लेख – हिंदुस्थानविरुद्ध आयएसआयचे सायबर वॉर

946

>> ब्रिगेडीयर हेमंत महाजन

हिंदुस्थानला बदनाम करून त्या देशांशी जुळलेले संबंध बिघडवण्याचे काम पाकिस्तानी आयएसआयच्या वतीने केले जात आहे. त्यासाठी खोट्या आणि बनावट स्टोरीजचा कारखाना उघडण्यात आला असून त्याला कच्चा माल पुरविण्याचे उद्योग हिंदुस्थानातीलच काही लोक करीत आहेत. यासाठी सायबर युद्धाचा वापर केला जात आहे.

पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय हिंदुस्थानात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यात कुप्रसिद्ध आहे. मात्र आता आयएसआयने तिच्या ‘इंटर सर्व्हिसेस पब्लिसिटी रिलेशन डिव्हिजन’च्या माध्यमातून हिंदुस्थानविरुद्ध एक मोठे ‘सायबर युद्ध’ किंवा ‘सायबर प्रपोगंडा’ जोरात सुरु केले आहे. आपण त्याला ‘माहिती युद्ध’देखील म्हणू शकतो. या सायबर वॉरचे नेतृत्व पाकिस्तानी मेजर जनरल असिफ गफूर करीत आहेत.

पाकिस्तान सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे पाकिस्तान प्रामुख्याने आखाती देशातील मुस्लिम देशांकडे हात पसरतो आहे. ही मदत सहज मिळावी म्हणून पाकिस्तान हिंदुस्थानची आखाती देशांत बदनामी करण्याचा घाणेरडा रडीचा डाव खेळत आहे. त्यासाठीच सध्या कोरोनाच्या काळात हिंदुस्थानातील मुस्लिमांना कसे लक्ष्य करण्यात येत आहे, ते हिंदुस्थानात कसे सुरक्षित नाहीत अशा पद्धतीने दुष्प्रचार सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून केला जात आहे. त्याद्वारे आखाती देशांत हिंदुस्थानची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आहे आणि पाठोपाठ हिंदुस्थानला आखाती देशांनी अर्थसहाय्य थांबवावे असा जोर लावला जात आहे. त्यासाठीच हिंदुस्थान हा मुस्लीमविरोधी देश आहे. त्यामुळे हिंदुस्थानची अर्थसहाय्य थांबवा, कश्मीरमध्ये हस्तक्षेप करा, असा तकादा पाकिस्तान नव्या सायबर वॉरच्या माध्यमातून लावत आहे. आयएसआयने दुष्प्रचार करण्याकरीता एक हजार युवकांना ट्रेनिंग दिले आहे. प्रत्येक महिन्यात पाकिस्तानी सैन्याची ही मीडिया विंग एक स्पर्धा आयोजित करते आणि त्यामध्ये त्यात युवकांनी हिंदुस्थानविरुद्ध केलेल्या दुष्प्रचाराचे विश्लेषन केले जाते. ज्यांच्या फेसबुकवरच्या पोस्ट किंवा ट्वीट रिट्वीट होतात अशांना पाकिस्तानी सैन्याच्या सायकॉलॉजिकल किंवा मानसिक युद्धाच्या डिव्हिजनमध्ये भरती केले जाते. त्यांना बक्षीस म्हणून पाकिस्तानी सैन्याच्या फौजी फाऊंड फाउंैडेशनमध्ये नोकरी दिली जाते. त्यांचे काम असते की वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर हिंदुस्थानविरोधी स्टोरीज, फिल्म किंवा थीम्स सुरू करायच्या, त्यांना परदेशातील कुठल्याही मीडिया हाऊसने प्रसिद्धी दिली व पुढे सरकवले तर प्रमोशन द्यायचे. यातही सर्वाधिक खोट्या आणि विषारी प्रचाराला सातत्याने प्रसिद्धी द्यायची.

