सुभाषिणी – बुद्धीने जिंकणारं नाटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ऋतुजा फडके

‘मुद्राराक्षस’ या नाटकाची धाटणीच वेगळी आहे. मुद्राराक्षस म्हणजेच ‘मुद्रया जितः राक्षसः यास्मिन् नाटके तत् नाटकम्’, अर्थात मुद्रेने ज्या नाटकात राक्षसाला जिंकून घेतले ते नाटक.

‘बुद्धी’ ज्या नाटकाचा स्थायिभाव आहे, विशाखदत्त ज्या नाटकाचे कवी, रहस्य ज्या नाटकाचे गमक आणि वीर ज्या नाटकाचा रस अशा ‘मुद्राराक्षस’ या नाटकाबद्दल आपण मागच्या लेखात बोलत होतो. ‘मुद्राराक्षस’ या नाटकाची धाटणीच वेगळी आहे. वीररस दर्शविण्यासाठी कुठेही कवीने युद्ध, गदाप्रहार, रणांगण यांचा वापर केलेला नाही. म्हणून हे नाटक विशेष आहे. या नाटकाला नायिका नाही म्हणून हे नाटक विशेष आहे आणि केवळ राज्यप्राप्ती आणि त्यायोगे उद्दिप्त झालेला वीररस म्हणून हे नाटक विशेष आहे. मुद्राराक्षस म्हणजेच ‘मुद्रया जितः राक्षसः यास्मिन् नाटके तत् नाटकम्’, अर्थात मुद्रेने ज्या नाटकात राक्षसाला जिंकून घेतले ते नाटक.

नाटकाचा मुख्य कथाभाग हा की, चंद्रगुप्त मौर्य याचा राजकीय सल्लागार, मंत्री याचा कार्यभाग आता संपलेला आहे आणि आता माझ्यानंतर माझ्या स्वामींची म्हणजेच चंद्रगुप्त मौर्यांची सेवा कोण करणार ? त्यांचे रक्षण कोण करणार ? माझ्या इतका विश्वासू, बुद्धिमान सल्लागार, मित्र, मंत्री हे सगळं कोण होणार ? यासाठी सगळ्यात योग्य कोण, तर नंद कुळाचा मंत्री ‘राक्षस’, पण या राक्षसाला मिळवायचं कसं? राक्षसासारख्या स्वामिनिष्ठ सल्लागाराला चंद्रगुप्ताचा मंत्री बनवायचं कसं? तो तर मौर्यांच्या कुळालाच संपवायला निघाला आहे. हा पेच चाणक्य बुद्धीच्या जोरावर सोडवतो. ‘‘बुद्धिस्तु मा गान्मम’’ असं म्हणत एक-एक साखळी रचत त्यात राक्षसाला अडकवतो आणि ज्या क्षणी राक्षस पूर्णपणे चाणक्याच्या ताब्यात येतो तेव्हा चाणक्य स्वतःच्या हातचा सगळा कारभार राक्षसाच्या हाती सोपवून वानप्रस्थाश्रमाला निघून जातो.

पहिल्या अंकात चाणक्याला कुणीतरी चंद्रग्रहणाची बातमी देतं आणि ‘‘माझ्या चंद्राला म्हणजेच चंद्रगुप्त मौर्याला कोण गिळंकृत करणार आहे? मी असताना कोणाची हिंमत आहे हे करण्याची!’’ या आविर्भावात आपल्या मोकळ्या शेंडीवर हात फिरवत प्रवेश करतो.

‘आस्वादितद्विरदशोणितशोणशोभां
संध्यारुणामिव कलां शशलाञ्छनस्य ।

याच श्लोकापासून पहिल्याच अंकात वीररसाची प्रचीती यायला सुरुवात होते. चाणक्य आता इतिहासात रमतो. त्याने नुकताच नंद कुळाचा नायनाट केलेला असतो. त्यात पर्वतक विषप्राशनाने मारला जातो. त्यामुळे त्याचा पुत्र मलायकेतू, नंद कुळाचा मंत्री राक्षस याच्या सहाय्याने मौर्य कुळाचा विनाश करायला निघालेला असतो आणि इथे चाणक्याला राक्षसाला चंद्रगुप्ताचा मंत्री बनवायचा असतो. नाटक वाचताना ही स्थिती पाहिली की वाटतं, नाटक वास्तव किंवा वर्तमानाची कास सोडतं आहे की काय! पण जसजसं आपण पुढे वाचत जाऊ तसतसं कळायला लागतं की, चाणक्याची प्रत्येक कृती आपल्या बुद्धीला चालना देणारी आहे. आपण काय केल्याने काय घडू शकते याचा अगदी बरोबर अंदाज चाणक्याला आहे. त्याच्या बुद्धीची ताकद पाहून आपण थक्क होतो. सुरुवातीला त्याचा राग निरर्थक वाटतो; पण तिसऱया अंकात त्याने रचलेला ‘कृतककलह’ म्हणजे चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य यांच्यातलं खोटं किंवा मुद्दाम घडवून आणलेलं भांडण पाहिलं, त्याचा पुढे झालेला परिणाम पाहिला की, एखाद्या रहस्याची उकल झाल्याचा आनंद होतो. चाणक्याने राक्षसाच्या ठायी मुद्दाम पाठवलेले हेर कधी कधी आपलीच दिशाभूल करतात; पण विशाखदत्त मात्र ही जबाबदारी समर्थपणे पेलतात.
चित्तवेधक, समयसूचक संवाद हे नाटकाचं मुख्य वैशिष्टय़ आहे. नाटकाची भाषाशैलीसुद्धा नाटकाच्या विषयाला अनुसरून वापरलेली आहे. वाचताना आपण कुठलं तरी बुद्धिप्रावीण्य असलेलं राजकीय नाटक वाचतो आहोत असंच वाटतं. विशाखदत्त या नाटकातून जणू स्वतःची विचारधारा आपल्यासमोर ठेवत आहेत. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. रणांगणावर प्रत्यक्ष युद्ध करून शक्तिप्रदर्शन करण्यापेक्षा बुद्धीने युद्ध खेळा आणि जिंका.

– [email protected]