
>> द्वारकानाथ संझगिरी
प्रामाणिकपणे कबूल करतो की, धाराशीव जिल्हय़ातल्या सोलापूरजवळच्या नळदुर्गबद्दल मला फारसं काही माहीत नव्हतं. परवा सोलापूरला एका कार्यक्रमाला जाताना माझा मित्र किशोर टेंबे म्हणाला, ‘‘जा, नळदुर्ग बघून ये. मी पाहिलेला नाही, पण खास आहे असं म्हणतात.’’
…आणि मी गेलो.
खास काय आहे विचारलं तर दोन-तीन गोष्टी सांगेन. एक म्हणजे या महाराष्ट्रातल्या उत्तम, भुईकोट किल्ल्यांपैकी तो आहे. दुसरं म्हणजे प्रचंड मोठा आहे. त्याला एकशे चौदा बुरूजं आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘एअरकंडिशण्ड’ पाणीमहाल आहे.
वातानुकूलित? होय, तुमच्या चेहऱयावरचं प्रश्नचिन्ह मला दिसलं. ‘‘त्या काळात वीज कुठून आली?’’ हा तुम्ही वाचता वाचता विचारलेला प्रश्नही मला कळला. बरोबर आहे. त्या काळात वीज नव्हती, पण कल्पकता आणि स्थापत्यशास्त्र्ा एवढं पुढे गेलेलं होतं की, नदीच्या पाण्याचा अफलातून सुंदर वापर केला होता.
पुन्हा मला तुमच्या चेहऱयावर एक प्रश्नचिन्ह दिसलं. किल्ल्यात कुठून नदी आली?
आहे, त्या किल्ल्यातून नदी वाहते. अचूक सांगायचं तर ते नळदुर्ग आणि रणमंडळ हे दोन वेगळे किल्ले आहेत. त्यातून नदी वाहते. आपण ज्याला आज धरण म्हणतो त्या धरणाने नदी अडवली गेलीय. आणि आधुनिक धरणाच्या पोटात गॅलरीज दिसतात. तसा त्या धरणात पाणीमहाल आहे.
तुमची उत्सुकता वाढली असेल तर थोडं खोलात जाऊन सांगतो.
पुराण सांगतं की, हा किल्ला नळराजाने बांधला. म्हणून त्याचं नाव नळदुर्ग! इतिहासात शिरायचं तर काही तज्ञाचं म्हणणं आहे, की तो कल्याणी चालुक्याच्या काळातला! चौदाव्या शतकात तो बहामनी सल्तनतच्या हातात आला. पुढे विजापूरच्या आदिलशहाने जिंकला. त्याने खऱया अर्थाने त्याला युद्धशास्त्र आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पंधरा वर्षे खर्च झाली. या किल्ल्याच्या प्रत्येक बुरुजावर त्या वेळी तोफ होती. किल्ल्याच्या बाजूच्या पठारावर ‘रणमंडळ’ म्हणून तटबंदीने मुक्त असा किल्ला आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यामध्ये असलेला खंदक खोल करण्यात आलाय. त्यात पाणी आहे. ते पाणी बोरी नदीचा प्रवाह वळवून खंदकात आणलंय आणि ते पाणी कायम राहावं म्हणून रणमंडळ आणि नळदुर्ग यामध्ये धरणाच्या बंधाऱयासारखी भिंत बांधलीय. तिथल्या पाण्यामुळे शत्रूला तिथून शिरकाव करता येणं कठीण जात होतं.
