संचित : नियतीला पडलेलं सुरेल स्वप्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अरविंद नेरकर

काही जण जन्माला येतानाच विशिष्ट संचित घेऊन जन्माला येतात. हा अनमोल ईश्वरी ठेवा सांभाळत त्याचं संवर्धन करतात आणि आपल्या कर्तृत्वानं सोन्यासारखी झळाळी देतात. कलेकलेने वाढणाऱया चंद्राप्रमाणे त्यांनी मिळवलेलं यश खुलून दिसतं. सुप्रसिद्ध गायिका चारुशीला बेलसरे यांच्या लौकिक प्राप्तीचा आलेख असाच वाढत वाढत गेला आहे.

वयाच्या तिसऱया वर्षी आईच्या कडेवर असताना चारुशीलाने विठ्ठलाचे भक्तिगीत गायले. त्याचे शब्द होते – ‘विठ्ठला समचरण तुझे धरिते’. चारुशीलाने आपल्या गोड आवाजाची झलक या गाण्याने दाखविली. वडील उत्तम तबलावादक, आई उत्कृष्ट आवाजाची आकाशवाणी केंद्राची गायिका या दोघांच्या शिकवण्यातून चारुशीला गायनाचे पाठ शिकू लागली. हळूहळू तिचा सुरेल आवाज, मेहनत यातून पहिला जाहीर कार्यक्रम करण्याची तयारी झाली. आई सुरेखाताई आणि वडील सुरेशराव या दोघांच्या पाठबळातून 15 फेब्रुवारी 1970 रोजी चारुशीलाचा पहिला जाहीर कार्यक्रम निश्चित झाला. या कार्यक्रमाचे ठिकाण होते बालमोहन विद्यामंदिर, दादर येथील सभागृह. या कार्यक्रमास दैनिक ‘मराठा’च्या संपादक शिरीष पै, संगीतकार प्रभाकर जोग, राम वढावकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर प्रमुख पाहुणे होते. यावेळी हृदयनाथ मंगेशकर यांनी चारुशीलाच्या गायन कौशल्याचे मनापासून कौतुक करून चारुशीलाला ‘बाललता’ अशा शब्दांत गौरवले.

या कार्यक्रमानंतर पुणे येथील स्वरसंगम आयोजित लक्ष्मी क्रीडा मंदिरातील चारुशीलाचा कार्यक्रम म्हणजे चारुशीलाला मिळालेले प्रशस्तिपत्र ठरला. या कार्यक्रमास पद्मभूषण हिराबाई बडोदेकर, भावगीत गायक गजानन वाटवे, संगीत तज्ञ आबासाहेब मुजुमदार उपस्थित होते. या सर्वांनी या छोटय़ा गायिकेची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

सन 1970 ते 1972 या काळात चारुशीलाने आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांवर मोहिनी घातली. दिल्लीत महाराष्ट्र रंगायतन या नाटय़ चित्रमंदिरात ऑक्टोबर 1972 मध्ये मराठी नाटय़ोत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवासाठी नामदार यशवंतराव चव्हाण, अण्णासाहेब शिंदे, हरिभाऊ गोखले यासारखे रसिक मातब्बर उपस्थित होते. याप्रसंगी स्नेहवर्धक मंडळाने चारुशीलाच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करून या छोटय़ाशा मुलीला संधी दिली. चारुशीलाने या संधीचं सोनं केलं. खुद्द यशवंतराव चव्हाणांनी चारुशीलाचा मंजुळ आवाज ऐकून ‘गायनातील चमत्कार म्हणजे चारुशीलाचं गाणं’ अशा शब्दांत चारुशीलाला शाबासकी दिली.

दिल्लीच्या यशस्वी वाटचालीनंतर 27 नोव्हेंबर 1972 रोजी खाडिलकर जन्मशताब्दीनिमित्त मुंबई दूरचित्रवाणीवर संगीत ‘मानापमान’मधील ‘चंद्रिका ही जणू…’ हे कठीण गीत गायले. बडय़ा बडय़ा कलाकारांनी रूपक तालातील या गीतास आपले कसब पणास लावले हाते. हे गीत सादर करून चारुशीलाने गायनावरील आपलं प्रभुत्व सिद्ध केलं.

