप्त रूप द्यावे. पाठ्यक्रम, घटक वाचताना महत्त्वाच्या घटकाला अधोरेखित करुन त्यावर कोणता प्रश्न येईल हा विचार करावा.
स्वयंमूल्यमापन
अ) प्रश्न काढणे ब) मॉडेल ऍन्सर अभ्यासणे क) स्वतः उत्तरपत्रिका तपासणे.
ब) मूल्यमापन प्रक्रिया : दहावीच्या मूल्यमापनाचे दोन भाग आहेत. 1) अंतर्गत मूल्यमापन 2) बहिस्थ मूल्यमापन. अंतर्गत मूल्यमापनात प्रत्येक विषयाला 20 याप्रमाणे सहा विषयांचे मिळून एकूण 120 गुण आहेत. अंतर्गत मूल्यमापन शाळा घेते, शाळेत होते. यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेत आवश्यक ते सबमिशन आणि शालेय काम वेळेत पूर्ण करावे. गृहपाठ, स्वाध्याय, प्रात्यक्षिके वेळेत पूर्ण करून द्यावीत. पालकांनीही यासाठी सतत शाळेच्या संपर्कात राहावे. बहिस्थ मूल्यमापन म्हणजे 15 मार्चपासून होणारी बोर्डाची लेखी परीक्षा प्रत्येक विषयाला 80 याप्रमाणे सहा विषयांचे मिळून एकूण 480 गुण यासाठी आहेत. अंतर्गत मूल्यमापन 120 गुण- बहिस्थ मूल्यमापन 480 गुण- मिळून एकूण 600 गुणांची ही परीक्षा आहे.
(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आहेत.)



























































