पार्टनर

890

>> डॉ. विजया वाड

व.पू काळेंचे पार्टनर. खूप आपल्यातलेच पण काळाच्या पुढचे विचार व.पु.च मांडू शकतात.

कथाविश्वात रसिकमान्य आयाम मिळवणारे व. पु. काळे यांची ही गाजलेली कांदबरी. खरे तर 150 पानांची दीर्घिका पण मनात घर करणारी. 27 वेळा प्रकाशित झालेली ‘मराठी दीर्घिका’! मराठी लेखकांना असे भाग्य क्वचितच लाभले असेल. हल्ली तर ‘प्रिंट टु ऑर्डर’ पुस्तके काढतात लोक, असो. नव्या पिढीला जुने वाटणारेच नाही असे हे व.पुं.चे सुंदर पुस्तक. यातील पैशांचे व्यवहार फक्त 1976 च्या काळातले आहेत, जेव्हा सुशिक्षितांचे पगारच पाच हजार पलीकडे नव्हते. तेवढी बाब तरुणांना वाचताना समजून घ्यावी लागेल. वाङ्मय मात्र कालातीत आहे. कारण दोस्ती, प्रीती, दंभ, असूया, प्रेमालाप, शारीरिक इच्छा या भावना मनुष्यमात्रात त्याच आणि तशाच आहेत. साठ वर्षांपूर्वीचा देहधर्म जर तोच होता तर मनुष्यमात्रात वेगळे असे काय झाले हो? जगण्याची रीती बदलली… इतुकेच.

वपुंच्या या पुस्तकातल्या काही वेचक ओळी फार लक्षवेधी आहेत. उदाहरणादाखल या पहा…

‘पोरगी म्हणजे झुळुक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही.’… ‘आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं!’… ‘दुःख, आनंद, जय, पराजय, हसू-आसू, जन्म-मरण, विरह-मीलन सगळं तसच असतं. प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं. एवढंच काय ते नवीन. पुनः पुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हे मरण.

आणि सर्वात महत्त्वाचं हे वाक्य बघा.

‘ऍज यू राईट मोर ऍण्ड मोर पर्सनल, इट बिकम्स मोर ऍण्ड मोर युनिव्हर्सल’ हीच तर या दीर्घिकेची कॅचलाइन आहे नि म्हणून प्रत्येकाला ‘पार्टनर’ आपली गोष्ट वाटते. एखादी गोष्ट प्रत्येकास ‘आपली’ वाटणं हे यशाचं माप आहे आणि मध्यमवर्गीय माणसाची सुखदुःखे तोलण्यात, मापण्यात व.पु. माहीर होते.

कथानक जीवनस्पर्शी, झाकपाक नसलेले, सारी वर्णने करूनही सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या… असे म्हणायला न लावणारे आहे. आई, अरविंद, मनोरमा (ही जोडी) आणि मी (लेखक) नि पार्टनर यांची जीवनशैली म्हणजे ही गोष्ट. एखादा दोस्त इतका जिवाचा असतो की, त्याच्यासोबत दिल की बात होऊ शकते. आपला कथानायक औषधाच्या दुकानात काम करतो. अति मध्यमवर्गीय आहे.

कथानायक प्रेमात पडतो. प्रेमात (प्रथमच) पडलेल्या पुरुषाला आपली प्रेयसी जगात सुंदरी वाटावी हा जागतिक नियम आहे (आठव रसिका! तुझं पहिलं प्रेम). वर्णन पहा तिचं – लांबसडक, दाट आणि कुरळे केस, गोरापान वर्ण, उभा चेहरा, काळेभोर डोळे, धारदार नाक, एवढीशी जिवणी, चटका लावेल असा बांधा आणि चेहऱयावर एक विलक्षण आत्मविश्वास.

पण तिचा जन्म ‘आपल्यासाठी’ नाही. शी इज बॉर्न फॉर डहाणूकर्स, किर्लोस्कर, गरवारेज ऍण्ड आपटेज. लेखक कथानायकाच्या तोंडी जणू प्रत्येक प्रेमात पडलेल्या नि तिच्या सौंदर्याने घायाळ झालेल्या मध्यमवर्गीय तरुण मनाची, तरुण देहाची तडफड घालतात. पार्टनरजवळ आपला कथानायक जेव्हा मानातली व्यथा बोलून दाखवतो तेव्हा पार्टनर म्हणतो, ‘तू साला भोट आहेस. एकतर साल्या कार्तिकस्वामीसारखा राहतोस, इकडे तिकडे बघत नाहीस आणि कधीनवत एक बया मनात भरली तर तिला तशीच सोडलीस? कमीत कमी नाव तरी विचारायचंस ना!’

कथानायकाला लागलेली चुटपुट आपल्या मनासही चाटून जाते. हुरहुर दाटते. पण हीच तरुणी कथानायकाच्या मेडिकल स्टोअरमध्ये औषध घेण्यासाठी येते आणि… ‘लव्ह’ सुरू….

