
>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक
भजनातील पदे, अभंग या रचनांमध्ये भक्ती हाच याचा गाभा असला तरी हे संत वाङ्मय केवळ भक्तिरसाचे वाङ्मय नसून ते लोक वाङ्मयही ठरते त्यामध्ये लोकप्रबोधन, जनजागृती व सामाजिक चळवळ करणे हा उद्देश दडलेला आहे.
मराठी संतांनी लिहिलेल्या अभंगादी रचना या मराठी भाषेचे एक अलौकिक देणे आहे. अत्यंत विपुल आणि विविध स्वरूपाचे हे संतसाहित्य लोकादरास पात्र झालेले व लोकाभिमुख असे आहे. समाजाच्या सर्वच थरांतून या साहित्याचा स्वीकार झाला आहे. गेल्या सातशे वर्षांतील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींवर संत साहित्याने गारूड निर्माण केले आहे. या सर्व घडामोडींचे प्रतिबिंब संत साहित्यात पडलेले दिसून येते.
आधुनिक, प्रबोधनाची चळवळ जरी गेल्या दोनशे वर्षांत सुरू झाली असे मानले जात असले तरी या प्रबोधनाच्या चळवळीस पोषक ठरेल, असा पुरोगामी विचार, प्रागतिक दृष्टिकोन संत वाङ्मयाने महाराष्ट्रात निर्माण केला आणि तो रुजविण्याचा प्रयत्नही केला. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम आणि समर्थ रामदास या पाच संतांच्या वाङ्मयालाच प्रामुख्याने संत वाङ्मय म्हणून संबोधले जात असले तरी सेना न्हावी, बंका महार, गोरा कुंभार, विसोबा खेचर, चोखा मेळा या संतांनी तसेच महदंबा, मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई, वेणाबाई या संत कवयित्रींनीही संत वाङ्मय समृद्ध आणि बहुमुखी केलेले आहे. संत वाङ्मय खेडय़ापाडय़ांत, वाडय़ावस्त्यांत पोहोचून जनमनात खोलवर रुजवले आहे.
महाराष्ट्रातील संतांनी परमेश्वराला अनन्यभावे शरण जावे. प्रपंचात परमार्थ साधून आनंद निर्माण करावा, अशी सोपी शिकवण देणाऱ्या उपदेशात्मक सुंदर सुंदर अभंगांची रचना केली आहे.
पावत नाही जो कधी भंग। शब्दांनी घडवी ईश संग।
बदलवी बोधान आत्मरंग। सोबती जीवनाचा अभंग ।।
अभंग हे भंग पावत नाहीत. त्यातील शब्दांप्रमाणे आचरण केल्याने मनुष्याचा आत्मरंग बदलतो. म्हणून जीवनाची सोबत व साक्षी अभंग आहेत. संतांच्या लोकोद्धाराच्या कार्याचे महत्त्व अनेक विचारवंतांनी मान्य केले आहे. वारकरी संप्रदायाच्या या कार्याविषयी संत बहिणाबाईंचा पुढील अभंग ठळकपणे अधोरेखित होतो.
संतकृपा झाली। इमारत फळा आली ।
ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया ।
नामा त्याचा किंकर। तेणे रचिले ते आवार ।
जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ।
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।
बहिणी म्हणे फडकती ध्वजा । निरूपणा केले वोजा ।।
संत बहिणाबाईंनी प्रस्तुत सहा चरणांच्या अभंगातून वारकरी संप्रदायाचे, त्यामधील संतांचे योगदान प्रतिपादन केल्याचे दिसून येते. हे प्रतिपादन करीत असताना भजन करा सावकाश। तुका झालासे कळस । असा शब्दप्रयोग वापरून ‘भजन’ या संज्ञेचा व्यापक दृष्टिकोनही विषद केला आहे.
खरे तर भजनाकडे आजवर परमेश्वराचे नामस्मरण किंवा नामगजर म्हणून, विशेषत दैनंदिन उपासना पद्धती म्हणून पाहिले आहे. सर्वसामान्य माणसांपासून ते विद्वानांपर्यंत अनेकांनी केवळ भक्तिरसाच्या दृष्टीनेच पाहिले आहे. संतांच्या वाङ्मयात भक्तिरस तुडुंब भरलेला आहे. किंबहुना भक्ती हाच याचा गाभा असला तरी संत वाङ्मय हे केवळ भक्तिरसाचे वाङ्मय आहे, असे म्हणता येणार नाही. कारण त्यामध्ये लोकप्रबोधन, जनजागृती व सामाजिक चळवळ करणे हा उद्देश दडलेला आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात संत वाङ्मयाला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच संतांच्या ठायी काव्यगुण होते, ते कवी होते; ‘बंडखोर कवी’ किंवा ‘विद्रोही कवी’ होते. संतांची ही बंडखोरी तत्कालीन मूठभर उच्चवर्णीयांना, धर्ममार्तंडांना पचणारी नव्हती. कारण संतांनी स्थितीवाद नाकारला आणि नवविचार मांडण्याचा प्रयत्न केला.
संतांच्या काव्यातील समाज सुधारणेचे संदर्भ ध्यानात न घेता. त्याविरोधी ओरड करण्याचा, त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला, परंतु संत डगमगले नाहीत. संतांनी समाज जीवनाची, मोक्षाची दारे खुली केली. श्री.म. माटे म्हणतात त्याप्रमाणे ‘पारमार्थिक लोकशाही’ची स्थापना सकल संतांनी केली आहे.
(लेखक मानसशास्त्राचे व लोककलेचे अभ्यासक आहेत.)


























































