संगीत रंगभूमीचे अध्वर्यू

>> गिरिजा रा. काटदरे

मराठी संगीत रंगभूमीचे अध्वर्यू भालचंद्र पेंढारकर यांचे जन्मशताब्दी वर्ष 25 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने अण्णा ऊर्फ भालचंद्र पेंढारकर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा लेख…

अण्णा, म्हणजे नाटय़तपस्वी भालचंद्र पेंढारकर! ‘ललितकलादर्श’चे अण्णा, रंगमंचावर नावीन्यपूर्ण प्रयोग करत राहणारे व ते प्रयोग रंगभूमीवर करण्यापूर्वी घरात करून पाहणारे अण्णा, रंगभूमीवर नायकाचं पात्र रंगवणारे अण्णा, सहकलाकारांच्या अडीअडचणीला धावून जाणारे अण्णा, रंगमंचावरील कलाकारांइतकेच रंगमंचामागील रंगकर्मींसाठी झटणारे अण्णा, मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घराचेच थिएटर तयार करून चित्रपट दाखवणारे अण्णा, मुलांसाठी आणलेला मेपॅनो नीट उघडून पाहणारे व त्याच्या सूचना वाचण्यासाठी जर्मन भाषा शिकणारे तंत्रज्ञ अण्णा, नातवंडांसोबत बसल्यानंतर स्वतःचं वय विसरून त्यांच्यात खेळणारे, बागडणारे अण्णा, ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणारे’ अण्णा…

मी भाग्यवान आहे. भालचंद्र आणि मालती पेंढारकर या दांपत्याची मी मोठी मुलगी. अण्णा हे फक्त माझे किंवा माझा भाऊ ज्ञानेशचे अण्णा नव्हेत. अण्णांच्या पुटुंबात फक्त पत्नी, मुलांचा समावेश नव्हता तर आमचे सर्व नातेवाईक, नाटकाशी संबंधित रंगकर्मी, साहित्य संघ हे सारे त्यात होते. अण्णा 1942 मध्ये रसिकराज बाबूराव देसाई यांच्या निमंत्रणावरून मुंबईत आले आणि 1961 पर्यंत ते त्यांच्याच घरी राहिले. तिथंच ते लहानाचे मोठे झाले. तिथं असतानाच अण्णांचं लग्न झालं. माझा व ज्ञानेशचा जन्मही बाबूरावांच्याच घरी झाला. आमचं पुटुंब जसं वाढायला लागलं, तसं अण्णांनी स्वतःचं घर घ्यायचा निर्णय घेतला आणि आम्ही 1961 च्या दरम्यान भाटिया इस्पितळाजवळ पर्ह्जेट हिल येथील नवयुगनगरमधील नऊ माळ्यांच्या उंच इमारतीत राहायला आलो! आमचं घर होतं आठव्या मजल्यावर. पुण्यातल्या शेणाने सारवलेल्या मातीच्या जमिनीच्या घरामधून थेट आठव्या मजल्यावर आणि तेही मुंबईत! आम्ही हरखून गेलो होतो. मी सात-आठ वर्षांची असेन. मुंबईत स्वतःचं घर असण्याचा व ते मनाप्रमाणं सजवण्याचा आईचा आनंद मला आजही आठवतो आहे. त्या इमारतीत आम्ही राहण्यासाठी आलो, तो दिवसही मला नीट आठवतो आहे व याचं कारण मोठं गमतीदार आहे. नवी इमारत, अजून लिफ्टचं तंत्र घोटलं गेलं नव्हतं. त्या दिवशी लिफ्ट बंद पडली आणि आम्हाला पहिल्याच दिवशी आठ मजले चढून आमच्या घरात जायला लागलं होतं. नंतरही ही लिफ्टदेवी अधूनमधून रुसायची आणि मग आम्हाला सारे मजले चढून वर जावं लागायचं. जेव्हा जेव्हा लिफ्टला मोठी रांग असे तेव्हा तेव्हा अण्णा रांगेत न थांबता सरळ जिन्याने आठ मजले चढून वर जात असत. ज्ञानेश व मी आम्ही लहान होतो, आम्हीही त्यांच्या पाठून जायचो, पण तुरुतुरु जिना चढणारे अण्णा आमच्या उत्साहाच्याही पुढे असायचे, आमच्या आधीच ते पोहोचायचे. अण्णांनी नकळत एक मोठा संस्कार दिला- थांबायचं नाही, प्रयत्न करत राहायचं, शक्ती असेतोपर्यंत चालत जायचं!

अण्णा हे रुढार्थानं वडील म्हणून कधी वागलेच नाहीत. मी किंवा ज्ञानेश कोणत्या शाळेत शिकतोय, कोणत्या यत्तेत आहोत याची त्यांना फारशी फिकीर नसायची, पण आम्ही आमच्या उपजत कलागुणांना वाव दिला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असे, नव्हे त्यासाठी ते प्रोत्साहनच देत. माझ्या वाढदिवसाला एक रुमाल आणि ‘पात्रा’ सेंटची बाटली ते न चुकता देत असत. माझ्या एका वाढदिवसाला अण्णा घरात शिरले ते दोन हातात दोन मोठे खोके घेऊन. एका खोक्यात प्रोजेक्टर होता तर दुसरा खोका होता फिल्मच्या रिळांचा. सोबत गोंडा नावाचा एक सहकारी होता. अण्णा म्हणाले, “चला आज चित्रपट बघायचा.’’ आम्ही भराभरा जेवणं आटोपली, ते मात्र जेवले नाहीत. ते प्रोजेक्टर जोडणे, त्याच्या वायर्स जुळवणे आदी कामांत मग्न राहिले. मग त्यांनी बिल्डिंगमधल्या आमच्या मित्र-मैत्रिणींना बोलावलं आणि किशोरपुमार यांचा ‘चलती का नाम गाडी’ हा सिनेमा लावला. त्यानंतर आमच्या घरी, नव्हे बिल्डिंगमध्ये एक पद्धतच रूढ झाली- ज्ञानेशच्या व माझ्या वाढदिवसाला आमच्या घरी एक चित्रपट पाहायचा.

