
>> द्वारकानाथ संझगिरी
लखनऊसाठी खेळणाऱया मयांक यादवने जवळपास ताशी 156 किमी वेगाने टाकलेला चेंडू पाहिला आणि मी थरारलो. अजून उभे राहिलेले केस नीट बसलेही नाहीत. आयपीएलमधला तो सर्वात वेगवान चेंडू म्हणे!
मी पूर्वीच्या उत्साहाने आयपीएल आता पाहत नाही. अतिक्रिकेटने क्रिकेट पाहायची ती माझी उत्सुकता, तो उत्साह, बंगळुरूमधल्या पाण्यासारखा आटला; पण त्या दिवशी सामना लावला तेव्हा पंजाबची आघाडीची जोडी धमाल करत होती आणि बघता बघता एका तरुण वेगवान गोलंदाजाने सामना फिरवून टाकला. तेसुद्धा तुफानी मारा करून. त्याची ती पहिली आयपीएल मॅच. त्याला शेवटचं अस्त्र असल्यासारखा आणला गेला. ते ब्रह्मास्त्र निघालं.
मी आयुष्यात अनेक वेगवान गोलंदाज पाहिले. हॉल, लिली, थॉमसन, मार्शल, रॉबर्टस्, स्टेन, शोएब. शोएबला मी एकदा ताशी 160 किलोमीटर वेगाने चेंडू टाकलेला (किंवा फेकलेला) पाहिला. पण हा शिडशिडीत, छोटय़ा चणीचा चक्क हिंदुस्थानी गोलंदाज. भरतभूमीत 4 षटकांत 9 चेंडू ताशी 150 किमी वेगाने टाकून गेला. त्यात उसळत्या चेंडूचा टप्पा हवा तसा. त्याच्या चेंडूवर स्वार व्हायला गेलेले फलंदाज कोसळले.
हिंदुस्थानात वेगवान गोलंदाजीची परंपरा नव्हती. वेगवान गोलंदाज उंच, धिप्पाड, लाल मांस खाणारा हवा या परंपरागत कल्पना डोक्यात होत्या. चेंडू वेगात टाकण्याचं विज्ञानाच्या सहाय्याने विश्लेषण झालं. त्यावेळी काही गोष्टी बदलल्या. तरीही डायनामाइट्स आर पॅक्ड इन स्मॉल पॅकेटस्शी नातं सांगणारा हिंदुस्थानी गोलंदाज पाहिला की अंग शहारतं.
माझा अत्यंत जवळचा मित्र रमाकांत देसाईचं वर्णन तसं करतो. मी त्याला ऐन तारुण्यात कधी पाहिला नाही, पण बाळू गुप्तेने सांगितलेला एक किस्सा आठवतो. 1958 साली दिल्लीच्या फिरोजशाह कोटलाच्या दगडावर असा स्पेल टाकला की, बाद झाल्यावर रोहन कन्हायसारखा फलंदाज हलला. म्हणाला, ‘मला वाटलं, तू जगातला सर्वात वेगवान गोलंदाज आहेस; पण हा बुटका छोटा (टिनी) गोलंदाज तुझ्यापेक्षा वेगात टाकतो. तेव्हा स्पीडगन नव्हत्या.
मयांक यादव पुढे किती मोठा होईल, टिकेल का, फिट राहील का? की एक चमकलेली वीज… मला ठाऊक नाही. उद्याच्या उदरात इतकं सहजासहजी डोकावता येत नाही, पण काही क्षण तो क्रिकेट माझ्यासाठी पुन्हा रंजक करून गेला आणि माझ्या लाडक्या मित्राची आठवण त्याने चाळवली.


























































