
>> डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी
स्त्रीचा व्यक्त होण्याचा आत्मविश्वास वाढू लागला आणि मनात, विचारात बंदिस्त असलेल्या लहानमोठय़ा उन्मेषांना अक्षरांत मांडावं, तिथे वाट शोधावी, असं वाटू लागलेली ती तिच्या बहुविध रचनांतून व्यक्त होऊ लागली. त्या काळाला मंजूर, नामंजूर असलेल्या चौकटींना उजागर करीत स्वत जाग्या झालेल्या या स्त्रिया ‘आपुलिया जातीच्या’ अनेकींना जागं करू लागल्या. तिच्या धडपडीची ही पहिली पावलं पुढे अनेकींना वाट देणारी ठरली.
म. फुले यांची विद्यार्थिनी मुक्ताबाई हिनं वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी ‘मांग महारांच्या दुःखाविषयी निबंध’ लिहिला आहे. ‘ज्ञानोदय’ या नियतकालिकात तो 1855 मध्ये दोन भागांत प्रकाशित झाला. महार -मांग लोकांचे जीवन किती दुःखी आहे, हे तर ती या निबंधात सांगतेच, पण मुळात या दुःखाला सामाजिक विषमता कशी कारणीभूत आहे तेही दाखवून देते. इतक्या लहान वयात तिच्या विचारांत सुस्पष्टता दिसते, प्रगल्भता दिसते, हे फार महत्त्वाचे आहे. 1855 मध्ये एक मुलगी अशा प्रकारची वैचारिक मांडणी करू शकते, हे विशेष. मागच्या लेखात आपण पाहिलं की, सावित्रीबाई केवळ कवितेसाठी कविता रचत नव्हत्या, तर त्यांना त्यामधून आपले विचार मांडायचे होते. स्त्रियांच्या लेखनाच्या या सुरुवातीच्या काळात त्यांना काय लिहावंसं वाटलं, हे आज पाहताना आणि समजून घेताना धन्य वाटतं. आपल्या आजूबाजूचं स्त्राrजीवन त्यांना अस्वस्थ करत होतं. स्त्राrच्या कुचंबलेपणाची कारणमीमांसा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्यावरचे उपाय शोधण्याची त्यांची धडपड होती. स्वत जाग्या झालेल्या या स्त्रिया ‘आपुलिया जातीच्या’ अनेकींना जागं करू लागल्या. पाश्चात्यांकडून स्त्राrवादाची वैचारिक आणि नेटकी मांडणी पुढच्या काळात आली खरी, पण त्यापूर्वी आपल्याकडे स्वयंप्रेरणेनं अनेकजणी हे काम करत होत्या हे आज लक्षात येतेय. 1850 पासून या जागं करण्याच्या कार्याला हळूहळू, पण निश्चित गती आली. महत्त्वाचा टप्पा हा अर्थातच स्त्राrच्या शिक्षणाचा होता. माणूस म्हणून स्वतची ओळख होण्याचा हा काळ. चाचपडत, अडथळे ओलांडत तिच्या लेखनाचा प्रवास सुरू तर झाला.
स्वतंत्रपणे कविता लिहून ती प्रसिद्ध करण्याचा आत्मविश्वास तिला कमवावा लागला, पण तोपर्यंत जी पारंपरिक गीतं स्त्रियांच्या कानांवर पडत होती, त्यांची संकलनं त्यांनी केली. पार्वतीबाई गोखले यांचं ‘स्त्राrगीतरत्नाकर’ हे तीन भागांत असलेलं संकलन. त्या काळातलं हे अतिशय प्रसिद्ध असं संकलन. वर्ष आहे 1915. पुढे शांताबाई शेळके यांनी आपल्या लेखनात आपल्या आईविषयी लिहिताना या पुस्तकाचा कौतुकानं उल्लेख केलाय. इंदूरच्या सरस्वतीबाई टिपणीस यांचं ‘अन्तर्गृहातील गीते’ हे संकलन 1915 मध्ये प्रकाशित झालं. विषयानुसार वर्गीकरण करून, काही समजुती-प्रथा यांच्याविषयी अधिक माहिती देणाऱ्या टिपांची जोड देऊन हे संकलन सरस्वतीबाईंनी केलेलं दिसतं. या आणि अशा प्रकारच्या त्या काळातल्या संकलित पुस्तकांमुळे स्त्राr-गीतांचं दस्तावेजीकरण झालं हे फार महत्त्वाचं. पुढे त्यातून अनेकींना रचना करण्याची प्रेरणा मिळाली, हेही खरं. आजच्या साहित्यिक सौंदर्याच्या निकषांवर त्याकडे बघून नाही चालणार. कारण त्या काळाचा मोठाच पगडा त्या रचनांवर आहे. त्याचं महत्त्व हे की स्त्राrचा व्यक्त होण्याचा आत्मविश्वास वाढू लागला. पारंपरिक कौटुंबिक चौकटीमधून तिला किंचित फट सापडली. मनात, विचारात बंदिस्त असलेल्या लहानमोठय़ा उन्मेषांना अक्षरांत मांडावं, तिथे वाट शोधावी, असं वाटू लागलं. कृष्णाबाई गाडगीळ या बेळगावच्या कवयित्री. त्यांचं ‘मानसगीतसरोवर’ हे स्वरचित पुस्तक खूपच लोकप्रिय झालं होतं. मात्र हे सारे त्या काळाला मंजूर असलेल्या चौकटीत होत होतं. बाहेर जे सुधारणांचे वारे वाहत होते, स्वातंत्र्याची आस लागलेली होती, त्याचा उच्चार मात्र क्वचितच या गीतांमधून झालेला दिसतो. का बरं असं झालं असावं…याचा आज विचार करताना जाणवतं की, लिहिण्याचं स्वातंत्र्य त्यांना प्रथमच मिळालं होतं. नवीनच एक माध्यम हाताशी आलं होतं. ते हाताळून पाहण्याचा आनंद त्यात होता, पण त्या माध्यमाची ताकद मात्र अजून उमजायची होती. शिवाय त्यांच्यासमोर पूर्वीच्या स्त्रियांनी लिहिलेले किंवा मौखिक परंपरेनं आलेले जे नमुने होते ते सारे पारंपरिक स्त्राrधर्माचं गुणगान करणारे होते.
आजही पहा, समाज माध्यमांवर प्रसारित होणारं बहुसंख्य लेखन हे रूढ पठडीमधलं असतं. विशेषत स्त्रियांच्या लेखनावर एक अदृश्य सेन्सॉरशिप असते. एक दडपण असतं. त्यातून काहीजणी बाहेर पडल्या तरीही त्यांची संभावना बिनधास्त किंवा बोल्ड अशी काहीशी हेटाळणीयुक्त स्वरांत होते. त्यावर मात करत स्वतचा आतला आवाज शोधणं हे स्त्राrसाठी नेहमीच आव्हान राहिलं आहे.
(लेखिका समीक्षक, संपादक आहेत.)
समाजभान
[email protected]



























