पण या पाण्याचा उपयोग फक्त शत्रूच्या मार्गातला अडथळा म्हणून केलेला नाही, तर ‘पाणीमहाल’ वातानुकूलित करण्यासाठी केलाय. हा बंधारा 19 ते 20 मीटर उंच असावा. या बंधाऱयात चार मजले आहेत. त्यात अर्ध्यावर ‘जलमहाल’ आहे. तिथे राजाराणीचं शयनगृह आहे. त्यांच्या खिडक्या नक्षीदार महिरपीने सजवल्या आहेत. मस्त वातानुकूलित वातावरणात ते तिथे निद्रादेवीच्या आहारी जात. त्या महालाची आखणी करणारा आर्किटेक्ट खरंच रोमॅण्टिक असावा. बंधाऱयांतून आत उतरायला पायऱया आहेत आणि अर्ध्या उंचीवर तो जलमहाल आहे. पावसाळय़ात पाणी वाढतं ते पुढे वळवण्यासाठी दोन बंधाऱयांवर दोन मार्ग आहेत. आजच्या इंजिनीअरिंग भाषेत सांगायचं तर दोन ‘स्पिलवेज’ आहेत. एकाचं नाव ‘नर’, दुसऱयाचं ‘मादी.’ कल्पकता पहा. ‘मादी’ या मार्गातून पाणी सरळ जातं. त्यामुळे तिथून हिरवं पाणी दिसतं. ‘नर’ या मार्गातून पाणी उसळी घेऊन जातं. तिथून स्वच्छ दुधासारखं पांढरं पाणी जातं. ज्याने कुणी ही नावं दिली, तो माणूस रसिक साहित्यिक असावा. पुरातत्व खात्याने हा ‘जलमहाल’ मधुचंद्रासाठी जोडप्यांना द्यायला हरकत नाही. एक वेगळा अनुभव! पण यावरून विजापूरच्या आदिलशहाची रसिकता दिसते. पावसाळय़ात जेव्हा ‘नर-मादी’ मार्गातून पाणी वाहत असतं तेव्हा जलमहालात पाण्याचा थेंबही येत नाही. कुठे गेले ते ठेकेदार आणि इंजिनीअर्स?
या किल्ल्याला जे विविध बुरूज आहेत. त्यात भला थोरला ‘नवबुरूज’ आहे. त्याला दगडाच्या नऊ पाकळय़ा आहेत म्हणून त्याला नवबुरूज म्हणतात. कमळाच्या पाकळय़ासारखा तो बुरूज दिसतो. किल्ल्यातून त्याच्या सौंदर्याची कल्पना येत नाही, पण ड्रोन कॅमेऱयाच्या साथीने आकाशात भरारी घेतली तर स्थापत्यशास्त्राचा हा सुंदर आविष्कार पाहता येतो. ते दगडी कमळ जाणवते. किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. त्यातला आणखी एक आकर्षक बुरूज म्हणजे उपळी बुरूज. पायात आणि फुप्फुसात ताकद असेल, तर हा बुरूज चढून जा. वर तीन तोफा होत्या. तो टेहळणी बुरूज असावा. कारण तिथून दूरवर दिसतं.
एरवी भुईकोट किल्ल्यात सापडणाऱया इतर गोष्टी इथेही आहेत. नळदुर्गच्या महाद्वाराला हलबुक द्वार म्हणतात, पण ते खरं महाद्वार नाही. तिथून नागमोडी वळणं संपली की, मग खरं महाद्वार येतं. जे तोडण्याची ताकद हत्तीच्या गंडस्थळातही नसावी. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या किल्ल्याची निगा राखण्यासाठी आणि पर्यटकांना तो पाहणं सोपं व्हावं म्हणून तो एका खासगी कंपनीकडे सोपवलाय. त्यामुळे थोडी डागडुजी झालीय. आत फिरायला माणशी पन्नास रुपये भरून इलेक्ट्रिक गाडय़ा आहेत. आता तिथे बागा फुलवल्या आहेत, पण किल्ल्यावरच्या महत्त्वाच्या पाटय़ा अजून अश्मयुगात आहेत. पाणीमहालाजवळची महत्त्वाची पाटी भग्नावस्थेत होती. जलमहाल उघडून देणारा माणूस शोधावा लागत होता.
आपल्याकडे जगाने तोंडात बोटं घालावीत अशा केवढय़ा वास्तू आहेत. त्यात सौंदर्य, कलाकुसर, भव्यता, सर्वकाही आहे. कुठलंही शास्त्रीय शिक्षण न घेता उभारलेली धरणं, घुमट, इमारती पाहून आपणही दिङमूढ होतो, पण जगाच्या नकाशावर आपण या वास्तूंना कधी टाकलंच नाही, पण हे दुःख किती दिवस उगळायचे? गेंडय़ाची कातडी. टीकेच्या मॉईश्चरायझरने मऊ कधी होतच नाही.



























































