साहित्यसंस्कृती – भाषा संस्कृतीतली देवाणघेवाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. सुधीर रा. देवरे

भाषा कोणतीही असो, ती माणसाला जोडत संवाद साधते. भाषेमुळे संस्पृतीची देवाणघेवाण होते. भाषेच्या माध्यमातून परंपरा आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्याचं कार्य केलं जातं. यामुळेच एखादी भाषा किंवा त्यातील बोली लोप पावत असेल तर त्याचा दूरगामी परिणाम संस्कृतीवरही होतो. म्हणूनच बोलीभाषा, प्रमाणभाषा या वादात न अडकता लोप पावत चाललेल्या भाषांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

कोणत्या भाषेला प्रमाण वा कोणत्या भाषेला आपण बोली संबोधतो? एखादी बोली ही एखाद्या विशिष्ट प्रमाण भाषेशी संबंधित असते की आपण शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, शासकीय, प्रांतिक (आणि जातीयसुद्धा) वगैरे भेद मान्य करत त्या त्या बोलींना त्या प्रदेशाच्या प्रमाण भाषेतील क्षेत्रीय घटक बोली ठरवून मोकळे होतो? बोलींची एखादी भाषा ही ‘जननी भाषा’ असू शकते का? का ‘जननी भाषा’ हीच मुळात तिच्या घटक बोलींपासून ‘प्रमाण भाषा’ म्हणून जन्माला आलेली असते? भाषेच्या अभ्यासात असे अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित करता येतात. ‘जननी भाषा’ संबोधनातून एखाद्या भाषेचा इथे उपहास केलेला नाही. कोणी एखाद्या भाषेचा असा उपहास करण्याचा प्रयत्नही कधी करू नये. कारण भाषाभाषांत अंतराय निर्माण होत असेल तर भाषा संवर्धनाला हा आप-पर विचार मारक ठरणार. म्हणजेच भाषा शास्त्रीयतेला हा विचार अमान्य ठरतो.

हीच गोष्ट मातृभाषा, शैक्षणिक भाषा, प्रमाणभाषा, राष्ट्रभाषा, जागतिक भाषा आदींबद्दल करता येईल. एकाच प्रांतात राहणाऱया लोकांची मातृभाषा एकच असेल असे नाही. (उदा. महाराष्ट्रात जर विविध परिवेशात कमाल पासष्ट बोली बोलल्या जात असतील तर महाराष्ट्रातील लोकांच्या पासष्ट अशा विविध बोलींपैकी एकेक मातृभाषा असणं साहजिक ठरतं. आणि त्यांची मराठी ही शैक्षणिक प्रमाण भाषा असेल- त्या व्यक्तीने मराठी भाषा माध्यमात शिक्षण घेतलेलं वा घेत असेल तर.) लहान बाळ सर्वप्रथम आपल्या मातेशी जी भाषा बोलतं ती मातृभाषा असं म्हटलं तर प्रत्येकाची शैक्षणिक भाषा ही मातृभाषा ठरू शकत नाही. तरीही अनेक लोक आपली मातृभाषा म्हणून आपली शैक्षणिक भाषाच सांगताना दिसतात. यात त्या व्यक्तीचा दोष नाही, त्याच्यावर ज्यांनी असं बिंबवलं त्यांचा तो दोष असतो. (उदा. अहिराणी मातृभाषा असलेली व्यक्ती जनगणनेच्या वेळी आपली मातृभाषा मराठी असल्याचं सांगते अथवा व्यकतीने अहिराणी मातृभाषा सांगितली तरी नावनोंदणी करणारी अधिकारी व्यक्ती सरसकट मातृभाषा मराठी म्हणून नोंदवते, अथवा मातृभाषेचा प्रश्नच लोकांना न विचारता राज्यानुसार भाषेचा रकाना भरला जातो.) याला आपली राजकीय व काही प्रमाणात शैक्षणिक अव्यवस्थेसह भाषिक अज्ञान कारणीभूत आहे.

