
>> डॉ. विजय पांढरीपांडे
मराठी रंगभूमी इतकी अन्य कुठल्याही भाषेची रंगभूमी गर्भश्रीमंत नाही. मराठी भाषा, संस्कृती, नाटकं, संगीत, विनोद, चित्रपट, साहित्य, काव्य हे सारं टिकवून ठेवायचं असेल, त्यांचं संवर्धन व्हायचं असेल तर आपणही या संवर्धनाची जबाबदारी घेतली पाहिजे. एक सजग प्रेक्षक, रसिक म्हणून आपलं सौजन्यपूर्ण वागणं कलाकरांना उभारी देणारं ठरतं.
प्रेक्षकांचे नाटय़गृहात मोबाईल वाजवणे बंद झाले नाही तर मी नाटक करणेच बंद करेन, असा धमकीवजा वैताग सुप्रसिद्ध गुणी नट सुबोध भावेंनी व्यक्त केलाय. तत्पूर्वी सुमित राघवन या नटानेदेखील त्यांच्या ‘हॅम्लेट’ नाटकाच्या प्रयोगांदरम्यान होणाऱया मोबाईल त्रासाबद्दल संताप व्यक्त केला होता. ज्येष्ठ नट विक्रम गोखले नाटक सुरू होण्यापूर्वी स्वतः बाहेर येऊन हात जोडून विनंती करायचे, मोबाईल बंद करा म्हणून. तरीही प्रेक्षक ऐकायला तयार नाहीत. आपण दोनतीनशे रुपये खर्च करून नाटक बघायला येतो याचा अर्थ नाटय़गृहात काहीही करायचे आपल्याला स्वातंत्र्य आहे अशी प्रेक्षकांची समजूत असते. आपल्या अशा वागण्यामुळे इतर प्रेक्षकांना त्रास होतो. मुख्य म्हणजे नटांना त्रास होतो, रसभंग होतो याचे या महाभागांना भान नसते. नाटक परफॉर्म करताना नटाची तंत्री लागली असते. त्याचे एका भूमिकेतून दुसऱया भूमिकेत स्थलांतर झालेले असते. मध्ये कुणी उठून जायला लागले, कुजबूज केली, लहान मुलांचा आवाज आला की, त्यांची समाधी भंगते, संवाद विसरायला होतात, लिंक तुटते, पण या परिणामांचे भान आजकालच्या बेजबाबदार प्रेक्षकांना नसते. अनेक प्रेक्षक मोठय़ाने कॉमेंटस् करतात, नको तिथे हसतात. वेफर्स खाऊन मचमच आवाज करतात किंवा नाटक पाहण्याऐवजी चक्क व्हॉटस्ऍपवरचे मेसेजेस बघत बसतात. या वृत्तीमुळेदेखील मोबाईलच्या स्क्रीनवरील प्रकाशझोताचा शेजाऱयांना त्रास होतो, लक्ष विचलित होते. हेच ज्यांना करण्यात इंटरेस्ट असतो त्यांनी नाटकाला येऊच नये.
टीव्हीवरील चॅनल्सच्या अतिक्रमणामुळे तसाही नाटय़ व्यवसायावर विपरीत परिणाम झालाय. कोणेएकेकाळी मराठी रंगभूमी, मराठी नाटके, नाटय़ संगीत हा अभिमानाचा, आपल्या संस्कृतीच्या प्रतिष्ठsचा विषय होता. खरे तर मराठी इतकी अन्य कुठल्याही भाषेची रंगभूमी गर्भश्रीमंत नाही. मी दहा वर्षे बंगालमध्ये अन् गेली 30 वर्षे आंध्र प्रदेश (आता तेलंगणा) या राज्यात आहे. बंगालला टागोरांचा वारसा असूनही तिथली रंगभूमी केव्हाच क्षीण झालीय. तेलुगू संस्कृतीत वर्चस्व आहे ते चित्रपटांचे. नाटके एन. टी. रामारावसारख्या नटांबरोबरच लयाला गेली.
