आंतरजालाचं  मायाजाल व भवताल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अनिल कुलकर्णी

आंतरजालाच्या जाळ्यात तरुण पिढी कोळ्याप्रमाणे अडकली आहे. सध्या लॉकर रूमने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. देश केवळ वैधानिक इशाऱयांनी चालत नाही, तर शिस्तीने चालतो. वैधानिक इशारा म्हणजे स्वैराचाराला दिलेलं प्रमाणपत्र आहे. अश्लीलता संस्कृतीस घातक आहे, हा वैधानिक इशारा अजून आला नाही.

प्रेमाला उपमा नसते, वासनेला प्रतिमा नसते. वासना ऑक्टोपसप्रमाणे असते, आकारहीन असते. प्रत्येक माणसात राक्षस असतो व माणसातला राक्षस केव्हा जागा होईल हे सांगता येत नाही. जसं ऑक्टोपस केव्हा आकार बदलेल ते सांगता येत नाही. मनातील मळभ दूर करण्यासाठी होळीत शिव्या देण्यापलीकडे आमची मुलं कधी पुढे गेली नाहीत, पण  शाळेतील मुलं फेक अकाऊंट उघडतात आणि अश्लीलतेच्या चर्चा करून बलात्कारापर्यंत जातात, तेव्हा पालकांनी नक्कीच गांभीर्याने ही बाब घ्यायला हवी. याआधीची पिढी अभिजात वाङ्मय, अध्यात्मावर, नैतिकतेवर पोसली गेली. अपयश ही यशाची पहिली पायरी असते म्हणून प्रेम ही पहिली पायरी सोडून त्यांनी एकदम वासनेची पायरी गाठली. हे भयावह आहे. पालक सुधारले तरच बालके सुधारतील. प्रेमचंद, शरदचंद्र, पु.ल. देशपांडे, कुसुमाग्रज ही नावेही माहीत नसलेली व माहीत करून घेण्याची गरजही वाटत नसलेली पिढी पालकांसाठी डोकेदुखी व आव्हान ठरत आहे.

अनेक नियंत्रित, अनियंत्रित गोष्टींचा वावर आमच्या सभोवताली आज आहे. आम्हीच तो निर्माण केला आहे. बॉईज लॉकर रूम हे हिमनगाचे केवळ टोक आहे. एका उच्चभ्रू समाजाच्या कार्पामात अश्लीलता बोलली जात होती. निर्भया प्रकरण झाले तरी निर्भयपणे स्त्राr विटंबना चालूच आहे. नको त्या वयात नको ते पाहिलं की, मुलं अस्वस्थ होतात, उद्ध्वस्त होतात. अभ्यासाची चर्चा न करता अश्लीलतेची चर्चा करून सामूहिक बलात्काराचा गृहपाठ करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. गेम खेळून मुले मृत्यूला कवटाळत आहेत, बलात्काराचे नियोजन करत आहेत तरी काही संकेतस्थळे बंद होत नाहीत. काही घरांत जेव्हा भ्रष्टाचाराने लक्ष्मी नांदते हे मुले पाहतात, तिथे नैतिकता खुंटीला टांगलेली असते. पॉर्न पाहण्यात हिंदुस्थानचा तिसरा ाढमांक आहे.

कालांतराने प्रेम, अनुनय, शृंगार, प्रणय, यौवन या शब्दांना अर्थ राहणार नाही. वासना हीच जीवनाची इतिकर्तव्यता आहे, असे वाटणारा एक वर्ग तयार होत आहे. आदर्श माणसे जेव्हा लॉकअपमध्ये जातात तेव्हा आदर्श केवळ पुतळ्यात उरतात. पूर्वी संस्कारांचा वावर कुटुंबात, समाजात असे. आज विकारही आमच्या उंबरठय़ाबाहेरच नाही, तर आतही आला आहे.

तंत्रज्ञानाचा वावर व वापर इतका प्रचंड प्रमाणात वाढला की, भावनेला पायदळी तुडवून अनेक चांगल्या गोष्टी लॉकरमध्ये टाकून घराचे लॉकर रूम केव्हाच झाले आहे. मुलांच्या नशिबात ‘श्यामच्या आई’ची कुशी नाही, तर मोबाइलच्या कुबडय़ा आहेत. ‘प्रेमस्वरूप आई’ हे त्यांच्या कानावर पडतच नाही, तर ‘हॅपी मदर्स डे’ एवढेच त्यांच्या कानावर पडतं. पूर्वीची पिढी पालकांच्या धाकात होती, जी आज बालकांच्या  धाकात आहे. अश्लीलता घरात आली आहे, मालिकेतही आली आहे. चित्रपटात, साहित्यात आली आहे. संस्कारांचा टिपकागद किती पुरणार! मनाला लॉकडाऊन करता येत नाही. कारण मन भरकटतं. वासना केवळ झिरपत नाही, तर त्याच्या प्रचंड धबधब्याखाली तरुण पिढी न्हाऊन निघत आहे. वयात यायच्या आधीच मुलांनी वासनेचा रस्ता धरला आहे. भवताल जेव्हा लय हरवून बसते तेव्हा जीवनाचा ताल बिघडतो.

घरच्यांबरोबर नको ते मुले पाहतात. मुलेही  शॉक अब्सॉर्बर झाली आहेत. रक्तात काय भिनते याला खूप महत्त्व आहे, संस्कार की विकार? त्यांच्या समोर निसर्ग येतच नाही. फक्त अश्लीलतेचा संसर्ग येतो.

माणसे नाहीशी होतात, पण त्यांच्या विचारांचा पगडा नकळत आपल्यामध्ये असतो. व्यक्तिमत्त्व परिपक्व होते. तंत्रज्ञानाचा वावर एवढा वाढला की, मरणासन्न माणसाला वाचवण्याचे सोडून  लाईव्ह चित्रीकरण करून व्हायरल करण्यात धन्यता मानली जात आहे. लता, पु.ल., शेक्सपियर यांचा वावर आजही व्यक्तिमत्त्वाला आकार देतो. मुलांना चांगले ऐकू द्या, चांगलं पाहू द्या, आस्वाद घ्यायला शिकवा, रसग्रहण करायला शिकवा, निसर्गाचं देणं, नक्षत्राचं देणं, शरदाचं चांदणं, शब्दांच्या पलीकडे जायला शिकवा. हतबल पालकांनी कठोर व्हायची वेळ आली आहे. अनैतिकतेला लॉकरमध्ये टाकायची वेळ आली आहे.

[email protected]