लाल फुलांची लिपी

>> डॉ. प्रतिमा जगताप

प्रसिद्ध शास्त्रीय गायिका माणिक वर्मा यांची काल म्हणजेच 16 मे रोजी जयंती साजरी झाली. माणिकताईंनी आपल्या अवीट स्वरांनी संगीतप्रेमींचं जीवन समृद्ध केलं. अशा आरसपानी सुरांचं दालन उघडणारा हा प्रवास.

`ज रा जास्त आहे…’ यंदाच्या उन्हाळ्यात हे वाक्य कुणी म्हटलेलं ऐकायला मिळालं नाही. कारण सगळे घरातच बसलेत. उन्हाचा तडाखा, रणरणतं उन, उन्हाच्या झळा, उष्माघात हे शब्द बातम्यांमधूनही गायब झालेत. कोरोनाच्या बातम्या ऐकून, पाहून, वाचून उद्विग्न झालेलं मन खिडकीतून बाहेर डोकावू लागलं. रस्त्यावरची वर्दळ, धावपळ नाही तर झाडांच्या पानांची सळसळ ऐकू येऊ लागलीय. कबुतरांच्या दादागिरीला न जुमानता एखादी साळुंकी काहीतरी गुणगुणत पिवळं काजळ भरल्या डोळ्यांनी टुकूटुकू पहात खिडकीत, गॅलरीत बसते. सुंदर सुंदर चिमुकल्या शेपटय़ा हलवीत रंगीबेरंगी चिमण्यांसारखे पक्षी या झाडावरून त्या झाडावर जाताना दिसू लागलेत. सकाळ-संध्याकाळ हिरवे रावे थव्या-थव्यांनी उडताना दिसतात. कोकिळा तर सारखी कुहूकुहू करत असते. त्यात कावळ्यांचा कर्कश आवाजही एखाद्या झाडाच्या शेंडय़ावरून ऐकायला येतो. सांगायचा मुद्दा हा की निवांतपणा लाभलाय तर.

खिडकीतून दिसणारं निळंभोर आकाश निरखावं आणि जमिनीवर उभं असलेलं हिरव्या झाडांचं वैभव पाहावं हे मनोमनी पक्कं ठरवलं. त्याप्रमाणे मजेत वेळ जायला लागला.
एक दिवस लक्षात आलं की हिरव्या झाडांच्या गर्दीत लालजर्द फुलांचा गुलमोहर फांदीफांदीवर फुलला होता. कितीतरी वेळ मी भान हरपून पहातच राहिले. खरं म्हणजे दरवर्षी न चुकता ऋतुचक्रात फुलणारी झाडं फुलतच असतात. पण गुलमोहराचं फुलणं दरवर्षी विशेष वाटतं. माणिक वर्मा यांच्या गोड आवाजातलं गदिमांनी लिहिलेलं भावगीत कानामनात रुंजी घालू लागतं.

अंगणी गुलमोहर फुलला
लाल फुलांच्या लिपीतला हा
अर्थ मला कळला…

ग्रीष्म ऋतूमध्ये गुलमोहर फुलतो तसा पुण्यात दादरकर कुटुंबामध्ये माणिकताईंच्या रुपात `स्वरमोहर’ फुलला. दिवस होता 16 मे 1926, ऐन उन्हाळ्यात माणिकताईंचा जन्म! उन्हाळ्यात वाळ्याची झुळुक, मोगऱयाचा सुगंध, गुलमोहराचं भरभरून फुलणं या साऱया निसर्गवैभवाच्या खुणा माणिकताईंच्या जन्माने दादरकर कुटुंबाने अनुभवल्या. सुरेशबाबू, इनायत खाँ, हिराबाई बडोदेकर यांच्याकडे माणिकताईंनी गायनाचे धडे घेतले. महाराष्ट्राच्या संगीतरत्न भांडारात `माणिक’ नावाचं रत्न झळकताना दिसू लागलं. हे रत्न डोळे दीपवून टाकणारं नव्हतं तर देवघरातील शांत तेवणाऱया निरांजनाच्या प्रकाशासारखं होतं. मंदिरातल्या गाभाऱयातील नंदादीपासारखं होतं!

