
>>गुरुनाथ तेंडुलकर
कौरव-पांडवांमध्ये घडलेलं महाभारत युद्ध तब्बल अठरा दिवस चाललं. पहिल्या दिवशी दोन्ही बाजूंच्या सैन्यातून शंख फुंकून सुरुवात झालेल्या युद्धाचा शेवट अठराव्या दिवशी दुर्योधनाच्या मृत्युने झाला. नाव धर्मयुद्धाचं असलं तरी दोन्ही बाजूच्या सैन्याने अनेक वेळा धर्मयुद्धाचे नियम पायदळी तुडवले होते. अभिमन्यूला पाव्यूहामध्ये एकाकी गाठून मारण्यापासून ते निशस्त्र कर्णावर बाण चालवण्यापर्यंत. ‘नरो वा कुंजरो वा’ असं धर्मराजाच्या तोंडून वदवून घेण्यापासून ते शिखंडीच्या आड उभा राहून भीष्माचार्यांवर शरसंधान करण्यापर्यंत.
दुर्योधनाला मारताना तर भीमाने गदायुद्धाचे सगळे नियम मोडून दुर्योधनाच्या कमरेखाली गदाप्रहार केले. दुर्योधनाचं कमरेवरचं शरीर जिवंत आणि कमरेखालचं शरीर मात्र मृतावस्थेत अशा विदीर्ण अवस्थेत त्याला रानात एकट्याला सोडून पांडव निघून गेले त्या वेळी सूर्य अस्ताला टेकला होता. वेदनेने विव्हळणाऱया दुर्योधनाच्या मांसाचे तुकडे खायला रानातले कोल्हे, कुत्रे आणि इतर श्वापदं गोळा झाली होती. अधुंकशा संधीप्रकाशात आपल्या डोळ्यांसमोर अशा प्रकारचा मृत्यू पाहूनदेखील दुर्योधनाच्या मनात कोणत्याही प्रकारच्या पश्चात्तापाची किंवा अपराधीपणाची भावना मात्र निर्माण झाली नव्हती. अश्वत्थामा हातात पेटलेली मशाल घेत रात्री त्याचा शोध घेत घेत तिथे पोहोचला. त्या वेळी दुर्योधनाने त्याला क्षीण स्वरात, पण त्वेषाच्या शब्दांत स्पष्ट आदेश दिले, “मित्रा, माझ्या मृत्यूचा सूड घे.”
त्याच रात्री अश्वत्थाम्याने द्रौपदीच्या सर्व मुलांना गाढ झोपेतच गळा चिरून ठार मारले. पुढे त्याचा सूड म्हणून द्रौपदीने अश्वत्थाम्याच्या कपाळावरचा मणी कापून काढला आणि त्याला त्या जखमेतून कधीही न भरून निघणारी भळभळती चिरंजीव वेदना दिली. महाभारताचा डोळस अभ्यास केला तर ‘धर्म विरुद्ध अधर्मा’च्या या युद्धात कोण चूक आणि कोण बरोबर हे ठरवणं कठीण जातं.
कोण चूक आणि कोण बरोबर? अनेक वर्षे महाभारताचा अभ्यास करणाऱया विद्वानांनादेखील हे ठरवता येत नाही, पण एक मात्र खरं की, त्या युद्धात बळी गेला तो सामान्य योद्ध्यांचा. भगवान श्रीकृष्णाने आपलं सैन्य कौरवांच्या बाजूने लढवलं. ती त्या युगंधराची रणनीती-राजनीती होती, पण अखेर त्याच्या सैन्याचा मात्र बळी गेलाच ना? पांडवांच्या वाट्याला आलं ते असलं भीषण रक्तरंजित, आणि अतीव वेदनेनं भरलेलं हस्तिनापूरचं राज्य.
