
>>द्वारकानाथ संझगिरी
लतादीदींचं गाणं हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एकात्मतेचं गाणं होतं. ते आर्थिक विषमतांना भेदणारं गाणं होतं.
ते श्रीमंतांच्या कोठीवर नांदायचं आणि गरीबांच्या झोपडीतही वावरायचं.
त्याला जात नव्हती, धर्म नव्हता, देश नव्हता आणि आर्थिक वर्गही नव्हता.
कार्ल मार्क्सच्या काळात जर लतादीदी जन्माला आल्या असत्या आणि लतादीदींचं गाणं असतं तर ते गाणं मार्क्सने आपल्या तत्त्वज्ञानाची पताका म्हणून वापरलं असतं.
एक उदाहरण देतो,
‘ऐ मालिक तेरे बंदे हम…’ हे व्ही. शांतारामांच्या ‘दो आँखें बारह हाथ’मधलं प्रीर्थना गीत आहे. लिहिलं भरत व्यासांनी. ते हिंदू. संगीत दिलं वसंत देसाईंनी. तेही हिंदू. आणि गायलं लता मंगेशकरने. पण ती प्रार्थना पाकिस्तानमधल्या पंजाबात सरकारी शाळेत प्रार्थना गीत म्हणून त्या वेळेला काही काळ लावलेली होती. हे जेव्हा मी वाचलं ना, तेव्हा मलाही सुखद धक्का बसला. तिच्या गाण्यांना देश ओलांडायला ना पासपोर्ट लागायचा, ना व्हिसा. फक्त दोन कान आणि भावना जपणारं हृदय, याचीच गरज असायची.
परवा एका पाकिस्तानी डॉक्टरची लतादीदींबद्दलची एक पोस्ट व्हायरल झाली होती. त्यात सर्जरीची तुलना त्याने तिच्या गाण्याशी केली होती. काय व्यक्त होतं यातून?
1987 च्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या निमित्ताने मी पाकिस्तानला गेलो होतो. एकदा लाहोर ते पेशावर या बसप्रवासात रात्री त्या बसच्या ड्रायव्हरने लतादीदींची गाणी लावली होती. बस एका स्टॉपवर थांबल्यावर चहा पिता पिता मी त्या ड्रायव्हरला विचारलं, ‘तुम्ही नूरजहाँची गाणी लावत नाही?’
त्याने पंजाबी शिवी हासडली आणि म्हणाला, ‘ती आमची मल्लिका-ए-तरन्नुम असेल. पण तिने पाकिस्तानात इश्कबाजीच जास्त केलीय. आम्हाला लता भावते.’
लताचं गाणं हे द्वेषाच्या खंजिराचं रूपांतर मोरपिसात करायचं.
परवा लंडनच्या ‘इकॉनॉमिस्ट’मध्ये लतादीदींवर एक मृत्युलेख आला. ‘इकॉनॉमिस्ट’साठी गाणं, गायक हा काही विषय नाही. पण तरीही हिंदुस्थानातलं बॉलीवूड गाजवलेल्या, सिनेमांची गाणी गाणाऱ्या एका गायिकेवर त्यांना मृत्युलेख लिहावासा वाटला.
का वाटला असावा?
1952 सालची एक गोष्ट राजू भारतन नेहमी सांगायचा. त्या वेळेला तो लंडनला हिंदुस्थानची क्रिकेट सीरिज कव्हर करायला गेला होता आणि तिथे ‘अनारकली’ लागला होता. आणि ‘टाइम्स’ने अनारकलीचं कौतुक करताना, अनारकलीबद्दल असं लिहिलं होतं, ‘She looks divine. And sings like an angel.’
ते Divine म्हटलं होतं ते बीना रायबद्दल. पण त्यांना असं वाटलं की, ती स्वतः बीना रायच ते गाणं म्हणते. प्ले बॅक सिंगिंग हे त्या काळामध्ये तिथे फारसं पॉप्युलर नसावं. किंबहुना त्याची सुरुवात जास्त बॉलीवूडमध्येच झालीय आणि बॉलीवूडमध्ये त्याचा खूप उपयोग झाला.
