
>> ऋता कळमणकर
हत्ती या महाकाय सस्तन प्राण्याचे हिंदुस्थानींशी प्राचीन नाते आहे. पौराणिक कथा, राजेशाही थाटमाट या गोष्टींशी या बुद्धिमान प्राण्याचे नाते जोडले गेले आहे. जगभरात आफ्रिका, हिंदुस्थान आणि काही आजूबाजूचे देश येथे आढळणारा हा शाकाहारी प्राणी. सोंडेसारखा सशक्तअवयव याला लाभला आहे. आपल्या सोंडेने हा कितीतरी कामे करू शकतो. पाणी पिणे, उंचावरील तसेच जमिनीवरील झाडपाला खाणे अशी कामे तो करतो. 400 ते 500 किलोपर्यंत वजन सोंडेने उचलतो. अतिशय बुद्धिमान असा हा प्राणी त्याच्या सोंडेचे उपयोग इतर हत्तीशी संवाद साधण्याकरता करतो. त्याचप्रमाणे उंचावरील फांदी मोडून खाण्यासाठी सोंड वापरतो. हत्तीची घाणेंद्रिये अतिशय तीव्र असतात. हत्ती हा भटकी जमात असून वयोवृद्ध हत्तीणीच्या नेतृत्वाखाली कळप अन्नाच्या शोधात भटकतो. हत्तीचे नर मिलन काळातच माद्यांच्या कळपांमध्ये राहतात. हिंदुस्थानी हत्तींमध्ये फक्त नरालाच मोठमोठे सुळे असतात. मादीला सुळे नसतात. क्वचित एखाद्या नरालादेखील सुळे नसतात. सुळे नसलेल्या नराला ‘माखना’ म्हणतात. उत्तरेकडे जिम कॉर्बेटच्या जंगलामध्ये तसेच दक्षिणेतील कबीनी नागरहोळेच्या हिरव्यागार परिसरात हत्तींचा मुक्त संचार पाहणे यासारखा आनंद नाही.
काळा रंग, लांब सोंड, भलेमोठे खांबासारखे पाय, सुपासारखे कान व अगदी बारीक डोळे यावरून हत्ती ओळखला जातो.
आफ्रिकेत सापडणाऱया हत्तीच्या नराला व मादीला दोघांनाही मोठमोठे सुळे असतात. हिंदुस्थानी हत्तीची पाठ फुगीर असते तर आफ्रिकन हत्तीची पाठ खोलगट असते. हत्तीचे शरीर अवाढव्य असते. त्याचे वजन पाच ते सहा टन असते. हत्ती पाण्यात चांगले पोहतात.
इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना जास्त बुद्धी असते. त्यामुळे हत्तींना शिकवून त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामे करवून घेता येतात. याकरता हत्तीचे छोटे बछडे पकडून त्यांना लहानपणापासूनच शिक्षण द्यावे लागते. जंगलात लाकडे कापायच्या गिरणीत मोठमोठी झाडे कापून लाकडाचे ओंडके बनवतात. शिकवलेले हत्ती हे ओंडके सोंडेत धरून किंवा पायाने ढकलत ढकलत वाहून नेतात. वाहून आणलेले ओंडके ते नदीच्या पाण्यात टाकतात. मग ते ओंडके पाण्याबरोबर नदीच्या एका किनाऱयावरून दुसऱया किनाऱयावर किंवा प्रवाहाबरोबर खाली वाहत जातात. शिकवलेले हत्ती गाडय़ा ओढतात. पूर्वीच्या काळी हत्तींचा उपयोग लढाईसाठीसुद्धा होत असे. हत्तींवर बसून लढाया करत. हत्तीच्या पाठीवर अंबारी बांधून त्यात बसून राजे-महाराजे आणि श्रीमंत लोक प्रवास करत. तसेच अंबारीतून मिरवणुका काढत. हत्तीचा मृत्यू झाल्यावर हत्तीचे दात काढतात. त्यांना ‘हस्तिदंत’ म्हणतात. हस्तिदंतांना खूप मागणी असते. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, दागिने ठेवण्याच्या पेटय़ा, शोभेच्या वस्तू, पेपरवेट, फुलदाण्या, बांगडय़ा, बटने इत्यादी वस्तू हस्तिदंतापासून तयार करतात.
हत्ती जंगलात कळपाने राहतात. एकेका कळपात सात-आठपासून 20-25 पर्यंत हत्ती असतात. कळपात प्रामुख्याने दोन-तीन मोठय़ा माद्या आणि बच्चे असतात. नर कळपात नसतात. कळपात जसे मध्यम वयाचे बच्चे असतात, तसे अगदी लहान बछडेदेखील असतात. कळपाचे नेतृत्व म्हाताऱया अनुभवी मादीकडे असते. तिच्या आज्ञेत सर्व कळप असतो. केव्हा केव्हा तीन-चार नर एकत्र येऊन पंपू करून राहतात. वयात आलेले नर आणि वयात आलेली मादी दोघेही ठराविक मोसमात एकत्र येतात. मदमस्त हत्ती फारच बेभान बनतो. हत्तीच्या डोक्याला गंडस्थळ म्हणतात. मदमस्त हत्तीच्या गंडस्थळातून पातळ रस वाहू लागतो. या रसाला मद म्हणतात. माजावर आलेले हत्ती उगाचच मोठमोठे वृक्ष मुळासकट उपटून फेकून देतात. माजावर आलेल्या हत्तींच्या तावडीत कोणी सापडल्यास त्याची धडगत नसते. मद ओसरल्यावर मात्र तो पूर्वीप्रमाणे शांत बनतो.
बोट्स्वाना येथील चोबे नॅशनल पार्कमध्ये प्रचंड मोठा हत्तींचा कळप पाण्यात आला होता. मनसोक्त पाणी पिऊन झाल्यावर हत्तींनी पाण्यात खेळण्यास सुरुवात केली. त्यात सर्वात जास्त धमाल करत होते ती लहान पिल्ले. चिखलात लोळणे, मधेच पाय घसरून चिखलात पडणे, इतर पिलांना सोंडेने ओढून पाण्यात पडणे असे विविध खेळ ते फार मनापासून खेळत होते. पूर्ण कळप निघाल्यानंतर अगदी नाइलाज झाल्याप्रमाणे ते आईच्या मागे गेले. हे पाहताना आम्ही भान हरपून गेलो होतो.




























































