पुस्तकाच्या पलीकडे…गोष्टींची शाळा

>> डॉ. अनिल कुलकर्णी

आयुष्याच्या उत्तरार्धातच अनेकांचे सुप्त गुण विकसित होतात. कुटुंबात, शाळेत सुप्त गुण ओळखण्याची कोणतीच यंत्रणा नाही. केवळ अभ्यास एके अभ्यास याचा मारा झाल्यामुळे विद्यार्थी झापड लावल्याप्रमाणे परीक्षेतील यश, गुणवत्ता यादी याच्याकडेच लक्ष दिल्यामुळे, इतर सुप्त गुणांना वाव मिळत नाही. आपल्या सुप्त गुणांचा आवाका आपल्यालाच माहीत नसतो, कारण आपल्याला व्यक्त होण्याची संधी व व्यासपीठ मिळण्याची शक्यता, पुस्तकांच्या पलीकडे विचार न करण्यामुळे मिळतच नाही.

मुलांना केवळ पुस्तकामधून शिकण्याचा जेव्हा पंटाळा येतो तेव्हा असाच एक नावीन्यपूर्ण उपक्रम बालाजी जाधव हे आपल्या जि. प. प्रा. शाळा, तालुका माण, जिल्हा सातारा, विजयनगर शाळेत राबवतात. पहिली ते चौथीच्या शाळेत हे एकटेच शिक्षक आहेत. चार वर्गांना शिकवताना अनेक पद्धती शिकवताना त्यांना हे जाणवले की मुलांना गोष्टी फार आवडतात. त्या गोष्टी तीन-चार महिन्यांनी सांगितल्या तरी मुलांना लक्षात राहायच्या. मग त्यांच्या मनात विचार आला की, पुस्तकांच्या जर गोष्टी बनवल्या तर! या उपक्रमाला ‘गोष्टींची शाळा’ हे नाव द्यायचे ठरवले. कुठल्याही पाठाच्या गोष्टी आधी त्यांनी बनविल्या. पाठ शिकवायला तीन-चार तास लागायचे ते गोष्टीच्या माध्यमातून एका तासात विद्यार्थ्यांना समजायचे. शिकवणं सोपं व्हायचं व मुलांचं समजणं सोपं व्हायचं.

डोळे बंद करून गोष्ट आठवायला शिकवलं आणि पहिल्या आठवडय़ात पुन्हा 60 टक्के मुलांनी बरोबर गोष्ट सांगितली. एकमेकांचं पाहून मुलं या पद्धतीने शिकायला लागली. एकमेकांना गोष्टी सांगू लागले, मग त्यांना गटात पाठावर गोष्ट तयार करण्याचे काम सांगितले.

इतिहास, परिसर अभ्यास हे पाठ वाचून मुले त्याच्यावर गोष्टी करू लागले. चार आठवडय़ांनंतर प्रत्येकाने कोणती गोष्ट तयार केली त्याचे वाचन सामूहिकरीत्या केले. समजपूर्ण वाचन मुले करू लागली, आकलन त्यांचं होऊ लागलं, स्मरणही त्यांचं चांगलं व्हायला लागलं. ज्या मुलांची गती कमी होते तेसुद्धा गोष्टी ऐकू ऐकून सांगू लागले. गणिताच्या घटकांवरही मुले गोष्टी तयार करू लागले. स्वतंत्र वही करून त्याला ‘गोष्टींची शाळा’ असे नाव देऊन त्यात ते गोष्टी लिहू लागले.
नंतर गोष्ट कशी लिहावी, त्यातल्या चुका कशा टाळाव्यात, त्याचा आरंभ व शेवट कसा करावा हे मुलं समजू लागले. गोष्टीत कुतूहल कसे निर्माण करावे हेही शिकले. अशा रीतीने पहिली ते चौथीचा अभ्यासक्रम संपूर्ण गोष्टीरीत्या तयार केला. कमी कालावधीत हा अभ्यासक्रम गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केला. अपूर्ण गोष्टी पूर्ण करणे, तीन-चार शब्दांवरून गोष्ट तयार करणे, कल्पकतेने गोष्टी तयार करणे.

विद्यार्थ्यांनी अशा 60 ते 70 गोष्टी तयार केल्या. त्यांचे वय आठ ते दहा वर्षे होते. लिहिलेली गोष्ट लॅपटॉपवर रेकॉर्ड केली. अशा रीतीने गोष्टी रेकॉर्ड करणे विद्यार्थ्यांनी सुरू केलं. यामुळे त्यांचं भाषणकौशल्य सुधारलं. मुलं भविष्यात निवेदक होतील, वार्ताहर होतील. लहानपणापासूनच त्यांना शिकायला मिळाल्यामुळे मुले व्यक्त होऊ लागली, बोलू लागली. कमी वेळेत लक्षात राहणारा अभ्यास होतो हे विद्यार्थ्यांना पटले. ज्यांना शाळेत येऊ वाटत नव्हतं, पण या उपक्रमामुळे त्यांना शाळेत यावं असं त्यांना वाटायला लागलं, हे काय कमी आहे. कौशल्ये विकसित केली की जीवन सुसह्य होतं.

[email protected]