
>> गौरी इंगळे-निंबाळकर
जन्माने अमेरिकन असल्या तरी त्यांचे अस्खलित व अचूक मराठी हे आपल्याला लाजवते. पन्नासहून अधिक वर्षे वास्तव्यास असणाऱया हिंदुस्थानलाच आपली कर्मभूमी मानून हिंदुस्थानी नागरिकत्व घेतलेल्या, शिक्षण तज्ञ, भाषा अभ्यासक, मराठीवर विशेष प्रेम असणाऱया व तळागाळातील समाजाला मागासलेपणाच्या अंधारातून प्रगतीची वाट दाखवणाऱया डॉ. मॅक्सिन बर्नसन म्हणजे एक लोभस, आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व. मॅक्सिन मावशी अमेरिकेत सरकारी कॉमन स्कूलमध्ये शिकल्या. जिथे सर्व प्रकारची म्हणजेच गरीबापासून श्रीमंतांपर्यंत सर्व मुले एकाच ठिकाणी शिकायची. या शाळेत शिकण्याचा त्यांच्यावर वेगळा प्रभाव पडला व याच शाळेचा अनुभव त्यांना पुढे हिंदुस्थानात शाळा सुरू करताना उपयोगी आला. एमएच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठामध्ये असताना त्यांची भेट मूळच्या हिंदुस्थानी लीला गुर्गुंटा सैगल यांच्याशी झाली. लीलाताई यांचं स्वप्न होतं की, कधीतरी हिंदुस्थानात जाऊन एक शाळा स्थापन करीन. ते कुठेतरी मॅक्सिन मावशींच्या मनात रुजले. पुढे लीलाताईंच्या संदर्भानेच मावशी १९६१ मध्ये हैदराबादच्या विवेकवर्धिनी कॉलेजला इंग्रजी विषय शिकवण्यासाठी प्रथम हिंदुस्थानात आल्या. २ वर्षे हिंदुस्थानात राहिल्यानंतर १९६३ मध्ये मावशींना फेलोशिप मिळाली व त्या पुढील शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी ऑफ पॅनसिल्व्हानियाला गेल्या. या ठिकाणी जे काही खास लोक भेटले त्यामध्ये एक होत्या इरावती कर्वे. त्यांचं एक स्वप्न होतं की, सगळय़ा लोकांना इंग्रजी शिकवावं आणि दुसऱया होत्या Eleanor Zelliot. ज्या त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संशोधन करीत होत्या. त्यांच्या पुस्तकांमधून व त्यांच्याकडून दलितांच्या समस्यांबद्दल बरंच ऐकलं व दलितांना शिक्षणाची गरज का आहे तेदेखील समजलं. पुढे मावशींनी फलटणमधील वेगवेगळय़ा लोकांच्या बोलण्यामध्ये काय फरक होतो आणि तो फरक जातीप्रमाणे आहे की त्यावर आणखी कशाचा परिणाम होतो यावर पीएच.डी केली. या कामासाठी पुन्हा मावशी १९६६ मध्ये हिंदुस्थानात आल्या. थिसिसचे काम करताना सुरुवातीला मावशींचा बराचसा वावर दलित वस्तीमध्ये झाला. तिथे वावरताना या लोकांचं जीवन, त्यांच्या समस्या, शैक्षणिक मागासलेपणा हे सर्व जवळून पाहिलं. शाळाबाह्य मुलांची संख्या जास्त आहे हे प्रकर्षाने जाणवलं. हे सारे काम करत असताना लोकांच्यात मिसळत असताना मावशी हळूहळू फलटणमधेच रमल्या. त्यांनी १९७२ ला इथेच स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. १९७८ मध्ये त्यांना हिंदुस्थानी नागरिकत्व मिळाले.
सुरुवातीला मावशी मुलांना आपल्या घरी शिकवायच्या, पण नंतर असे लक्षात आले की, मुलांना आपल्याकडे बोलावण्यापेक्षा आपण मुलांकडे जाणे जास्त चांगले. मग मंगळवारपेठमध्ये गेल्यावर आक्का शेख नावाच्या एक बाई म्हणाल्या, “मी खाट देते तुम्हाला बसायला, मुलं खाली बसून शिकतील.’’ अशा प्रकारे मावशींनी शिकवायला सुरुवात झाली. शैक्षणिक कामाबरोबरच मावशी लोकांच्या वैयक्तिक अडचणीदेखील सोडवत होत्या. गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशनमध्येदेखील जायला त्यांनी कधी मागेपुढे पहिले नाही. वस्तीतील लोकांसाठी अनेक वर्षे त्यांनी आरोग्य दूत म्हणून कामे केली. कालांतराने नगरपालिकेने धर्मशाळेची एक खोली वर्ग म्हणून वापरायला दिली व लोकांच्या सहकार्याने मंगळवार पेठ येथे ‘आपली शाळा’ सुरू झाली. सुरुवातीला या शाळेमध्ये पूरक वर्ग घेतले जायचे. भाषा शिक्षण, उच्चार शास्त्र, प्रगत वाचन पद्धती यावरदेखील काम सुरू झाले. १९८४ मध्ये प्रगत शिक्षण संस्था स्थापन केली. काही दिवसांनी विचारांती आधी फक्त बालवाडी सुरू केली व हळूहळू त्याचे रूपांतर हे एसएससीपर्यंत जाण्यात झाले. ही शाळा म्हणजेच महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळा म्हणून ओळखली जाणारी कमला निंबकर बालभवन. ही शाळा सुरू करताना मावशींनी काही तत्त्वे ठरवली. शाळा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष व आनंददायी असावी, शिक्षक व मुले एखाद्या कुटुंबासारखी असावीत व अशी शाळा की, जिथे समाजाच्या सर्व स्तरांतील मुले एकत्र शिकतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळा मराठी माध्यमाची असेल.
समाजाच्या सर्व स्तरांत अगदी सहजतेने वावरणाऱया मावशी खूप काही शिकवतात. व्यक्ती लहान असो वा मोठी, गरीब असो वा श्रीमंत, मोठा अधिकारी असो वा सामान्य माणूस, मावशींनी कधीच कोणामध्ये भेदभाव केला नाही. नेहमी सर्वांशी आपुलकीचे संबंध जोडले आहेत. त्यामुळेच त्या समाजाच्या सर्व स्तरांत लोकप्रिय आहेत. मी कोणीतरी वेगळी, हुशार, गौरवर्णीय असा आविर्भाव त्यांच्यात कधीच पाहायला मिळणार नाही. वयाची ८० वर्षे उलटूनही सतत नवीन शिकण्याची त्यांची उैर्मी व काम करण्याची क्षमता थक्क करणारी आहे. मलाच लोकांकडून, मुलांकडून शिकायला मिळतं असं त्या अतिशय मनापासून सांगतात.




























































