प्लेलिस्ट – तालबद्ध, लयबद्ध प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> हर्षवर्धन दातार

रेल्वे समावेश असलेल्या चित्रपट गाण्यांचे चित्रण रेल्वे डब्यात, प्रवासात असून त्यांना धावत्या आगगाडीचा ताल आणि ठेका आहे. गाणी ऐकताना आणि बघताना आपण त्या प्रवासाचे भाग आहोत असेच वाटते. आज आपण आढावा घेणार आहोत गाडीची लय नसलेल्या आणि काही प्रसंगनिष्ठ रेल्वेविषयक गाण्यांचा तसेच प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेल्या काही प्रतिष्ठत दृश्य/प्रसंगांचा. गाणी नेहमीसारखीच आहेत, फक्त त्यांची पार्श्वभूमी किंवा सेटिंग रेल्वेगाडीच्या डब्यातले आहे किंवा त्या चित्रपटातली पात्र रेल्वे प्रवासात आहेत…

साठच्या दशकात संगीतकार रवींनी आपला जम बसविला. त्यांच्या ‘दूर की आवाज’मध्ये (1964) ‘एक मुसाफिर को दुनिया में’ हे एक मजेशीर गाणं पडद्यावर जॉनी वॉकरने साकार केले आहे. रफींनी आपल्या खेळकर आवाजात या गाण्याला खूप मजा आणली आहे. गाण्यात धमाल ऊर्जा आहे. 1962मध्ये शम्मी कपूरचा ‘चायना टाऊन’ आला होता. त्यातले ‘बार बार देखो, हजार बार देखो’ हे गाणे गाजले होते. त्याचबरोबर आगगाडीच्या डब्यात साधूच्या वेशात शम्मी भजनाच्या स्वरूपात रफीच्या आवाजात शकिलासाठी प्रेमगीत म्हणतो,‘देखो जी बाला जोगी मतवाला.’ गंमत म्हणजे डब्यातली रुळाला समांतर आसनव्यवस्था खरोखरच तशी होती का, हे जुने जाणकार प्रवासीच सांगू शकतील. 1960च्या ‘कल्पना’मध्ये तर रेल्वेच्या डब्यात चक्क नाचाच्या माध्यमातून अशोक कुमार आणि रागिणीची ‘हमको समझ न लिजिए’ जुगलबंदी आहे. 1954च्या ‘जागृती’मधलं कवी प्रदीपनी लिहिलेले आणि स्वतः गायलेले ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदुस्थान की’ हे त्या काळातील सर्वात लोकप्रिय गाणं. गाण्याला मार्ंचग बीट आणि देशप्रेमाचा रंग आहे. सहलीला जात असताना शिक्षक या गाण्याच्या शब्दांतून आपल्या विद्यार्थांना हिंदुस्थानच्या इतिहासाचे दर्शन घडवतात.

