विजेचा बिघाड : कारवाई करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गुरुनाथ वसंत मराठे

मुंबई-ठाण्यात द्दोन दिवसांपूर्वी वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने गोंधळ उडाला होता. पडघा, कळवा येथील विद्युत केंद्रात अचानक बिघाड झाल्याने सोमवारी सकाळी 10 वाजता अचानक ठाणे, मुलुंड, नवी मुंबई तसेच इतर अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे मुंबई हतबल झाली. अन्न, वस्त्र, निवारा या जशा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. तसेच वीज प्रवाह हीदेखील माणसाची मूलभूत गरज आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकल सेवा ठप्प झाल्या. कार्यालयात जाणाऱया कर्मचाऱयांचे अतोनात हाल झाले. अनेक कार्यालयांचे कामकाज बंद झाले. घरातील गृहिणींची तारांबळ उडाली. याचा फटका रुग्णालयांनादेखील बसला. आता या सर्व गोंधळाचे खापर टाटा पॉवरवर फोडण्यात येत असल्याचे समजते. पण ते चुकीचे आहे. कारण मुंबई शहर आणि उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड, बेस्ट टाटा पॉवर व काही भागात महावितरणकडून विद्युत पुरवठा होतो. यापैकी टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी आपापल्या वीज निर्मिती प्रकल्पातून वीज खरेदी करतात. तर बेस्ट कंपनी टाटांकडून वीज खरेदी करते. त्यामुळे याला कोणी एक कंपनी जबाबदार कशी? थोडक्यात या बत्ती गुलमुळे मुंबईकरांची परिस्थिती एक हात लुळा, पांगळा झाल्यासारखी झाली. हे सर्व घडण्यामागे कारण काय तर म्हणे हा बिघाड शनिवारपासूनच सुरू होता. त्यानंतर एकेक कंडक्टर बंद पडत गेले आणि त्यानंतर मुंबईकरांवर ही आफत ओढवली, परंतु हा बिघाड जर शनिवारपासूनच सुरू होता तर त्याची योग्य वेळी दखल का घेतली गेली नाही? हा प्रश्न उरतोच. अनेक वर्षे वीज कंपन्यांमध्ये काम करणाऱया तांत्रिक अधिकाऱयांना याची जाणीव नसावी? मग वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले गेले. परंतु ‘कठीण समय येता कोण कामास येतो’ या उक्तीनुसार अदानीचा डहाणू येथील वीज प्रकल्प मदतीसाठी धावून आला. या प्रकल्पातील वीजपुरवठा वाढल्याने वीजप्रवाह तुलनेने लवकर सुरळीत होण्यास मदत झाली. हा वीजपुरवठा का आणि कोणत्या कारणांमुळे खंडित झाला होता त्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याप्रकरणी दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायला हवी. त्यांच्यावर कडक कारवाई करायला हवी. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, शनिवारपासून सुरू असलेला बिघाड वेळीच दुरुस्त करायला पाहिजे होता. वेळीच मारलेला एक धागा पुढचे नऊ धागे वाचवतो असे म्हणतात तेच खरे.