1974 साली लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सांगीतिक कार्यक्रम लतादीदींनी केला. तिथे असा कार्यक्रम करणारी ती पहिली हिंदुस्थानी स्त्री होती. कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर एकही खुर्ची रिकामी नव्हती. त्यानंतर शहर कुठलंही असो, लंडन किंवा वेलिंग्टन, देश कुठलाही असो, अमेरिका किंवा कॅनडा, रिकाम्या खुर्च्या लतादीदींनी कधी पहिल्याच नाहीत.
परवाच एक कुठे तरी किस्सा वाचला. टोरांटोला एका प्रचंड ऑडिटोरियममध्ये फ्रँक सिनात्रा या त्या मातीतल्या अतिशय लाडक्या गायकासाठी तो अर्धा हॉल भरला होता. पण लतादीदी तिथे गेल्या आणि तो हॉल दुथडी भरून वाहायला लागला. लतादीदींची ताकद ही होती आणि म्हणून मी तिच्या गाण्याला आंतरराष्ट्रीय एकात्मता असं म्हणतो.
एकेकाळी सिनेसंगीताकडे कुत्सितपणे पाहायची एक वृत्ती होती. प्रथम के. एल. सहगल आणि मग लतादीदींनी ही वृत्ती पूर्णपणे बदलली. तिने उच्चभ्रू अभिरुची व्याख्या असलेल्या शास्त्रीय मैफलीतलं आणि नाटकात रमलेलं संगीत थेट लोकांच्या ओठावर आणलं. अभिजात संगीताचा समुद्रही केवढा मोठा! अनेक रथी-महारथीनी तिथे मुशाफिरी केली. लतादीदींनी तिथे मुशाफिरी केली नाही. पण तिने लोकप्रिय सिनेसंगीताचा एक हिमनगच उभा केला. जो या समुद्राच्या वर होता किमान एक पंचमांश!
सर्वसाधारण माणसाला राग कोणता? तो शुद्ध आहे का मिश्र? ताल कुठला? याचं काही फारसं देणंघेणं नसतं. एक सुरेल आवाज आणि त्या गाण्यातले भाव, त्याच्या थेट हृदयाला भिडले ना, की त्याला ते गाणं आवडायला लागतं. तो कानसेन असतो. आणि मग ते गाणं त्याच्या हृदयातून ओठावर येतं. आणि तो आपल्या आवाजात गुणगुणायला लागतो. त्यात मालकही आला आणि नोकरही आला. कारण शेवटी मानवी भावना या आर्थिक स्तराप्रमाणे बदलत नाहीत. प्रेमात मालकही पडतो, नोकरही पडतो. प्रेमभंग मालकाचाही होतो आणि नोकराचाही. आनंद, दुःख यालाही होतं, त्यालाही. फक्त प्रत्येकाच्या दुःखाच्या आणि आनंदाच्या व्याख्या वेगळ्या असतील. त्यामुळेच लताचं गाणं कुणालाही भिडलं.
एकदा सी. रामचंद्रांनी प्लेबॅक सिंगर्सची तुलना टेप रेकॉर्डरशी केलेली होती. त्यामध्ये विचारापेक्षा राग किंवा कुणीतरी दुखावल्याची भावनाच जास्त मोठी होती आणि ते मला न पटणारं होतं.
पण माझं स्पष्ट मत आहे की, गायक हेसुद्धा गळ्यातून अभिनय करत असतात. जसे नट किंवा नटी, भावना आपल्या चेहऱ्यावर आणि संवादाच्या चढ-उतारातून दाखवतात, तसंच त्या गाण्यांमधील भावना व्यक्त करताना गायक आपल्या गळ्यातून तो अभिनय करतोय. आणि लता मंगेशकरांच्या बाबतीत तर ती गळ्याने अभिनयसम्राट होती.