अण्णा एक दिवस स्पूलचा रेका@र्डर घेऊन आले. मग त्यावर माझी, ज्ञानेशची, आशा मावशीची गाणी रेका@र्ड करून ठेवण्याचा नवा उपक्रम सुरू झाला. त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट झाली ती म्हणजे आमच्या आवाजातल्या त्रुटी आम्हाला कळल्या व त्या सुधारता आल्या. आम्ही हिंदी चित्रपटातली गाणी रेका@र्ड करून ठेवायचो. संगीत रंगभूमीच्या उपासक असणाऱया अण्णांना त्यावर कोणताही आक्षेप नसायचा. संगीत हे संगीत असतं, हे ते जाणून होते. अण्णाही वेगवेगळे ट्रक एकत्र करून त्यावर मिक्सिंग, एडिटिंग वगैरे करत असत. याचा उपयोग त्यांना नंतर तीनशे-साडेतीनशे नाटकांचं ऑडिओ रेका@ार्ंडग करून संग्रह करण्यासाठी झाला होता. आज तो संग्रह साहित्य संघाकडे आहे. माझ्या मनात खंत आहे की, या रेका@ार्ंडग्जचा अभ्यासासाठी किंवा ऐकण्यासाठी कोणीही फारसा उपयोग केलेला नाही.

‘मी नाटकवाला आहे’, ‘मी ग्लॅमर जगतातला आहे’ ही प्रौढी अण्णांनी कधी मिरवली नाही. ते घरी आल्यानंतर कधीही म्हणाले नाहीत की ‘मी आता दमलोय’, ‘पंटाळलोय’, ‘दंगामस्ती करू नका’ वगैरे. आमचं घर सदैव माणसांनी बहरलेलं असायचं. आपल्या लोकांत अण्णा बसले की खूश असायचे. काही वेळा असं जाणवायचं की ते देहानं आपल्यात बसलेले आहेत, पण त्यांच्या मनाच्या रंगभूमीवर नाटक सुरू आहे. रंगभूमी हा त्यांचा श्वास होता.

आजही आम्ही आमच्या परीनं संगीत रंगभूमीची जमेल तशी सेवा करत आहोत. ‘ललितकलादर्श’चं नाव टिकवून ठेवण्याची धडपड सुरू आहे. 25 नोव्हेंबर 2020 पासून अण्णांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतं आहे. यानिमित्ताने संगीत रंगभूमीकडे नव्याने बघण्याची एक संधी आपल्या सर्वांना लाभते आहे. तिचा लाभ उठवून रंगभूमीच्या सर्व घटकांनी, शासनानं, रसिकांनी या परंपरेला नवं बळ देण्याचा प्रयत्न करावा, असं कळकळीचं आवाहन करावं असं मला वाटतं. अण्णा आज देहानं आपल्यात नाहीत, पण मी जेव्हा पुठल्याही नाटय़गृहाजवळून जाते तेव्हा मला अण्णांची झुळूक जाणवते. एखादं नाटक पाहायला बसते तेव्हा रंगमंदिरातील खुर्च्यांच्या हातांमधून अण्णांच्या आशीर्वादाचा उबदार स्पर्श पाझरतो आणि रंगमंचावरील मखमली पडद्याकडे नजर जाते तेव्हा अण्णांच्या स्नेहशील नजरेची पाखर माझ्यावर पसरली आहे असंच वाटत राहतं.

विलक्षण निष्ठा
केशवराव भोसले, बापूराव पेंढारकर, वझेबुवा अशा परंपरेचे ते पाईक होते. ही पृतज्ञ जाणीव अण्णा कधीही विसरले नाहीत. अण्णांच्या खूप लहान वयात बापूरावांचं, म्हणजे माझ्या आजोबांचं निधन झालं. अण्णा हे बापूरावांचे वारसदार आहेत हे लक्षात असलेल्या माझ्या आजीनं त्यांना बापूरावांचं निधन झालं त्याच दिवशी सायंकाळी ग्वाल्हेरला शिंदे सरकारांकडे हिराबाई बडोदेकर यांचं गाणं होतं, तिथं ते ऐकायला पाठवलं. संगीतावरची आणि नाटकावरची अण्णांची जी अविचल निष्ठा होती ती निष्ठा हे त्या संध्याकाळचं फलित आहे. नाटक त्यांच्या अंगात इतपं भिनलं होतं की, त्यांच्यावर उत्तरायुष्यात हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर शुद्धीवर येताना त्यांनी ज्ञानेशला विचारलं, “माझा आवाज ऐपू येतोय ना नीट?’’ तो ‘हो’ म्हणाल्यावर अण्णा म्हणाले, “चला, म्हणजे मी रंगमंचावर गाऊ शकेन!’’ केवढी विलक्षण निष्ठा होती नाटकावर अण्णांची!

आपली प्रतिक्रिया द्या