माऊंट कूक ते लिंडीस व्हाया लेक पुकाकी

3248

>> द्वारकानाथ संझगिरी

न्यूझीलंडचं सर्वात उंच शिखर म्हणजे ‘माऊंट कूक’. युरोपियन वसाहतदारांमधला कॅप्टन कूक हा मूळ पुरुष असल्यामुळे बऱयाच ठिकाणी ‘कूक’ हे नाव न्यूझीलंडमध्ये आढळेल. गांधी घराण्यालाही असूया वाटावी एवढय़ा ठिकाणी कूकचं नाव आढळतं. या माऊंट कूकची उंची 2014 साली 3,724 मीटर (12,218 फूट) मोजली गेली. 1991 साली ती 3,764 मी. (12,349 फूट) होती. माउंैट कूक थोडा बुटका व्हायचं कारण दगडाचं कोसळणं (रॉक स्लाईड). हायकिंगची हौस तुम्ही तिथे भागवू शकता, पण शिखर आधी लांबून आणि मग बऱयापैकी जवळून पाहायलाही मस्त वाटतं. आकाश निरभ्र असेल तर ते 150 किलोमीटरच्या परिघातूनही दिसतं. हायवेवरून जाताना ते खुणावत असतं. सुपाच्या टोकासारखं त्याचं रूप नजरेत रुतून राहतं. सूर्यास्ताच्या वेळी पाहताना ते सोन्याच्या शिखरासारखं दिसतं. आम्ही सूर्यास्ताच्या वेळीच तिथे पोहोचलो तेव्हा शिखरावर सोन्याचे कण कुणीतरी टाकून गेलाय असं वाटलं.

गर्दीत दूरवर पांढरे कपडे घातलेली सिंड्रेला दिसावी तसं ते शिखर दिसत राहतं आणि अचानक ती सिंड्रेला तुमच्या समोर दत्त म्हणून हजर राहते. तिथे पायथ्याशी एक गाव आहे आणि कुशीत एक हॉटेल. त्या हॉटेलवर एक रात्र राहायची संधी आम्ही हुकवली. अंगावर मरिनो लोकर चढवली तरी थंड वारा खटय़ाळपणा करताना गुदगुल्या करता करता बोचकारत होता. एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण घेतले. त्या रेस्टॉरंटचा ऑम्बियन्स अतिशय सुंदर होता. उच्चभ्रू रेस्टॉरंट होते. गोरी जोडपी ग्लासाला ग्लास भिडवून वाईन घेता घेता रोमँटिक होत होती. ते वातावरणच असं होतं की, उबेसाठी मेरिनो लोकरीपेक्षा प्रियकर किंवा प्रियतमेची ऊब जास्त गरजेची वाटत होती. त्यावेळी न्यूझीलंडमध्ये प्रथम मी गोऱया वेटर्स आणि वेट्रेसेसच्या नजरेत हिंदुस्थानीयांबद्दलची तुच्छता पाहिली. आम्ही आठ जण होतो. त्यात दोन लहान मुले. त्यात थंडी. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर टॉयलेट, अमुकतमुक करत सेटल व्हायला थोडा उशीर व्हायचा. बरेच पदार्थ असे असतात की, ज्याचे गुणधर्म आपल्याला ठाऊक नसतात. नशीब तिथे पदार्थांची नावे माओरी भाषेतली नाहीत. त्या वेटर्सना वाटलं, ‘‘ही मंडळी कुठून आपला वेळ घ्यायला आली आहेत?’’ कायदे आले तरी काही गोऱया माणसांच्या अंतर्मनातला वर्णश्रेष्ठत्वाचा तथाकथित अहंकार गेलेला नाही. आपल्याकडे तेच असतं म्हणा. वर्णाची जागा फक्त धर्म किंवा जात घेते. पहिल्यांदा मला असं वाटलं की, न्यूझीलंडमध्ये आमची ऑर्डर नाइलाज म्हणून घेतली जातेय. खाणं कंटाळून सर्व्ह केलं जातंय. त्यात पूर्वी हिंदुस्थानीयांकडे पाहताना ‘हे कडके’ असं पाहिलं जात होतं. आता युरोपियन गोरे ज्याला ‘महाग’ म्हणतात त्या गोष्टी हिंदुस्थानी पर्यटक लीलया विकत घेतात.

माउंैट कूकचं डोळय़ात वसलेलं सौंदर्य यःकश्चित वेटरच्या उद्दामपणामुळे काही डागाळलं नाही. अजूनही ते माझ्या डोळय़ांत ओनरशिपची जागा घेऊन बसलंय. तिथे वर चढून जायची मोहीम मी पुढच्या जन्मी ढकललीय. कारण 12 हजार फूट फार मोठी उंची नाही. सिक्किममधला शांगू लेक मला वाटतं, त्याच उंचीवर आहे. हे शिखर अनेकांनी सर केलंय. त्यातलं एक नाव आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे ते म्हणजे एडमंड हिलरी. एव्हरेस्ट सर करणारा पहिला मानव. पहिलं पाऊल त्याचं होतं. मग शेर्पा तेनसिंगचं! 1948 साली त्याने माऊंट कूक सर केलं आणि 29 मे 1953 साली एव्हरेस्ट. अर्थात माउंैट कूक सर करणं मॅट्रिक पास होणं होतं, एव्हरेस्ट सर करणे डॉक्टरेट! त्याने ती फक्त पाच वर्षांत पूर्ण केली हे महत्त्वाचं.