मला एक उदाहरण आठवतंय.
नर्गिसनेच एकदा म्हटलं होतं, ‘आह’मध्ये एक गाणं आहे ‘राजा की आएगी बरात.’ तिने म्हटलं होतं, ‘हे गाणं पडद्यावर सादर करताना मला ग्लिसरीनची गरजच लागली नाही. कारण ते शब्द कानावर पडल्यावर आणि त्या गाण्यावर अभिनय करत असताना डोळ्यातून आपोआप अश्रू आले.’
ते अश्रू आले, कारण त्या गाण्यात जे भाव होते, ते लतादीदींच्या गळ्यातून उमटले. आणि म्हणूनच असेल, मोठे शास्त्रीय गायक लताला श्रेष्ठ मानतात. मग ते पं. भीमसेन जोशी असोत, कुमार गंधर्व असोत किंवा बडे गुलाम अली खान.
एक छोटासा किस्सा सांगतो, 1952 सालचा आहे आणि त्या वेळेला कोलकात्यामध्ये एक मैफल होती, शास्त्रीय संगीताची. आणि त्या शास्त्रीय संगीताच्या मैफलीमध्ये लतादीदींना बोलावलं होतं. जे गायक, गायिका गाणार होते त्यामध्ये लतादीदींचा नंबर शेवटून दुसरा होता. म्हणजे तिच्या नंतर फक्त बडे गुलाम अली खान गाणार होते.
लतादीदींना टेन्शन आलं की, आपण कुठलं गाणं गावं? कारण सिनेमातलं कुठलंही गाणं गावं तर ते या मैफिलीसाठी योग्य ठरणार नाही. कारण मैफलीची शान वेगळी होती. मग तिने असं ठरवलं की, सुधीर फडकेंच्या ‘मालती माधव’ या सिनेमातलं ‘बाँध प्रीति फूल डोर…’ हे बहुदा जयजयवंती या रागावर आधारित असलेलं गाणं गावं. तिने ते गाणं तिथे म्हटलं आणि तिला वन्स मोअर मिळाला. एकदा नाही, दोनदा नाही, अनेकदा. आणि त्यानंतर बडे गुलाम अली खान यांनी तिला आपल्या बाजूला बसवून घेतलं. तीन ते साडेतीन मिनिटांचं गाणं म्हणणाऱ्या लता दीदींचा हा आब होता. आणि तिच्याबद्दल मोठमोठय़ा गायकांची ही भावना होती. आणि म्हणूनच बडे गुलाम अली खान यांनी असं म्हटलं असावं की, ‘आम्हाला वातावरण निर्मितीसाठी तीन तास लागतात. ते ही मुलगी तीन-साडेतीन मिनिटांत करते.’
रोज सूर्य उगवत असतो आणि तरीदेखील आपल्याला सूर्याचा कधी कंटाळा येत नाही. किंबहुना एक दिवस सूर्य उगवला नाही ना, तर आपलं मन सूर्यदर्शनासाठी व्याकूळ होतं. लतादीदींच्या आवाजाचंही तसंच आहे. वर्षानुवर्षे तो रोज सकाळी ऐकायला येतो, दुपारी ऐकायला येतो, संध्याकाळी ऐकायला येतो, रात्री ऐकायला येतो. तरीदेखील त्या आवाजाचा कधी कंटाळा आला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो आवाज आपल्या कानावर पडला नाही तर आपण व्याकूळ होतो.
मला असं वाटतं की, हे फक्त दैवी गोष्टींच्या बाबतीतच घडतं. म्हणूनच ईश्वराचं नाव आणि लतादीदी यांचं गाणं याचा कंटाळा येत नाही.
(लेखक ज्येष्ठ क्रिकेट आणि सिनेसमीक्षक आहेत.)


























