क्षण एक पुरे प्रेमाचा नजरेत नजर मिळण्याचा
घडतोय हा साक्षात्कार… दोघांच्या मनि प्रीतीचा’ ऐशी अवस्था हो! मग पल्सपेक्षा इंपल्सवर जगणे सुरू! पार्टनरची मते मात्र वायली आहेत. तो ‘लव्ह’ नाही, ‘अफेअर्स’ करतो. त्याच्या मते लव्ह ही तद्दन टाकाऊ गोष्ट आहे. ती माणसाला दुबळं बनवते. प्रेम वेळखाऊ तर अफेअर झटकून क्षणार्धात मोकळं होता यावं असला प्रकार!

मेडिकल स्टोअरमधून जाताना ती सुंदरी ‘दमयंती जोशी’ नाव असलेली वही विसरते. त्याला वाटतं हीच ‘ती’… पण वही तिच्या मैत्रिणीची असते. ‘ती’ असते किरण! किरण वर्तक. पार्टनर मित्राच्या खिशात दोनशे रुपये जबरदस्तीने कोंबतो. भेटीच्या वेळी द्यायला सेंटची बाटली देतो. किरण आपल्या नायकाला जाम आवडलेली मुलगी नि महदाश्चर्य म्हणजे नायकही किरणला ‘फार्फार आवडलेला. दोघे सहय़ांचं लग्न करतात. या पुस्तकाची निर्मिती 45 वर्षांपूर्वीची… तेव्हा जगावेगळं!

‘चंद्रकिरण’ सोसायटीत स्वतःला घ्यायचा नसलेला ब्लॉक बघायला कथानायक जातो खरा! का? तर ‘ती’ सोबत हवी म्हणून धीराने प्रेमाची कबुली द्यायला अन् ‘जम जाता है सिलसिला’.

अरविंद्र-मनोरमा कथानायकाचे मोठे बंधू आणि वहिनी! आईचा जीव सारा अरविंदमध्ये गुंतलेला. भावंडांत कोणीतरी एक आईचे विशेष लाडके असणे ही गोष्ट जात-धर्म – पंथ – भेद जाणत नाही. ती यत्र-तत्र सर्वत्र आहे. आपल्या कथानायकाची आई त्यास अपवाद कशी असणार? आईला अरविंद अधिक आवडतो. नाविलाज को क्या विलाज? यू हॅव टु ऍक्सेप्ट द फॅक्ट, देअर इज नो अदर गो! खरं ना? आपण आवडते – ऑलसो रेंज-नावडते कोणत्याही स्तरातले असा. ज्याला भावंडे आहेत त्यांना आईची वृत्ती ठाऊकच आहे. जो तो आपल्यापरी ती सहन करतो. आईचे अरविंदधार्जिणेपण कथानायिका किरणलासुद्धा ज्ञात आहे, पण जे जे किरण कथानायकाच्या संसारात आहे ते ते सारे काही अरविंदकडे असावे ही आईची ‘असोशी’ नि त्यासाठीचे ‘ओरबाडले’पण मग किरणला संतप्त करते नि त्याचे परिणाम तिच्या नवऱयाला म्हणजे आपल्या कथानायकाला भोगावे लागतात. बायका शेवटी राग नवऱयावरच काढणार ना! हक्काचा हमाल! घरोघरी हीच परी!

पार्टनरच्या कथेचा एक चिमुकला भाग ‘रंजन या चिमुकल्या, निरागस, गोड बाळानं व्यापला आहे. ती निर्व्याजता हवीहवीशी वाटते. पार्टनर आणि कथानायक यांची दोस्ती हेवा वाटण्याजोगी आहे.

‘रोजमरा जिंदगीत काय मोठे घडते
नोकरी-धंदा आणि संसार तेच ते असते।
तरी त्यातच जगून जगून थकतो
बायकोच्या मिठीचा रोज आसरा शोधतो.
आपणच असतो आपल्या जिंदगीचे नायक
जगायला लागतेच! लायक असो वा नालायक!
फक्त जगण्यात सोबतीला एक ‘पार्टनर’ असावा
कुठल्याही नात्याविना, सारा श्वास मोकळा करणारा व्हावा!’

तोच पार्टनर, संदर्भाशिवाय प्रेम करणारा, गरजेशिवाय जीवनात येणारा नि मग सवयीचा नि नंतर अपरिहार्य होणारा. आपले प्रत्येक स्पंदन ओळखणारा, आपल्यासाठी ‘बेहिशेबी’ असणारा, आपला आधाराचा खांदा होणारा पार्टनर. या कथेत तेच घडते… जे तुमच्या आमच्या आयुष्यात घडते नि तरीही त्यातील ओळन्ओळ वाचनीय झाली आहे. अंतःकरणाला भिडतील, अगदी आपले वाटतील असे संवाद. मी कथानायकाचे नाव उघडले नाही. का? अहो, तो प्रत्येक सर्वसाधारण परिस्थितीत जगणाराच तरुण आहे. ही अगदी तुमची – आमची कथा आहे जनहो? अवश्य वाचा-

‘पार्टनर’!
लेखक – व. पु. काळे
प्रकाशक –  मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठs – 150

मूल्य – 130 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या