आगगाडीची लय नसलेल्या गाण्यांमध्ये त्या काळातले बहुधा सर्वात लोकप्रिय गाणे म्हणजे मखमली आवाजाचे तलत मेहमूद आणि लताबाईंनी गायलेले ‘सुबह का तारा’ (1956) चित्रपटातले सी. रामचंद्र यांनीं संगीतबद्ध केलेले ‘गया अंधेरा हुआ उजाला.’ पडद्यावर आहेत प्रदीप कुमार आणि जयश्री टी. आणि चित्रण स्टुडिओत डब्याच्या सेटवर. एक कमी प्रचलित दुःखाची किनार असलेले 1949च्या ‘बाजार’मधील जुन्या धाटणीचे संगीत असलेले रफी व लताबाईंचे ‘अपनी नजर से दूर’. पुढील गाणे अतिशय वेगळे असून संगीतात साठच्या दशकातला आधुनिक बदल जाणवतो. ‘जब याद किसीकी आती है’मध्ये (1967) धर्मेंद्र व माला सिन्हा एकमेकांना साद घालत आहेत. ‘ढूंढें तुझ को नैन दीवाने’ संगीतकार मदनमोहननी त्यांच्या विशिष्ट धाटणीचे वाद्यवृदांचा मेळ असलेले संगीत दिले आहे. खूपच मनमोहक गीत आहे. ‘नया जमाना’मध्ये (1957) ‘आज इस नगरी कल उस नगरी’ हे जवळ जवळ मराठी लावणीबाजाचं गाणं आहे. निघून जात असलेल्या प्रदीप कुमारकडे माला सिन्हा व्याकूळ, चिंताक्रांत नजरेने पाहत आहे. शब्दांचा आशयही जणू सर्व हातातून निसटून जात आहे असाच आहे. आणखी एका अलौकिक गाण्याबद्दल नेहमी चर्चा होते ते म्हणजे ‘आपकी कसम’च्या (1974) ‘जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम.’ राजेश खन्ना, आनंद बक्षी, राहुल देव बर्मन, किशोर कुमार या चौकडीने पुन्हा एकदा कमाल केली आहे. पंचमदांचे संगीत आणि किशोर कुमारची गायकी नेहमीप्रमाणे गाण्याला एका वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवते.

रेल्वेमध्ये आपला उदरनिर्वाह करणारे भिकारी किंवा साधू यांच्या तोंडी प्रसंगोचित गाणी हा चित्रपट निर्मात्यांचा ठरलेला साचा, ज्यातून अनेक गाणी आपण बघतो. बहुतेक गाणी दुःखाची किनार असलेली व तत्त्वज्ञान सांगणारी अथवा प्रेरणादायी असतात. शिवाय त्यातून नायक-नायिकेला पुढील कथेच्या अनुषंगाने संदेश द्यायचा असतो. ‘मिस इंडिया’मध्ये (1957) एक अंध भिकारी आणि दोन मुलांवर चित्रीत ‘ठोकर नसीब की’ हे शब्द संगीताचा सुंदर मेळ असलेले गीत आहे. गाण्याचा आशय सकारात्मक आहे. अशाच आशयाचं एक गाणं आहे ‘उंंचे लोग’मध्ये (1965). हा चित्रपट गाजला होता. ‘दुनिया’ चित्रपटातील ‘दूरियां नजदिकीयां बन गईं’ आणि ‘फलसफा प्यार का’ ही गाणी खूप लोकप्रिय झाली. ‘किताब’ (1977) हा मास्टर राजूच्या भूमिकेवर केंद्रित गुलजार यांचा चित्रपट. त्यात श्रीराम लागूवर चित्रित ‘मेरे साथ चले ना साया’ हे सुंदर आशय आणि अभिव्यक्ती असलेले राहुल देव बर्मननी बंगाली ‘बाऊल’ चालीवर बसवलेले व त्यांचेच सहकारी सपन चक्रवर्ती यांनी गायलेले गाणे. नायक चुकून महिलांच्या डब्यात येतो आणि बिकट प्रसंग निभावून नेण्याकरिता गाणं म्हणतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘खजाना’मध्ये (1987) रफींनी दमदार आवाजात गायलेले ‘हम भी मुसाफिर तुम भी मुसाफिर.’
नायक-नायिकांमधली छेडछाड हा चित्रपटातील नेहमीचा प्रसंग आणि त्याला रेल्वेची पार्श्वभूमी मिळाली आहे. ‘सोलवा साल’ (1958) यातलं मजरूह-सचिन देव बर्मन आणि हेमंत कुमार या त्रयींचे देव आनंद-वहिदा जोडीवर चित्रीत ‘है अपना दिल तो आवारा’ हे अतिशय गाजलेले गाणे. यात पंचमदांनी हार्मोनिका वाजवलाय तो देव आनंदचा मित्र चरित्र ‘द बार्ंनग ट्रेन’मध्ये (1980) ‘तेरी है जमीन तेरा आसमां’ ही सिमी गरेवाल आणि लहान मुलांवर चित्रीत प्रार्थना आपल्याला वेगळय़ा भक्तीच्या भावविश्वात नेते.

