
>> द्वारकानाथ संझगिरी
आम्ही वर्तमानपत्रातली एका कोपऱ्यातली बातमी वाचली का? नसेल तर मी सांगतो.
आयर्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यात हिंदुस्थानी रक्ताच्या लिओ वराडकरच्या पक्षाचा पराभव झालाय. तिथे ‘आघाडीचं सरकार’ यायची शक्यता आहे आणि त्यात मोठा वाटा कुणाचा आहे? ‘सिनफेन’ या पक्षाचा! म्हणजे गेल्या लेखात उल्लेखलेल्या मार्क्सवादी पक्षाचा ‘अखंड आयर्लंड’चं स्वप्न एकेकाळी पाहणाऱया डाव्या पक्षाचा, पण त्यांनी ही निवडणूक जिंकली पोटाच्या प्रश्नावर! म्हणजे भाकरी (ब्रेड ऍण्ड बटर), राहणीमान, इन्शुरन्सचे हप्ते, पेन्शनचे बदल वगैरेच्या संदर्भात. थोडक्यात, कुठल्याही ‘अखंड आयर्लंड’च्या भावनिक प्रश्नावर नाही. त्यांना पाठिंबा तरुणांचा आहे.
मी या प्रश्नाकडे वळण्याची दोन कारणे. लिओ वराडकरबद्दल आपल्याला आस्था आहे. कारण त्याचे वडील मराठी आणि आपल्या कोकणातले. तो आताच कोकणात येऊन गेला. एका कोकणी माणसाचा मुलगा आयर्लंडचा पंतप्रधान होतो म्हटल्यावर आयर्लंडशी पर्यटनाशिवाय संबंध नसतानाही आपली कॉलर जरा वर गेली होतीच आणि दुसरं म्हणजे बेलफास्टच्या भिंतीवरची चित्रं समजून घ्यायला तिथल्या क्रांतीकडेही थोडं वळण्याची गरज आहे. त्यात आयआरए या लढाऊ संघटनेशी संबंधित हा मार्क्सवादी सिनेफेन पक्ष आहे.
अगदी थोडक्यात मी त्या क्रांतीची गोष्ट सांगतो. 1921 साली आयर्लंडची फाळणी होऊन एक तुकडा ब्रिटिशांनी ठेवला. त्या तुकडय़ाचं बेलफास्ट हे महत्त्वाचं शहर. तिथे प्रामुख्याने दोन धर्माची मंडळी राहतात. बहुसंख्य प्रोटेस्टंट्स आणि मोठी अल्पसंख्याक जमात असलेले कॅथलिक ख्रिस्ती. स्वतंत्र आयर्लंड देश हा या कॅथलिक बहुसंख्याकांचा असल्यामुळे नॉर्दर्न आयर्लंडमधल्या कॅथलिकांना नॉर्दर्न आयर्लंड मूळ आयर्लंडला जोडलं जाऊन अखंड आयर्लंड व्हावंसं वाटतं, पण प्रोटेस्टंट मंडळींना बहुसंख्य प्रॉटेस्टंट असलेल्या इंग्लंडबरोबरच राहायचंय, पण त्यांना आयरिश संस्कृतीशी नाळ तोडायची नाही. या संस्कृतीच्या पगडय़ामुळे काही तुरळक प्रोटेस्टंट तुम्हाला अखंड आयर्लंडच्या बाजूचेही दिसतील आणि इंग्लंडबरोबर राहणं अधिक चांगलं वाटल्याने काही कॅथलिक नॉर्दर्न आयर्लंड इंग्लंडमध्येच राहावं या मताचेही दिसतील.
