दिवाळीतले गडकिल्ले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. संग्राम इंदोरे -दुर्ग अभ्यासक

दिवाळीत किल्ले करण्याची प्रथा महाराष्ट्रात कधी सुरू झाली याची नेमकी माहिती नाही, परंतु आज दिवाळी म्हटलं की, आपल्या समोर पहिले मातीचे किल्लेच येतात. लहान मुलांच्या दृष्टीने ती एक महत्त्वाची गोष्ट मानली गेली आहे. शिवकाळातील हिरोजी इंदुलकर व अर्जोजी यादव या दुर्ग स्थापत्यकारांना स्मरून आपण आपल्या घरासमोरील अंगणात वा बाल्कनीत किल्ल्याची एखादी छोटेखानी प्रतिकृती करण्याचा अवश्य प्रयत्न करून पहा.

जगाच्या पाठीवर आजवर जेवढे महानायक होऊन गेले त्यांनी त्यांच्या भागातील भौगोलिक परिस्थितीचा सखोल अभ्यास केला. पुढे त्या भौगोलिक परिस्थितींच्या जोरावर या महानायकांनी आपल्या विरोधकांना नेस्तनाबूत केले. शिवाजी महाराजही त्याला अपवाद नव्हते.

शिवाजी महाराजांनी दुर्गम अशा सह्याद्रीच्या आणि तिथल्या गडकोटांच्या जोरावर आदिलशाहीला आणि नंतर मुघलांना कमालीची शिकस्त दिली. आजही शेकडो गडकोट महाराजांच्या कर्तृत्वाच्या अनेक स्मृती जागवत सह्याद्रीच्या शिखरांवर ताठ मानेने उभे आहेत. या गडकोटांना महाराष्ट्राच्या संस्कृतीत मानाचे स्थान आहे तसेच हे किल्ले सगळय़ांसाठी स्फूर्तिस्थानेही आहेत. या गडकोटांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी व स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱया मावळ्यांच्या स्मृती जागविण्यासाठीच दिवाळीच्या सणात किल्ले बनवण्याची प्रथा सुरू झाली.

दिवाळीत किल्ले करण्याची प्रथा महाराष्ट्रात कधी सुरू झाली याची नेमकी माहिती नाही, परंतु आज दिवाळी म्हटलं की, समोर येतात ते मातीचे किल्ले! शिवकाळातील हिरोजी इंदुलकर व अर्जोजी यादव या दुर्ग स्थापत्यकारांना स्मरून आपल्या घरासमोरील अंगणात वा बाल्कनीत किल्ल्याची एखादी छोटेखानी प्रतिकृती करण्याचा अवश्य प्रयत्न करायला हवा. महाराजांचे गडकोट लहान मुलांनी स्वतः पाहावेत, या किल्ल्यांच्या प्रतिकृती निर्माण करण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण व्हावी, किल्ल्यांच्या व निसर्गाच्या सहवासात त्यांनी रमावं, त्यांच्या अंगी राष्ट्रनिष्ठा तीव्र व्हावी हाच दिवाळीत किल्ले बनवण्याचा मुख्य उद्देश आहे.

किल्ला करताना खालील गोष्टींची काळजी घ्यायला हवी
1. किल्ला भुईकोट करावयाचा की जलदुर्ग वा डोंगरी ते प्रथम ठरवावं
2. सर्वसाधारणपणे किल्ल्याच्या प्रतिकृतीत तट, बुरुज, पायऱया, दरवाजे, मंदिर, दारूचे कोठार, धान्याचे कोठार, गुहा, पाण्याचे तलाव या गोष्टींचा समावेश असावा
3. किल्ला करताना आधी दगडविटा, घरातील पुंडय़ा एकमेकांवर रचून घ्याव्यात. त्यावर पातळ कापड टाकून ओल्या मातीचा लेप करावा. किल्ला बनवताना वापरत असलेले कागद, कापड, गोणपाट यांची सुटी टोपं उघडी दिसू देऊ नका.
4. किल्ला बनवताना सुरुवातीलाच अळीव वा इतर धान्य पेरल्यास दोन-तीन दिवसांतच किल्ल्यावर शेतं उगवलेली दिसू लागतील.
5. किल्ला हा दिवाळीतील आनंदाचा व करमणुकीचा भाग आहे. त्यामुळे तो रंगीबेरंगी व डामडौल दर्शवणारा व आकर्षक असावा.
6. शिवकाळ जागवण्यासाठी किल्ल्यावर शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, पहारेकरी, तुतारीवाले, तोफा, शेतकरी, भगवा ध्वज, देवदेवतांच्या छोटय़ा मूर्ती, वाघ, सिंह, मोर असे प्राणी, पक्षी ठेवणं आवश्यक आहे.
7. दिवाळी म्हणजे केवळ फटाके उडवणे नसून दिव्यांची आरास आणि गडकिल्ले बनवण्याचा सण आहे. म्हणून आपण केलेल्या किल्ल्याच्या समोरसुद्धा दिवा लावावा. छानशी रांगोळी काढावी.