शेवटी एक ओझरता दृष्टिक्षेप रेल्वे प्रवासात घडलेल्या आणि नेहमीकरिता लक्षात राहिलेल्या प्रसंगावर. ‘मै चूप रहुंगी’मध्ये (1962) मीना कुमारी आणि सुनील दत्तदरम्यान त्यांच्या पहिल्या भेटीचा एक अतिशय हृद्य प्रसंग आहे. तिसऱया वर्गाचे तिकीट असून गाडी सुटल्यामुळे घाईत मीना कुमारी पहिला वर्गात चढते आणि उभयतांमध्ये हलका फुलका संवाद होतो. ‘पाकिजा’मधील (1972) राज कुमार व मीना कुमारीची पहिली भेट रेल्वेच्या डब्यात होते आणि तो प्रसंग अजरामर झाला. ‘आपके पाव देखे, बहोत हसीं हैं, इन्हें जमीं पे मत उतारिएगा, मैले हो जाएंगे’ या संवादामुळे. ‘शोले’ (1975) हा सर्वार्थांने कालातीत चित्रपट. भुरटे चोर धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांची पोलीस इन्स्पेक्टर संजीव कुमारशी पहिली भेट मालगाडीत होते. द्वारका दिवेचांचे जबरदस्त छायाचित्रण आणि पंचमदांचे संगीत यामुळे दरोडेखोरांशी झालेल्या चकमकीचा हा प्रसंग अतिशय थरारक झाला आहे. ‘द बार्ंनग ट्रेन’ (1980) या संपूर्ण ‘रेल्वे’ चित्रपटाचा शेवटही अतिशय थरारक आहे. ब्रेक निकामी झालेली आणि ड्रायव्हरविना सुसाट वेगाने धावणारी ‘सुपर एक्स्प्रेस’ रोखण्याकरिता केलेले प्रयत्न या क्लायमॅक्समध्ये आपल्याला बघायला मिळतात. ‘गांधी’ (1982) या ‘जागतिक’ चित्रपटात एक प्रसंग आहे, ज्यांनी महात्मा गांधींच्या विचारांना आणि आयुष्याला एक वेगळी कलाटणी दिली तो म्हणजे वर्णभेद मानणाऱया तत्कालीन दक्षिण आफ्रिकेच्या रेल्वेत प्रवास करताना महात्मा गांधींना पहिल्या वर्गाच्या डब्यातून सामानासकट बाहेर काढले. कारण ‘काळय़ा’ गांधींना ‘गोऱया’ आफ्रिकेत ‘दुय्यम’ दर्जा होता. याच चित्रपटात पुढे गांधी रेल्वेतून देशाच्या दौऱयावर असताना त्यांना इथल्या भयानक गरिबीचे विदारक दर्शन घडते, तो प्रसंगही चटका लावणारा आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (1995) यामध्ये तर रेल्वेतील अनेक प्रसंग आहेत. त्यात उल्लेखनीय म्हणजे ‘जा सिमरन जा’ हा हृदयपरिवर्तन झालेल्या अमरीश पुरींनी काजोलला निरोप देतानाचा. असाच एक भावुक प्रसंग ‘कुछ कुछ होता है’मध्ये (1998) आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये (2013) रेल्वे प्रवासादरम्यान उत्तर हिंदुस्थानी शाहरुख आणि दक्षिण हिंदुस्थानी दीपिका या दोघांत एक मजेशीर सांगीतिक संवाद घडतो. या लेखमालेच्या माध्यमातून शक्य तितकी गाणी व प्रसंग हे प्रातिनिधिक स्वरूपात ‘हिंदी चित्रपटातील रेल्वे’ या संयोगावर जमेल तितका प्रकाश टाकण्याकरिता घेतले आहेत.
(लेखक संगीत अभ्यासक आहेत)