
>> द्वारकानाथ संझगिरी
दुबईची ‘फोटोफ्रेम’ तिथे रस्त्यात जाता येता पाहत असताना मला अमेरिकेतल्या सेंट लुईस शहरातली अशीच एक आर्च (कमान) आठवत होती. दुबईच्या त्या वास्तुरचनाकाराला या महाकाय कमानीमुळे ‘फोटोफ्रेम’ची कल्पना सुचली का? असं वाटू लागलं. अर्थात आता कुणी कबूल करणार नाही, पण दोन्ही वास्तूंच्या जन्मकहाणीत काही साम्यस्थळं आहेत. अर्थात सेंट लुईसची ‘आर्च’ कितीतरी ‘ज्येष्ठ’ आहे.
सेंट लुईस हे अमेरिकेतल्या मिसुरी प्रांतातलं एक शहर. ते मिसिसिपी नदीच्या काठावर आहे. सहा-सात वर्षांपूर्वी मी शिकागो, सेंट लुईसला दिवाळीच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो, तेव्हा ती मी पाहिली होती. मला आजही आठवतं की, बोचरी थंडी होती. तापमान शून्य डिग्री सेंटिग्रेडच्या खाली होतं, पण ती ऐतिहासिक आर्च पाहायचा मी माझा हट्ट पूर्ण केला होता. तिथे बरं असतं. इंग्लंडप्रमाणे थंडीत मन खचणारं वातावरण नसतं. सूयं तळपत होता. त्यामुळे ती स्टेनलेस स्टीलचं ‘वस्त्र्ा’ नेसलेली आर्च एखाद्या उलटय़ा रत्नहाराप्रमाणे चमकत होती. 630 फूट ती उंच आहे. 1947 साली ती फिनिश अमेरिकन (मूळ फिनलंडचा) वास्तुरचनाकार ‘इटो सॅटिनेन’नी ती आधी ड्रॉईंग बोर्डवर उभी केली. 12 फेब्रुवारी 1963ला तिथं बांधकाम सुरू झालं. 28 ऑक्टोबर 1965ला बांधकाम संपलं. 10 जून 1967 रोजी आजच्या राजकीय पुढाऱयांचा आवडता शब्द वापरायचा तर तिचं लोकार्पण झालं. त्यावेळी 13 दशलक्ष डॉलर्स खर्च झाला. आजची तिची किंमत 77.5 दशलक्ष डॉलर्स असेल.
ही आकडेवारी मी मुद्दामहून दिली. लोकशाही आणि हुकूमशाहीमधला फरक दाखवण्यासाठी. हुकूमशाहीत एखाद्या शेखला स्वप्न पडतं आणि तो फ्रेम बांधून टाकतो. लोकशाहीत तसं घडत नाही. सेंट लुईस शहरात मिसिसिपीच्या काठावर काहीतरी करावं हा विचार 1933 पासून सुरू होता. शहरासाठी एक मॉन्युमेंट हवं, पण मग ते काय हवं यावर चर्चा झडल्या. मग ती चर्चेची गाडी एखादी इमारत, शॅफ्ट करत आर्चच्या (कमान) स्टेशनवर थांबली. मॉन्युमेंट का तर या सेंट लुईसच्या पश्चिमेपासून पश्चिम अमेरिका सुरू होते. अमेरिकन साम्राज्य तिथून पश्चिमेला सरकलं. अमेरिकन इतिहासासाठी ती मोठी घटना आहे. मग आर्च का? तर त्यातून ते पश्चिमेचं साम्राज्य दिसतं. दुबईच्या फ्रेमची कल्पना कुठून आली असावी याचा मग संशय येतो. असो.
लोकशाही म्हटली की, पैसा कुठून येणार याबद्दल वाद-विवाद, विरोध वगैरे प्रकार असतातच. तेही झाले? कौन्सिलच्या इतर कामांना पैसा नाही, मग या मॉन्युमेंटची काय गरज आहे? वगैरे प्रश्न विचारले गेले. मग जी जागा हवी होती त्यासाठी रेल्वे ट्रक बदलणं आलं. थोडक्यात लोकशाहीतले विविध अडथळे पार करत काम सुरू झालं. जशी विरोध करणारी माणसं असतात, तशी भयंकर रस घेणारीसुद्धा असतात. 1963 साली एक दशलक्ष माणसं केवळ काम पाहायला आली. बांधकाम करणाऱया कंपनीला त्यासाठी तीस फुटांचा टॉवर उभारावा लागला. 1964 साली प्रत्येक मोठय़ा लोखंडी स्लॅबच्या वेळी तिथल्या स्थानिक रेडिओने कॉमेंट्रीची सोय केली. तिथल्या स्थानिक वर्तमानपत्राच्या फोटोग्राफरने (आर्ट विटमन). लिहून ठेवलंय की, त्याच्या आयुष्यातलं सर्वात मोठं काम होतं, त्या आर्चच्या बांधकामाचे फोटो काढणं. काही वेळा कामगारांबरोबर तो वर 190 फूट चढून गेलाय. या छायाचित्रकाराचे फोटो आता स्टेट हिस्टॉरिकल सोसायटीमध्ये ठेवले आहेत.