मात्र हे करताना सोशल मीडियावर नावे मात्र हिंदुस्थानी वापरायची. त्यातही खास करून जे हिंहंदुस्थानी मान्यवर हिंदुस्थानात आणि परदेशात प्रसिद्ध आहेत आणि ज्यांना मीडियामध्ये महत्त्व दिले जाते त्यांचा वापर जास्त करायचा. त्यांच्या नावावर विषारी आर्टिकल, तेढ पसरवणारे व्हिडिओ, फिल्म सोशल मीडियावर प्रसिद्ध करायची. मात्र काही दिवसानंतर जर हे ट्वीट, व्हिडिओ किंवा हे आर्टिकल त्या व्यक्तीने किंवा त्या हिंदुस्थानीने लिहिले नव्हते असे स्पष्ट झाले तर फॅक्ट चेक नावाचे शस्त्र एखाद्या मोठय़ा वर्तमानपत्रात वापरून ते खोटे आहे असे दाखवायचे, पण त्यातही जुन्या, खोटय़ा विषयाला फोडणी द्यायची.

अशी प्रसिद्धी झाली की हिंदुस्थानातील काही उदारमतवादी मंडळी हिंदुस्थानात इस्लामी फोबिया कसा पसरत आहे असा कांगावा करीत त्याच विषयाला परदेशातील प्रसारमाध्यमांतून प्रसिद्धी देतील. म्हणजे एकच एक खोटा विषय वेगवेगळय़ा पद्धतीने पुन: पुन्हा प्रसिद्धीत आणून हिंदुस्थानबाबत दुप्रचार करण्याचे काम या युवकांना दिले गेले आहे. हे युवक वेगवेगळय़ा प्रकारे हा प्रचार करीत असतात. म्हणजे हिंदुस्थानी सैन्य कश्मीरमध्ये मानवीहक्क पायदळी तुडवते, अत्याचार करते, हिंदुस्थानी सैन्यात फूट आहे, हिंदुस्थानी राजकीय पक्ष राष्ट्रहितापेक्षा एकमेकांनाविरुद्ध भांडण्यात जास्त रस दाखवतात. अशाप्रकारचे लेखन परदेशातील प्रसारमाध्यमातून मॅनेज करायचे उद्योग हे युवक करीत आहेत.

थोडक्यात, परदेशात, विशेषत: मुस्लीम देशांमध्ये हिंदुस्थानला बदनाम करण्याचे उद्योग जोरात सुरू आहेत. कोरोनासारखे संकट असताना सामाजिक एकतेला बाधा पोहोचवून नवीन संकट निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुस्लिमांमधील मान्यवरांनी करूनही स्थानिक पातळीवर त्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. हिंदुस्थानातील काही लेखक, नेतेमंडळी ही आग भडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अरुंधती रॉय यांच्यासारखी लेखिका जर्मनीतील एका प्रसिद्धीमाध्यमात ‘मोदी सरकार आल्यापासून हिंदुस्थानात मुसलमानांविरुद्ध तिरस्कार आणि हिंसाचाराची लाट आली आहे. कोरोनाशी लढताना हिंदुस्थानचा स्थानिक मुस्लिमांविषयीचा दृष्टिकोन नरसंहारासारखा आहे.’ असे विखारी लेखन करीत आहे. चीन सरकारच्या एका वृत्तवाहिनीवरील शोदरम्यान एका हिंदुस्थानी राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांनी ‘दिल्लीत मुस्लिमांची कत्तल होत आहे’ अशी मुक्ताफळे उधळली होती. तर ‘गल्फ न्यूज’ या आखाती देशांत जास्त वाचल्या जाणाऱया वृत्तपत्रात एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रवक्त्यांनी ‘दिल्लीत नरसंहार’ असे म्हटले होते.

या पद्धतीने आखाती देशांमध्ये हिंदुस्थानला बदनाम करून त्या देशांशी जुळलेले संबंध बिघडवण्याचे काम पाकिस्तानी आयएसआयच्या वतीने केले जात आहे. त्यासाठी खोटय़ा आणि बनावट स्टोरीजचा कारखाना उघडण्यात आला असून त्याला कच्चा माल पुरविण्याचे उद्योग हिंदुस्थानातीलच काही लोक करीत आहेत. यासाठी सायबर युद्धाचा वापर केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या