कोण जिंकलं? कोण हरलं? नेमकं काहीच सांगता येत नाही. म्हणूनच पुढे हजारो वर्षांनंतर महाभारतातील भीष्मपर्वातील तेवीस ते चाळीस हे अठरा अध्याय जे भगवद्गीता या नावाने प्रसिद्ध आहेत त्या भगवद्गीतेवर भाष्य करताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची सांगता पसायदान मागून केली. माऊलींनी मागितलं…
खळांची व्यंकटी सांडो,
तयां सत्कर्मी रति वाढो
भूतां परस्परे जडो
मैत्र जीवांचे
हे परमेश्वरा, यापुढे कोणत्याही प्रकारचे युद्ध नको. सर्व जग केवळ प्रेमाने भरून जाऊ दे. साऱया भूतमात्रांमधे मैत्रभावना निर्माण होऊ दे. कापोधादी षड्fिरपू माणसाच्या मनातून नाहीसे होऊन समाजातील खलपुरुषांची कुबुद्धीच नष्ट होऊ दे.
या सहा रिपूंमुळे जगातील शांतता नाहीशी झाली आहे. आज पृथ्वीवरच्या सगळ्या देशांचा राजकीय अभ्यास केला तर आढळेल की, गेल्या पाच शतकांपासून म्हणजेच पाचशे वर्षांपासून दररोज कुठे ना कुठे तरी युद्ध सुरूच आहे.
अनेकदा ही दोन देशांत सुरू असलेली युद्धे स्वार्थासाठी काही बलाढ्य देश घडवून आणतात. दोन्ही बाजूंना शस्त्रास्त्रs पुरवतात आणि बळी जाणाऱया जनसामान्यांच्या चितेवर स्वतची पोळी भाजून घेतात. अनेकदा ही युद्धे धर्माच्या नावाखाली खेळली आणि खेळवली जातात. ‘धर्मप्रसार’ हा गोंडस शब्द वापरला तरी त्यामागचा खरा हेतू ‘दुसऱयाची भूमी जबरदस्तीने बळकावणं’ हाच असतो. सबांनी आाढमण करून दुर्बलांची लूट करायची आणि त्यांच्या स्त्रियांसह सगळ्या संपत्तीवर स्वतचा हक्क प्रस्थापित करायचा हाच प्रमुख हेतू असतो. आज जगात अनेक ठिकाणी युद्धे सुरूच आहेत. राज्यकर्त्यांना आणि शस्त्रास्त्रांच्या व्यापाऱयांना हवी असलेली ही युद्धे सर्वसामान्य माणसांना मात्र नकोशीच वाटतात. अशाच एका सर्वसामान्य सुजाण व्यक्तीचं मनोगत मांडणारी आजची कविता ‘युद्ध नको’. या कवितेच्या कवयित्री आहेत निशा वर्तक. निशा वर्तक या एक गुणी कवयित्री आहेत. छंदोबद्ध काव्यरचना आणि अत्यंत तरल आशयघनता ही त्यांच्या काव्याची प्रमुख वैशिष्ट्य आहेत. त्या कवितेच्या सुरुवातीलाच म्हणतात…
युद्ध लढाई भांडणतंटे नाव नको ते
रक्त पाहुनी आप्तजनांचे काळीज तुटते
अतिशय सोप्या आणि सुलभ शब्दांत लिहिलेल्या या कवितेचं वेगळं रसग्रहण करण्याची आवश्यकताच नाही. निशाताईंची ही केवळ बारा ओळींत लिहिलेली सरळ शब्दांतील तरल कविता युद्धाच्या दुष्परिणामांबद्दल बरंच काही सांगून जाते.
युद्ध नको
युद्ध लढाई भांडणतंटे नाव नको ते
रक्त पाहुनी आप्तजनांचे काळीज तुटते
युद्धाचे कधी न यावे माझ्या देशा
शांती नांदो सदैव येथे हे जगदीशा
देश धर्म अन् सत्तेसाठी युद्धे घडती
द्वेष मत्सरी स्वार्थी बुद्धी मनुजा नडती
दोन घडीचे जीवन अपुले शांत जगू या
बुद्ध स्मरू या शांतीचा हा मंत्र जपू या
निष्पापांचे हाल अघोरी बघवत नाही
काळ लोटला भय युद्धाचे संपत नाही
कुणी जिंकतो कुणी हारतो माणूस मरतो
युद्धानंतर परिणामाचे भोग भोगतो
– कवयित्री निशा वर्तक
(पूर्वप्रसिद्धी : ‘शैवप्रबोधन’ दिवाळी अंक 2023 )


























