भाषेच्या बाबतीत अनेक लोकांना विशेषतः ग्रामीण, आदिवासी लोकांना कायम वाईट अनुभव येत असतात. आपण जी भाषा बोलतो ती दुय्यम प्रतीची आहे, गावंढळ आहे, अशुद्ध आहे असा न्यूनगंड (मुख्यधारेतल्या लोकांकडून) त्यांच्यात पेरला जातो. आपण बोलतो ती भाषा सरकार दरबारी चालत नाही. राज्याच्या वा देशाच्या राजधानीतच नाही, तर तालुका पातळीवरही ही भाषा टिकत नाही. व्यवहारात चालणारी भाषा आपल्याला येत नसेल तर आपले विचार सरकारपर्यंत कसे पोचतील, या विचाराने विशिष्ट भाषेतल्या लोकसमस्या कुठं मांडल्या जात नाहीत आणि म्हणून त्यांचं निवारणही कधी होत नाही. अशी आपल्या भाषेची मर्यादा असेल तर आपले विचार, आपल्या विनंत्या, आपल्या तक्रारी करणं माणूस बंद करतो. अन्याय सोसत राहतो. एकटय़ाने लढण्याऐवजी पुठल्या तरी संघटनेची वाट पाहतो. (अशा संघटनेतल्या गर्दीचा एक बिंदू होत आंदोलनात लोकसमुदायातला एक ठिपका होऊन राहतो.) ही लोकशाही नाही. लोकशाहीत एका सत्य नागरिकालाही आपल्याच भाषेतून सरकार हलवता यायला हवं. म्हणून माणसाच्या भाषेला आधी न्याय मिळायला हवा. माणूस जी भाषा बोलतो त्या भाषेत तो कोणाशीही संवाद, व्यवहार करू शकणार असेल तर ती जागतिक लोकशाही ठरेल, अन्यथा नाही.

भाषा कोणतीही असो, ती माणसाला जोडत संवाद साधत असते. इतर कोणाला कळू नये इतकीही भाषा पृत्रिमपणे तयार होत नाही. आपल्या स्थानिक लोकसंस्कृतीचा परिवेश ती अनायासे उपयोजित करत असते. एका गावापुरतीही स्वतंत्र भाषा असू शकते अथवा चार-चार जिल्ह्यांत पाय पसरून बोलली जाते, ती त्या परिवेशाची बोली. एकाच गावात एकच भाषा बोलणारे लोकसुद्धा आपापली खास भाषा बोलत असतात, मात्र शिक्षित लोक आपल्या भाषेच्या प्रेमात पडले की कोणी म्हणतो, माझी भाषा शुद्ध, तुझी अशुद्ध. दुसरा म्हणतो, माझीच भाषा अस्सल. वगैरे. असे म्हणणारे लोक आपल्या भाषेचं नुकसान करत आपलं स्वतःचं अशुद्धपणही जगजाहीर करतात.

भाषा ही फक्त भाषा असते. भाषेत शुद्ध आणि अशुद्ध असं काही नसतं. आपल्या कानदृष्टीने कोणी चुकीची भाषा बोलत असेल तर ती भाषा ‘अशिष्ट’ नसून त्या व्यक्तीची ‘खास’ भाषा असते. म्हणून भाषेबाबत ‘अस्सल’ आणि‘कम-अस्सल’ असं काही नसतं. एखाद्या व्यक्तीच्या वा गटाच्या भाषेला शरण जात आपण स्वतःच वेळोवेळी स्वतःला शुद्ध करून घ्यावं. म्हणजे कोणाच्या भाषेला ‘नावं ठेवणं’ व आपल्या भाषेला आपणच ‘शुद्ध म्हणणं’ आपल्या वाणीतून वजा होईल. दोन व्यक्तींत वा दोन भिन्न भाषांत मैत्रीपूर्ण संवाद पूर्ण झाला की भाषा जिवंत होते.

अशा सगळ्याच बोलीभाषा स्थानिकांच्या मातृभाषा असतात. शैक्षणिक भाषा या प्रमाण भाषा असतात. प्रमाण भाषा निर्माण होताना सुरुवातीच्या काळात बोलींतून आदान होत असतं आणि समाजात एकदा प्रमाण भाषा रुळल्या की बोली आणि प्रमाण या दोन्हींकडून शब्दांचं आदानप्रदान सुरू होतं. महाराष्ट्राची प्रमाण भाषा मराठी असली तरी राष्ट्र वा जागतिक पातळीवर ती एक बोलीच ठरते. देशपातळीवर हिंदी प्रमाण भाषा आहे असं म्हणणंही धाडसाचं ठरेल. तसंच इंग्रजीचंही. इंग्रजीला जागतिक भाषा म्हणणंही उचित होणार नाही. म्हणून दोन टोकांच्या कोणत्याही दोन व्यक्तींच्या संवादात जी भाषा ‘व्यावहारिक’ निकड भागवते ती प्रमाण भाषा ठरते. खरं तर बोली आणि प्रमाण भाषा असं काही नसतंच. भाषा शास्त्र्ााrयदृष्टय़ा उदारमताने सगळ्या बोली या अंतिमतः भाषाच असतात.

(लेखक भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाङमयांचे अभ्यासक आहेत. त्यांनी अहिराणी भाषेवर विपुल लेखन केले आहे.)4

– [email protected]