माणिक वर्मा यांच्याबद्दल पु.लं.नी इतकं भरभरून लिहिलंय कीं माणिकताईंचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं गाणं एकसंध होऊन नजरेसमोर येतं. पु. ल. म्हणतात, माणिक गायला लागली की तो एखादा ख्याल असो की गीत असो, ठुमरी असो की आणखी काही असो, मैफल जिंकायच्या आवेशाने ती कधी गात नाही. मैफलीत तिचे येणे, तंबोरा घेऊन बसणे आणि गायला सुरुवात करणे, सगळेच लोभसवाणे असते.

खरंच माणिकताईंनी गायलेली कितीतरी गाणी आता या क्षणी आठवताहेत. पुलंनी स्वरबद्ध केलेली चित्रपट गीतं, कबीराचे विणतो शेले, जा मुली शकुंतले सासरी किंवा सुवर्ण द्वारावतीचा राणा श्रीहरी, विदुराघरी पाहुणा. याशिवाय राजा बढे यांनी लिहिलेलं भावगीत हसले मनी चांदणे असो, माणिकताईंच्या स्वरांमध्ये चांदण्याची शीतलता भरून वाहते असं वाटतं. माणिकताईंनी म्हटलेली भक्तीगीतं आकाशवाणीच्या भक्तीसंगीताच्या कार्यक्रमातून जेव्हा प्रसारित होतात तेव्हा मंगलमय सुप्रभात प्रत्येक श्रोत्याच्या मनात उमलत असते. त्यांनी गायलेल्या भूपाळीनं मंदिरातला देव जागा होतो. वृंदावनातली तुळस आनंदाने डोलत असते. किती नि काय माणिकताईंच्या गाण्याबद्दल लिहावं.

आज मात्र ग्रीष्मातल्या उन्हानं चहूबाजूंनी फुललेला गुलमोहर पाहिला आणि माणिकताईंच्या आवाजातलं भावगीत आवर्जून आठवलं.

गतसाली हा असाच फुलता
तुम्ही पाहुणे आला होता
याच तरुतळी, अनोळखीचा परिचय ना घडला
अंगणी गुलमोहर फुलला…

गदिमांचे सहजसुंदर शब्द, घरंदाज तरुणीच्या मनातल्या सलज्ज भावना, दत्ता डावजेकर यांनी गाऊन घेतली आणि एक सुंदर अशी सुस्वरभेट रसिकांना मिळाली.

ते डोळे ती हसरी जिवणी
जपली मी तर अजून चिंतनी
आठव येता वरुनी माथी मोहर ओघळला
अंगणी गुलमोहर फुलला…

मुग्धभावना किती सुरेख रितीने व्यक्त झालीय. माणिकताईंच्या आवाजात हे गाणं ध्वनिमुद्रित व्हावं हा किती सुंदर योगायोग.

नजरभेट ती ओळख थोडी
अवीट त्यातील अबोल गोडी
वसंत आला, याल तुम्हीही कोकिळ कुजबुजला
अंगणी गुलमोहर फुलला…

गुलमोहराची लाल फुलं भडक रंगाची पण माणिकताईंच्या स्वरात कुठेच भडकपणा जाणवणार नाही याची खात्री संगीतकार डीडींना (दत्ता डावजेकर) होती. गदिमांनी पण किती सुंदर उपमा दिलीय गुलमोहराला! लाल फुलांच्या लिपीत लपलेला अर्थ गदिमांसारख्या महाकवीला उमगला आणि माणिकताईंच्या सोज्वळ गळ्यातून अवघ्या रसिकांच्या हृदयी पोहोचला. काल 16 मे या माणिक वर्मा यांच्या जन्मदिनी दिवसभर मनाच्या अंगणी गुलमोहर फुलत राहिला…
माणिकस्वरांनी डोलत राहिला.

(लेखिका आकाशवाणी, पुणेच्या सेवानिवृत्त वरिष्ठ उद्घोषिका आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या