हा एकीकरणाचा लढा 1960 ते 1998 पर्यंत लढला गेला. त्याला ‘द ट्रबल्स’ असं नावं पडलं. हा लढा अर्थात अखंड आयर्लंडचे स्वप्न पाहणारे ‘आयआरए’ कॅथलिक आणि ब्रिटिश पोलीस आणि लष्कर यांच्यामध्ये झाला. बंदुका आल्या म्हणजे हिंसा आली. रक्तपात झाला. त्याचे पडसाद बॉम्बस्फोटांच्या रूपाने बऱयाचदा इंग्लंड आणि युरोपमध्ये उमटत. ब्रिटिश आर्मीचं आधी कॅथलिक मंडळींनी स्वागत केलं, पण त्यांनीसुद्धा पक्षपातीपणा केला आणि कॅथलिकांवर अन्याय केल्याची तीक्र भावना निर्माण झाली. 1972मधला एक रविवार रक्तरंजित रविवार ठरला. नॉर्दर्न आयर्लंडच्या डेरीमध्ये 26 निःशस्त्र्ा आंदोलकांना ब्रिटिश आर्मीने गोळय़ा घातल्या. रबरी गोळय़ा, लाठय़ा, मोटारीच्या धडकांनी अनेकांना जखमी केले गेले. अर्थात पुढे शांतता प्रस्थापित झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने दोन चौकशी समित्या बसवल्या. गंमत पहा. त्यांनी जवळपास ब्रिटिश सैनिकांच्या बाजूने निर्णय दिला. त्यांनी म्हटले, ‘‘सैनिकांनी थोडा बेजबाबदार गोळीबार केला, पण त्यांनी फक्त ज्यांच्या हातात बंदुका आणि बॉम्ब होते त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या.’’ असं सर्टिफिकेट दिले. इंग्लंडमध्ये उत्तम दर्जाची लोकशाही असल्यामुळे त्यावर चौफेर टीका झाली. त्यामुळे 1998 साली सेव्हिल समिती लॉर्ड सेव्हिलच्या नेतृत्वाखाली बसवली. 12 वर्षांनी त्यांनी निर्णय दिला की, कुठलेही बॉम्बस्फोट केले नव्हते. मोर्चातल्या मंडळींनी कुठल्याही गोळ्या झाडल्या नव्हता. सैनिकांनी चुकीची माहिती दिली होती. त्यांनी निःशस्त्र्ा नागरिकांवर गोळीबार केला होता. असं निःसंदिग्धपणे सांगितले. मला इंग्लंडची लोकशाही भावते. कारण सरकारने प्रेस्टिज पॉइंट केला नाही. त्यावेळचे ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरनने देशाची नाही, तर युनायटेड किंगडमची म्हणजे इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंडची माफी मागितली आणि सैनिकांवर चक्क ‘खुनाचा’ आरोप ठेवला.
ज्यावेळी रक्त सांडले जात होते तेव्हा मला तिथे घेऊन गेलेला टॅक्सी ड्रायव्हर तिथे होता. त्याला गोळी लागून तो जखमी झाला होता आणि त्याचा भाऊ हुतात्मा झाला होता. त्या जागी नेऊन ती म्युरल्स पाहताना हा सर्व प्रसंग मला त्याने रंगवून सांगितला. तेव्हा माझ्या अंगावर 2019 सालातही शहारे आले. या अखंड आयर्लंडच्या लढय़ात जवळपास साडेतीन हजार माणसं मारली गेली. त्यातले 52 टक्के साधे निःशस्त्र्ा नागरिक होते. 32 टक्के मिलिट्री आणि पोलिसांमधले शिपाई होते आणि 16 टक्के ‘आयआरए’ किंवा तत्सम लढाऊ संघटनांचे होते.
1998 साली ‘गुड फ्रायडे ऍग्रीमेंटवर’ सह्या झाल्या. त्यानंतर सत्याग्रह, बॉम्बस्फोट, रक्तपात संपला. आग विझलेली नाही. निखारे थंडगार झालेले नाहीत. इंग्लंड, ब्रेग्झिटमधून बाहेर पडल्यामुळे आणि या मार्क्सवादी पक्षाच्या हातात सत्ता जाण्यामुळे पुन्हा एकदा त्यात तेल टाकलं जाईल का? हा प्रश्न विचारात घेण्यासारखा आहे. पण तुम्ही जर बेलफास्टला गेलात आणि ती बेलफास्टची भिंतीचित्रं पाहिलीत तर हा इतिहास मनात ठेवून जा, तर त्यातली माणसं तुमच्या समोर जिवंत होऊन येतील.



























































