
>> गणेश आचवल
सध्या कलर्स मराठी वाहिनीवर ‘शेतकरीच नवरा हवा’ ही मालिका सुरू आहे. एक वेगळा विचार देणाऱ्या या मालिकेतील ‘सयाजी’ ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता आहे, प्रदीप घुले. एक प्रॉमिसिंग चेहरा.
प्रदीपचे प्राथमिक शालेय शिक्षण गावात झाले आणि मग तो मुंबईत आला. शिवनेरी हायस्कूल मराठी माध्यमात शालेय शिक्षण झाल्यावर त्याने घाटकोपर येथील झुनझुनवाला कॉलेजला शास्त्र शाखेत प्रवेश घेतला. त्याला अभिनयाची आवड होती, पण या क्षेत्रात नेमके कसे यायचे याची सुरुवातीला त्याला माहिती नव्हती. पदवीनंतर त्याला मुंबई विद्यापीठाच्या नाटय़विषयक अभ्यासक्रमाविषयी कळले. पदवीनंतर मास्टर्सचा हा अभ्यासक्रम होता. त्याने लेखी परीक्षा, ऑडिशन असे टप्पे यशस्वी करून एम. ए. इन थिएटर आर्टस्मध्ये प्रवेश घेतला आणि ते नाटय़ प्रशिक्षण त्याच्या जीवनात एक वेगळे वळण घेऊन आले. तो म्हणतो, ‘‘थिएटर आर्टस् शिकताना मला वाचनाची आवड लागली. विविध संहितांचे वाचन मी करू लागलो. मी अभिनयात करीअर करण्याचे ध्येय पूर्ण करायचेच या जिद्दीने इथे आलो होतो. या प्रशिक्षणामुळे नाटकाकडे आणि अभिनय क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.’’ हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रदीपचे विविध ठिकाणी ऑडिशन देणे सुरू झाले. मग ‘लाल बत्ती’ नावाच्या चित्रपटात त्याने भूमिका केली. ‘क्राईम पेट्रोल’च्या काही भागांतदेखील पीएसआयची व्यक्तिरेखा साकारली. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतसुद्धा त्याने भूमिका केली.
‘शेतकरीच नवरा हवा’ या मालिकेत ‘सयाजी’ची भूमिका त्याला आणखी एक समाधान देणारी ठरली. तो म्हणतो, ‘‘हा सयाजी उच्चशिक्षित आहे, पण त्याची नाळ मातीशी जोडलेली आहे. त्यामुळे गावात शेती करणे, शेतकऱयांनी प्रगतिशील राहणे या गोष्टींना तो महत्त्व देणारा आहे. या मालिकेच्या निमित्ताने शेतकऱयांचे प्रश्न समोर येत आहेत. शहरात काय, गावात राहणाऱया मुलीदेखील शेतकरी मुलाशी लग्न करण्यास तयार होत नाहीत. मुलींना शहरातील नवरा हवा असतो. शेतकरीसुद्धा आपल्या मुलीचे लग्न शेतकऱ्यांच्या मुलाबरोबर ठरवायला तयार होत नाही, अशा गोष्टींवर या मालिकेतून भाष्य केले आहे. ‘शेतकरीच नवरा हवा’ या शीर्षकातून आपल्याला ही गोष्ट लक्षात येईलच. अभिनयाशिवाय त्याला कबड्डीची आवड आहे आणि शाळेत असताना त्याने काही मंडळांतून कबड्डीचे सामने खेळले आहेत. अभिनय क्षेत्रात येताना रीतसर घेतलेल्या नाटय़ प्रशिक्षणाने खूप काही दिले, असे प्रदीप आवर्जून सांगतो.




























