28 जून 1973 रोजी संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांना चारुशीलाचे गायन ऐकण्याचा योग आला. सुधीर फडके हे चारुशीलाचे गायन ऐकून एवढे खूश झाले की, ते स्वतः संगीत देत असलेल्या ‘कार्तिकी’ चित्रपटात पार्श्वगायिका म्हणून त्यांनी चारुशीलाची निवड केली. चारुशीला पार्श्वगायिका म्हणून परिचित झाली. चारुशीलाने गायलेल्या गीताचे शब्द होते ‘अशी नटून थटून साजरी आता माझी वहिनी येईल घरी’. त्यानंतर ‘बाईनं केला सरपंच खुळा’ या चित्रपटात ‘गौरिहरा दीनानाथा धरीन तुझे पाय’, ‘चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी’ या चित्रपटात ‘नाच गं घुमा कशी मी नाचू’, ‘पाच रंगाची पाच पाखरं’ या चित्रपटात ‘मंद मंद ही हवा थंड थंड पाणी’ आणि ‘आता गं पोरी हळू चाल जोडवं टचकलं’.

मुंबईत आईवडील नोकरीस असल्याने चारुशीलाने बेबी तबस्सुम यांच्या तबस्सुम हिट परेड या कार्यक्रमात हिंदी चित्रपट गीते गायला सुरुवात केली. विशेष उल्लेख करायचा तर चारुशीलाने गायलेल्या ‘मैं तुलसी तेरे आंगन की’, ‘गुमनाम है कोई’, ‘डफलीवाले डफली बजा’, ‘इन्ही लोगों ने ले लिना दुपट्टा मेरा’, ‘सागर किनारे’, ‘ठंडी हवाएं’ यांसारख्या गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली. इ.स. 1982 ते 1987 या काळात तब्बसुम यांच्या 2000 हून अधिक कार्यक्रमात चारुशीलाने सहभाग दिला.

संगीत कार्यक्रमाशिवाय चारुशीलाने ‘यज्ञ’, ‘दुभंग’, ‘प्रतापगड’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’, ‘दुर्गा झाली गौरी’ या पाच नाटकांत पार्श्वगायन केले. विशेष म्हणजे ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकातील दुर्गेची गीते चारुशीलाच्या आवाजात असून आजही ती लोकप्रिय आहेत. याच काळात चारूशीला बेलसरेच्या आवाजातील ध्वनिफिती प्रकाशित झाल्या. त्यात प्रामुख्याने दशरथ पुजारी यांच्या ‘लावणीचे लावण्य’, ‘लावणी’ तसेच प्रभाकर पंडित यांच्या ‘भक्ती संगीत’ ध्वनिफितींचा समावेश आहे.

मुंबई आकाशवाणी संगीत कार्यक्रमात तसेच मुंबई दूरदर्शनवरील संगीत कार्यक्रमातही चारुशीलाने गायन केले आहे. महाराष्ट्रातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्था, शैक्षणिक संस्थांनी आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमात चारुशीलाने गायन केले.

सन 1990 मध्ये मुंबईहून पुण्याला येऊन स्थायिक झाल्यावर ‘हिटस् ऑफ लता’ या लता मंगेशकर यांनी पूर्वी गायलेल्या व गाजलेल्या हिंदी चित्रपटांतील गीते चारुशीलाने आपल्या आवाजात गायली आणि ही ध्वनिफीत प्रकाशित झाली. या ध्वनिफितीचे वैशिष्टय़ असे की, या ध्वनिफितीचे प्रकाशन लंडनमध्ये झाले. लंडनमधील तसेच इतर देशांतील रसिकांनाही या ध्वनिफितीने श्रवणानंद दिला.

