
>> प्रा. डॉ. प्रतिभा जाधव
इतिहास आणि वर्तमान यावर टोकदार भाष्य करणारी वास्तववादी कविता म्हणजे ‘अस्वस्थ मनातील शब्द’ या काव्यसंग्रहातील कविता होय. प्रयोगशील साहित्यिक व संपादक असलेले डॉ. शैलेश त्रिभुवन यांचा हा दुसरा काव्यसंग्रह. यापूर्वी 2013 मध्ये त्यांचा ‘आई तू होतीस तेव्हा…’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे.
डॉ. त्रिभुवन वास्तव आयुष्यात जसे रोखठोक, स्पष्टवत्ते आहेत त्याचप्रमाणे त्यांची कविताही वास्तवावर निर्भीडपणे घणाघाती घाव घालणारी आहे. त्यांच्या कवितेत कुठेही कल्पनाविलास नाही आणि त्यांच्या कवितेला उपमा-अलंकाराचा उसना सोसही नाही. थेट भावना व भूमिका म्हणजे डॉ. त्रिभुवन यांची कविता होय.
‘अस्वस्थ मनातील शब्द’ हा काव्यसंग्रह शब्दाली प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केला असून त्यात एकूण 87 कविता आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीस सत्तर वर्षे उलटली. धर्मनिरपेक्ष देश म्हणून जगात नावलौकिक असणाऱया हिंदुस्थानात मात्र आजही विषमतावादी, जातीय, हुकूमशाही प्रवृत्ती परिघाबाहेरील समाजास पारतंत्र्यातच ठेवू इच्छितात व येनकेनप्रकारेण त्यांचे शोषण करत राहतात. सुधारणावादी, आधुनिक विचारसरणीच्या महापुरुषांनादेखील हीन लेखणारी यांची संकुचित, विघातक प्रवृत्ती न्याय, स्वातंत्र्य, समतेत मोठा अडसर ठरत आहे. याच विचारांचे प्रतिबिंब ‘अस्वस्थ मनातील शब्द’ या काव्यसंग्रहात पडलेले दिसते.
‘स्टीफन हॉकिंग बुद्धाकडे पाहत आहे’ या कवितेतून ते वास्तव स्थिती मांडतात. सीमेवर लढणाऱया जवानांच्या त्याग व समर्पण याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ‘नीतिमत्ता’ ही कविता विचारप्रवण करते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेली गदा व त्याविरोधातील आपल्या भावना ‘डोळ्यात त्यांच्या खुपत आहे’ या कवितेत ते लिहितात की,
‘आज भारताची लोकशाही मुकी झाली आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीने दुःखी झाली आहे.’
सामान्य माणसं त्यांच्या असामान्य विधायक कार्यामुळे अमर होतात हा भाव ते आपल्या ‘माणसांच्या मनामनात ’ या कवितेत व्यक्त करतात.
हल्लीच्या मूल्य, नैतिकता हरवलेल्या काळात अनेक मुखवटेधारी लोक आपल्या आसपास असतात. मुळात याच लोकांची संख्या आज अधिक दिसते ज्यांनी मेंदू गहाण ठेवले आहेत. जागतिकीकरण या विषयावरही ते टोकदार भाष्य करतात. ‘अण्णा तू झिजवलास देह’ या कवितेतून आपल्या पित्याचा त्याग व हालअपेष्टा ते अचूक मांडतात ज्या वाचकांच्या काळजाशी नेमकेपणाने छेद घेतात. ‘बाबासाहेब तुम्ही माझ्या नसानसात’ या कवितेतून बाबासाहेब हा आपल्या जगण्याचा एकमेव मूलमंत्र, एकमेव दिशा, एकमेव आदर्श आहेत हे कवी अधोरेखित करतो. ‘माणसं’ या कवितेत माणसांची नाना रूपं कवी उभी करतो,
‘माणसांनीच माणसांसाठी असते संस्कृती माणसांनीच माणसांची का करावी विकृती सत्तेसाठी काहीही करणारे राज्यकर्ते सीमेवर शहीद झालेल्या जवानांचेही राजकारण करतात आणि माणूस म्हणून आपण किती संपलोय हे दाखवून देतात. ‘निसर्गचक्र’ या कवितेतून ‘जगणं म्हणजे काय असतं?
माझं तिला, तिचं मला सांगणं असतं’ अशी जगण्याची सोपी व्याख्या ते मांडतात. बुद्ध तत्त्वज्ञान, आंबेडकरी विचारधारा हे कवीच्या जगण्याचे तत्त्व आहे ते प्रत्येक कवितेतून स्पष्टपणे जाणवते राहते. ‘दुःखाचे मूळ’ या कवितेत ते वासनेवर विजय मिळवण्यासाठी तृष्णा आवरणे गरजेचे सांगतात ती आवरली नाही तर आज अनेक बाबा बुवा जे स्वतःला देव म्हणवून घेत होते ते आज तुरुंगात असल्याची आठवण करून देतात.
स्त्राrपुरुषसमानता केंद्रस्थानी लिहिलेली ‘निमी, सुमी, उमी’ ही कविता उल्लेखनीय आहे. या कवितेतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कर्तृत्वास सलामी दिली आहे.
तथागत, शिवाजी महाराज, रमाई, अण्णाभाऊ, बाबासाहेब, शाहू, फुले, संत तुकाराम, सावित्रीमाई या दूरदृष्टी असलेल्या ऐतिहासिक महामानवांच्या कार्यास आपल्या शब्दांतून ते नमन करतात. कवीला या महापुरुषांच्या त्यागाची, कष्टाची जाणीव आहे. त्यांचे उतराई होणे शक्य नाही म्हणून किमान एक चांगला नागरिक तरी आपण होऊ या ही कवीची भावना शब्दागणिक लक्षात येते.
‘मी अस्वस्थ आहे’ या अंतिम भागातील कविता कवीची मानसिक घालमेल अचूकपणे व्यक्त करते. आजूबाजूच्या घटना, प्रसंग, अत्याचार, अन्याय कवीला सजग, संवेदनशील नागरिक म्हणून अस्वस्थ करतो. काव्यसंग्रहाच्या शेवटाकडे आपण जातो तेव्हा ‘अत्त दीप भव’ ही कविता पुन्हा ऊर्जा, ऊर्मी देऊन जाते.
अशारितीने एकंदर डॉ. शैलेश त्रिभुवन या धडपडय़ा व्यक्तिमत्वाच्या ‘अस्वस्थ मनातील शब्द’ या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता परखडपणे सत्य बोलते. ही कविता निर्भीड आहे. वास्तवाच्या अधिष्ठानावर उभी असलेली कविता आहे. सत्य बोलण्यापेक्षा सत्य पचवणे कठीण झालेल्या काळात स्पष्ट, ठाम भूमिका घेऊन लिहिणारे हातच नामशेष होताना डॉ.त्रिभुवन यांच्या लेखणीची निर्भयता, सत्यनिष्ठा साहित्यात आशावाद निर्माण करणारी एक सकारात्मक कविता आहे असे वाटते.



























