630 फुटांची आर्च (कमान) म्हणजे जवळपास 62 मजल्यांची इमारत. ज्या मॅकडोनाल्ड कंस्ट्रक्शन कंपनीने ती आर्च बांधली. तो म्हणतो, ‘‘62 मजल्यांची इमारत बांधणं सोपं आहे. ती सरळ वर जाते. आर्चच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी वाकडं वळण येतं. दोन कार्बन स्टीलच्या भिंतीत आरसीसीचं बांधकाम आहे आणि शेवटी त्यावर स्टेनलेस स्टीलचे कपडे घातलेले आहेत. लांबून पाहिल्यावर पांढरंशुभ्र इंद्रधनुष्य पाहतोय असं वाटतं.
बांधकामादरम्यान सर्व आलबेल होतं असं नाही. बांधकामात काळय़ा आफ्रिकन अमेरिकन्सना वाव दिला गेला नाही म्हणून वर्णभेदाचे आरोप केले गेले. अपेक्षेप्रमाणे पाच हजार नोकऱया उपलब्ध झाल्या नाहीत म्हणून ही टीका झाली, पण आर्च उभी राहते म्हणून तिथे तीस मजली हॉटेल उभं राहिलं. अनेक ऑफिसांचे टॉवर्स उभे राहिले. पन्नास हजार प्रेक्षकांच्या क्षमतेचे स्टेडियम उभं ठाकलं. एक ऐतिहासिक मॉन्युमेंट काय करू शकतं ते पहा. 1960च्या दशकात तिथं पन्नास कोटी डॉलर्सची कामं उभी राहिली.
आता रात्री त्याला प्रेक्षणीय लायटिंगही आहे. या आर्यमधून वर जाता येतं. त्यासाठी लिफ्ट आणि ट्रमही आहे. वर 65 फूट बाय 7 फुटांचा ऑब्झरर्व्हेशन डेक आहे. जवळपास 160 माणसं तिथे जाऊ शकतात आणि 30 मैल दूरवरचं दिसू शकतं. ट्रमने वर जायला चार मिनिटे लागतात आणि उतरायला तीन! तुम्ही फिट असाल तर 1076 पायऱया चढून वर जा. तिथे अपघातही झालेले आहेत. 21 जुलै 2007 रोजी फ्यूज गेल्याने 200 माणसं आर्चमध्ये अडकली होती. तीन तासांनी त्यांची सुटका झाली. सुदैवाने फक्त एका माणसाला प्राणवायूची गरज भासली.
अमेरिकेत असं काही उभं राहिलं की, स्टंट करणाऱयांची संख्या वाढते. काहींनी छोटी विमानं आर्चमधून नेली. काहींनी आर्चवरून पॅराशूटने उडय़ा मारल्या. एकजण पॅराशूटने आर्चवर उतरला, पण तो उतारावरून घसरत गेला आणि शेवटी त्याने मृत्यूला मिठी मारली आणि हे त्याच्या बायकोने उघडय़ा डोळय़ाने पाहिलं. काही आपल्या सवयी त्यांच्याकडेही होत्या. काहींनी त्या स्टीलवर आपली नावं कोरली. आता या गोष्टींना बंदी आहे. तरीही काही गांधीवादी माणसं ‘कायदेभंग’ करतात.
तुम्हाला तसं काही करायची गरज नाही, जा मस्तपैकी खाली म्युझियम पहा. वर जा, मस्त वरून दृश्य पहा. फोटो काढा आणि खाली या. एक ऐतिहासिक वास्तू पाहिल्याचं समाधान मिळेल.
माझा जवळचा मित्र श्रीराम देशपांडे त्यावेळी सेंट लुईसला तिथे राहायचा. ‘मेरे पास माँ है’च्या थाटात त्याने मला ‘‘आमच्याकडे आर्च आहे’’ असं सांगितलं होतं.
अभिमान बाळगण्यासारखी ती नक्की आहे.





























