चारुशीलाचे पदवी व पदव्युत्तर संगीत शिक्षण मुंबईत झाले होते. पुण्यात आल्यावर सन 1990 ते 1995 पर्यंत त्यांनी पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र व एस.एन.डी.टी. विद्यापीठात संगीत विभागात प्राध्यापक म्हणून कार्य केले. यादरम्यान पंडित भीमसेन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली चारुशीलाची संगीत साधना सुरू होती. संगीत साधनेत रियाजाला पुरेसा वेळ मिळाला पाहिजे या पंडितजींच्याच सल्ल्यानुसार चारुशीलाने पूर्णवेळ संगीत सेवेला वाहून घेतले.

संगीताच्या क्षेत्रात नवनवीन उपक्रम करता यावेत यासाठी ‘स्वरगायत्री प्रतिष्ठान’ व ‘स्वरमहिमा कला अकादमी’ या संस्थांची चारुशीलाने निर्मिती केली. या संस्थांमार्फत सामाजिक जाणिवेतून विविधस्पर्शी कार्य केले जाते. ‘रंग भक्तीचे’, ‘स्वरांच्या हिंदोळय़ावर’, ‘मन हे रामरंगी रंगले’, ‘दिंडी चालली चालली’, ‘पांडुरंगी मन रंगले’, ‘स्वरगायत्री’, ‘गीतरामायण’, सप्तसूर रंगले’, ‘राग एक रंग अनेक’ अशी नाटय़-चित्रपट गीते, भक्तिगीते, सुगम संगीत, शास्त्र्ााrय संगीत कार्यक्रम चारुशीला बेलसरे सादर करते. आतापर्यंत एकटय़ाने गायिका या नात्याने तिने सादर केलेल्या कार्यक्रमांची संख्या 11 हजारांहून अधिक आहे. वयाच्या 11 व्या पहिल्या जाहीर कार्यक्रमाने सुरू झालेला चारुशीला बेलसरेचा संगीत प्रवास अखंडपणे तब्बल 50 वर्षे इतक्या प्रदीर्घ कालावधीत चालू आहे. आवाजाची देणगी लाभलेल्या चारुशीला बेलसरेच्या विविध कार्यक्रमांत रसिक मंत्रमुग्ध झाले आहेत. चारुशीला बेलसरेच्या आवाजातील 51 ध्वनिफिती प्रकाशित झाल्या आहेत. या ध्वनिफितींना संगीत तिने स्वतः दिले आहे.

स्वरमहिमा कला अकादमीच्या माध्यमातून चारुशीलाने ‘शब्दगंधार’ दिवाळी अंकाची कल्पना 10 वर्षांपूर्वी साकारली. या अंकाची संपादक पदाची जबाबदारी ती सांभाळत असून गेली 10 वर्षे हा अंक अखंड प्रकाशित होत आहे. याशिवाय स्वरमहिमा प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशिका या नात्याने विविध क्षेत्रांतील लेखक, कवी यांचे कथासंग्रह, लेखसंग्रह, आत्मचरित्र, कवितासंग्रह अशी 26 पुस्तके पाच वर्षांत प्रकाशित केली आहेत.

चारुशीला बेलसरे स्वतः उत्तम लेखिका, कवयित्री असून ‘सुगम संगीत मंत्र व तंत्र’, ‘गायत्री मंत्र महिमा’, ‘महिमा शंकराचा’, ‘व्याधी निवारण करणारे मंत्र’ तसेच ‘शब्दमोहिनी’ कवितासंग्रह यापूर्वीच प्रकाशित झाले आहेत.

लेखिका, कवयित्री, संपादक, प्रकाशक या विविधस्पर्शी कार्यातून चारुशीला बेलसरे सर्वपरिचित आहेत. आपल्या सुमधूर आवाजाने रसिकमोहिनी ठरलेली गायिका चारुशीला बेलसरे म्हणजे नियतीला पडलेलं सुरेल स्वप्न!

27 नोव्हेंबर 1972 रोजी मुंबई दूरचित्रवाणीवर संगीत ‘मानापमान’मधील ‘चंद्रिका ही जणू…’ हे कठीण गीत गायले. हे गीत सादर करून गायिका चारुशीला यांनी गायनावरील आपलं प्रभुत्व सिद्ध केलं. चारुशीला बेलसरे यांच्या सांगितिक प्रवासास नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली. या दीर्घ संगीतसेवेत त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.