आपल्याकडेही दोन-तीन दशकांपूर्वी जी रंगभूमीची श्रीमंती होती, दर्जा होता तो बऱयाच प्रमाणात लयाला गेला. जे साहित्य क्षेत्रात घडले ते नाटय़क्षेत्रातही घडले. चांगली दर्जेदार मासिके बंद पडली. प्रकाशन व्यवसायाला अवकळा आली. संगीत नाटक तर केव्हाच मागे पडले. अशा अवघड, विपरीत परिस्थितीतही सुबोध भावे, सुमित राघवन, राहुल देशपांडे, चिन्मय मांडलेकर, चंद्रकांत कुलकर्णी, विक्रम गोखले, प्रशांत दामले, कविता मेढेकर, अद्वैत दादरकर अशा निवडक नव्या-जुन्या मंडळींनी रंगभूमी टिकवून ठेवण्याचे प्रयत्न केले, जुन्या नाटकांचे पुनरज्जीवन केले. काही संगीत नाटकेदेखील तोटा सहन करून नव्या रंगरूपात साकारली. काही नाटकांवर चित्रपट काढण्याचे यशस्वी/अयशस्वी प्रयत्न झाले. पूर्वी हैदराबादला नियमाने मराठी नाटकं यायची. आता वर्षातून एखाददोन वेळाच संधी मिळते. कारण दूरवर जाऊन प्रयोग करणे आर्थिकदृष्टय़ा कलाकारांना, निर्मात्यांना परवडत नाही. महाराष्ट्रातदेखील गावोगावी प्रयोग करणे पूर्वीसारखे सुखसोयीचे राहिलेले नाही. अनेक नाटय़गृहांची अवस्था प्राण कंठाशी आलेल्या वृद्धासारखी झाली आहे. नुकताच भरत जाधव यांचा नाटय़गृहाच्या गैरसोयीबद्दलचा त्रागा व्हिडीओद्वारे आपण बघितलाय. नाटकात तरुण मुली असतात. त्यांच्यासाठी स्वच्छतागृहाची, कपडे बदलण्याचीदेखील नीट सोय नसते. खरं तर ही मंडळी जागरणं करून, लांबचा प्रवास करून, आपल्या कुटुंबाची गैरसोय पत्करून आपले मनोरंजन करण्यासाठी हा आटापिटा करतात. त्यांना खूप काही मानधन मिळते, प्रसिद्धी मिळते असेही नाही. कारण टीव्ही सीरियल्स, जाहिराती, चित्रपट हे क्षेत्र त्यांच्यासाठी पैसा, प्रसिद्धी, प्रकाशझोत यादृष्टीने जास्त फायद्याचे असते. तरीही काही मंडळी हौस म्हणून, परंपरा पुढे न्यायची म्हणून, संस्कृती टिकवायची म्हणून नाटके करतात.
जबाबदार नागरिक म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे हेच आपण विसरतो. ‘स्वच्छ भारत’ नावाखाली कितीही मोहिमा उघडल्या, जाहिराती केल्या तरी रस्त्यावरचा, रेल्वेलाइनच्या शेजारचा, सार्वजनिक बागेतला कचऱयाचा ढीग कमी झालेला नाही. आता तर रेल्वेच्या रुळांवर लघुशंका करणाऱयांचे फोटो प्रसिद्ध होत आहेत. हे असे काही जपान, सिंगापूर एवढेच काय, एखाद्या लहानशा अरब राष्ट्रात तुम्ही केले तर सरळ तुरुंगाची हवा खाली लागेल. आपल्याकडे प्रत्येक बाबतीत कायदे, नियम असले तरी ते न पाळणे हाच ज्याचा त्याचा, प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार समजला जातो. एकीकडे मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी साहित्य लयाला चालले अशी तक्रार करायची, पण दुसरीकडे तसे व्हायला स्वतःच हातभार लावायचा, आपल्या निक्रिय, बेजबाबदार असंवेदनशील वागण्याने या ऱहासाचे भागीदार व्हायचे हा निश्चितच संतापजनक प्रकार आहे.
आपण सरकारला दोष देतो, अधिकाऱयांना जबाबदार धरतो, नट-नटय़ांना नावे ठेवतो. पूर्वी असे नव्हते, आताच असे आहे वगैरे गळे काढून रडण्याचे सोंग करतो, पण या सगळय़ांसाठी आपणही जबाबदार आहोत. याकरिता आपलाही बेजबाबदार हातभार लागलाय हे मात्र सोयीने विसरतो.
मराठी भाषा, संस्कृती, नाटकं, संगीत, विनोद, चित्रपट, साहित्य, काव्य हे सारं टिकवून ठेवायचं असेल, त्यांचं संवर्धन व्हायचं असेल तर प्रेक्षक, वाचक, श्रोते, रसिक या नात्याने आपणसुद्धा जबाबदारीने, गांभीर्याने वागलं पाहिजे. संस्कृती संवर्धनाचा ठेका काही मूठभर लोकांच्याच हातात नाही, तो तुमच्या आमच्याही हातात असतो हे न विसरलेले बरे!


























