त्या माऊंट कूकच्या जवळच एक आणखी तलाव आहे. त्याचं नाव ‘लेक पुकाकी.’ माऊंट कूककडे जाताना तो बराच काळ कंपनी देतो. त्यामुळे डोळे सुखावतात. तो तलाव निळय़ा पाण्याचा आहे हे मी पुनः पुन्हा सांगणे म्हणजे किशोरी आमोणकर काय सुंदर गायच्या असं म्हणण्यासारखं आहे. किशोरीताई गायल्या म्हणजे चांगल्याच गायल्या हे जितकं गृहित आम्ही धरायचो, तेच तलावाचं आहे. न्यूझीलंडचा तलाव निळा नसेल तर मी तसा उल्लेख करीन, पण या प्रवासात तरी मला ती संधी मिळाली नाही. या पुकाकी तलावाची निळाई ही ग्लेशियर्सच्या पिठीमुळे आहे. आता ‘‘पीठ हा काय प्रकार आहे?’’ असे तुम्ही विचारणारच, तर दगडाचे जे पिठासारखे कण आहेत त्यांना ग्लेशियर्स फ्लोअर असं म्हणतात. त्यामुळे ते पाणी निळं दिसतं. हा तलाव जिथे पुकाकी नदीला जाऊन मिळतो तिथे धरण बांधलंय. धरणाचा मुख्य हेतू वीज निर्माण करणं आहे. धरण हा माझ्या सिव्हिल इंजिनीअरिंग कारकीर्दीतला एक आवडता विषय असल्यामुळे थंड वाऱयाला न जुमानता मी ते धरण पाहिलं.

माउंैट कूकवरून वानाका या निसर्गरम्य चिमुकल्या टाऊनमध्ये जाताना तुम्हाला लिंडीस लागते. पास म्हणजे आपल्या आईच्या भाषेत खिंड. खिंड म्हटली की, मराठी माणसाला पावनखिंड आठवते. डोळय़ांसमोर बाजीप्रभू दिसतो. पेशावरला गेल्यामुळे मला खैबरखिंडही आठवते. कारण खैबरखिंड म्हणजे पूर्वीचा सिल्क रूटचा भाग किंवा जिथून शक आले, हूण आले, मोगल आले ती खिंड! दोनदा या पेशावरला जाऊनही मला ती खिंड पाहायला मिळाली नव्हती. न्यूझीलंडमधल्या लिंडीस खिंडीला तसा काही इतिहास नाही. ती खूप सौंदर्यशालीही वाटली नाही. आपल्याला बोडक्या डोंगराचं काय आकर्षण? आपण दगडांच्या देशात राहतो. तो पाऊसपाणी नसलेला भाग असावा. तुळतुळीत गोटा केलेले डोंगर होते. बरं, चिंचोळा भागही खूप चिंचोळा नव्हता. हिंदुस्थानात फिरणाऱया माणसाला फार वेगळं वाटत नाही, पण या गोऱया लोकांची तुळतुळीत गोटे केलेले डोंगर विकण्याची मार्केटिंगची ताकद मी मानली. अनेक जण खिंडीतून फेरफटका मारतात. खरंच, ते काहीही विकू शकतात. ज्या वानाकात आम्ही तीन रात्री मुक्काम ठोकला तिथल्या तलावात किनाऱयापासून 25-30 फुटांवर एक झाड आहे. ती ‘विलो ट्री’ असावी. अरे, काय कौतुक त्या झाडाचं! न्यूझीलंडमध्ये कुठल्याही झाडाचे इतके फोटो काढले गेलेले नाहीत. कौतुक मोठं असलं तरी रस्त्यावर तिथे जाण्याच्या पाटय़ा नाहीत. अलीकडे जीपीएसमुळे त्याची गरज लागत नाही. थंड वारा झेलत मी एकटाच त्या झाडापर्यंत पोहोचलो. कमीत कमी शंभर पर्यटक त्या झाडाकडे अनिमिष नजरेने पाहत होते. जणू ओलेती एलिझाबेथ टेलर किंवा बोडेरेन पाण्यात उभी आहे. मला अणुभरही कौतुक वाटलं नाही. पाण्यात एकटं उभं आहे हीच फक्त कौतुकाची बाब. माणसं जाऊ देत, आसपासच्या झाडांनाही त्या झाडाचा हेवा वाटला नसता, पण वानाकात काय काय आहे यासाठी गुगलवर गेलात तर झाड सर्वत्र दिसते. पाणी ओसरत असताना लोक झाडावर चढतात म्हणून तेवढा आक्रोश केला जातो.

दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए!

z [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या