एका आईची कहाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. विजया वाड

उषा शेठ. आपल्या एका लेकीची गोष्ट सांगत असताना दोन्ही लेकींसोबत असलेले भावबंद अलवार उलगडतात.

ही एका शोकमग्न स्त्रिची, एका आईची नितांत सुंदर कहाणी आहे. ‘मृत्यू मरी गयू’ या गुजराती कादंबरीचा मराठी आविष्कार. माणसं वेगवेगळय़ा भाषा बोलत असली तरी प्रेमाची भाषा एकच असते. आत्म्याचे रुदन एकाच जातीचे असते नि मायलेकींचे प्रेमाचे रेशीमबंधही सारखेच असतात.

उषाबाईंना दोन मुली अल्पा आणि नीता. नीता मोठी नि अल्पा धाकटी. दोघींवर मम्मी नि पप्पांचा विलक्षण जीव. एक सुखी नि सुंदर असा कुटुंबाचा चौकोनी जीवनप्रवास. सुखाची सावली घरावर छत्र धरून असताना आपल्याला कुठे कल्पना असते. एक मोठा दुःखाचा ढग आपल्या छत्रीवर फुटणार आहे. आपली छत्री फाटून तुटून जाणार आहे आणि आपण दुःखचिंब होणार आहोत म्हणून? असाच रमेशसोबतचा संसार नीताच्या गंभीर आजाराने विदीर्ण झाला.

शाळेत उच्च श्रेणीचे गुण मिळविणारी, हुशार, देखणी, मनमिळाऊ, स्नेहशील अशी नीता एसएलई या प्राणघातक रोगाची शिकार झाली नि जीवन नासून गेले.

नीताचे आजारपण झेलताना उषाताई नीतामय होऊन गेल्या. मुले आजारी असताना त्यांना सतत जवळ कोण लागते? औषध कोणी द्यावे असे वाटते? फक्त आई एक व्यक्ती अशी असते की ती कोणाशीही शेअर करू नये असे वाटते. कोण? फक्त फक्त आई! आई… आई… आई… नीतानेही तोच हट्ट धरला ‘मी अशी पडून आहे. तू माझ्याजवळून हलू नकोस. मुलीचा वेडा हट्ट पुरविताना छोटय़ा अल्पाला मात्र लहानपणीच शहाणे व्हावे लागले. आईच्या सहवासासाठी ती नसेल का भुकेली? वाचताना पोटात तुटते. मन ठणकते.

या पुस्तकात नीताच्या यातना इतक्या हळूवार चित्रित झाल्या आहेत की शब्दचित्र अत्यंत बोलके होते. जिव्हाळय़ाचे होते नि एखाद्या चित्रपटासारखे डोळय़ांसमोरून सरकते.

लेखन करताना उषाबाई कुठेही कोणाचाही व्यक्तिगत उल्लेख न करता डॉक्टर – अ, डॉक्टर – ब असा करतात. डॉक्टर्स म्हणजे पैशांचे शोषण करणारे ही जी प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण झालीय तिला छेद देण्याचे काम उषाबाई नेटाने करतात. गंभीर आजाराने ग्रस्त लेकीचे डोके दुखू लागले, अंगावर चट्टे पडू लागले. जीभ काळी पडली तरी डॉक्टरांना वारंवार बोलावणाऱया उषाबाई लिहितात, प्रत्येक वेळी पैसे देऊ केले की, डॉक्टरांचे उत्तर एकच असे, ‘पाहू पुढे.’ त्यांना कळले होते का? आपल्या या ट्रीटमेंटचा नीताच्या आजारावर उपयोग होणार नाही? त्यांना वाटत होते का? या गोड फुलासारख्या सुकोमल जिवाला आपण कोणताही उपाय वाचवू शकत नाही? आत्मा अविनाशी असला तरी हे शरीर अवेळी दुनिया सोडून जाणार आहे? माणसातलं माणूसपण त्याला माया, स्नेह, आपुलकी या रेशीमगोफात बांधून ठेवतं. डॉक्टरांनाही तेच माणूसपण पैसे घेण्यापासून परावृत्त करीत असावं. या आईच्या पुढय़ात मी दुःखाचं ताट विधाता वाढून ठेवताना बघतोय. यापुढे पैशाचे मोल ते काय? पण उषाबाई मी असमर्थ आहे. दुःखाचे ताट तुमच्यापुढून उचलायला काय काय वाटले असेल नीताच्या डॉक्टरांना?

कोर्टिझोन खाऊन गोलमटोल झालेली नीता तिच्या गालावरची अदृश्य झालेली खळी, त्वचेवरले डाग सारे सूक्ष्म वर्णन वाचताना एका आईची तगमग प्रत्येक स्त्र्ााrला कळावी. ती कळ प्रत्येकीच्या हृदयात उमटावी इतका शब्दांचा ममताविष्कार.

‘हे पुस्तक लिहिताना नीताचे आयुष्य मी परत जगले’ असं उषाताईंनी लिहिलं आहे.

हे पुस्तक प्रत्येक पालकाने एवढय़ासाठी वाचावे की आपल्या आजारी पाल्याशी कसे वागावे याचा हा आदर्श वस्तुपाठ आहे.

‘आईच्या हृदयास कळावी, लेकराची वेदना

बापाच्या ऊबदार कुशीला, दुःख ते पाहवेना

घरटय़ातल्या पिलाला, का निरोप द्यावा अवेळी

दुःखाच्या आलेखाची, का ठरली वेळा अकाली?

ही भावना या पुस्तकाच्या वाचनाने मनामनात जागी होईल. दुःखाचे उन्नयन म्हणजे हे पुस्तक. यातनांचा अवघड प्रवास म्हणजे हे पुस्तक लाडक्या लेकरास अखेरचा निरोप ज्यांना द्यावा लागतो त्या वेदनेचा हुंकार म्हणजे हे पुस्तक. धाकटय़ा भावंडाला मोठय़ाच्या आजारपणात शहाणं करणारं, अकाली ‘मोठं’ करणारं हे पुस्तक वाचा जरूर नि पालकांना शहाणे, सूज्ञ व्हा. नियती कोणता डाव केव्हा टाकेल, फासे केव्हा पलटतील हे सारे अनाकलनीय आहे. म्हणून आनंदाची दिंडी घेऊन चला. क्षणोक्षणी आपल्या मुलींना सांगा, आवर्जून, ‘तुझे रूप कसेही असो. जगातली सर्वांत प्रिय व्यक्ती मजसाठी फक्त तू आहेस.’ आपल्या मुलाला सांगा, ‘दिल अच्छा तो सब सच्चा! तू हुनर ओळख नि नीघ पुढे ‘हम आपके साथ है।’

अतिमहत्त्वाकांक्षा नको. तुमच्या आशा-अपेक्षांचे ओझे नको. जे आहे ते… तसे.

माझी नीता

लेखिका ः  उषा शेठ

प्रकाशक ः पॉप्युलर प्रकाशन.

पृष्ठs ः 175.

[email protected]