लेख – मुंबई दूरदर्शन : महाराष्ट्राचा सांस्कृतिक देव्हारा

>> जयू भाटकर

राज्यात, देशात समाजमनावर आकाशवाणी आपले अधिराज्य गाजवत असतानाच मुंबई दूरदर्शनची राज्यातील सुरुवात ही प्रसारण माध्यमातली एक वेगळी पाऊलवाट होती. काळाच्या ओघात-प्रगतीच्या वेगात बघता बघता या वाटचालीची प्रसारण माध्यमांची ही दिंडी, तिची वाटचाल 48 वर्षांची झाली. आणखी दोन वर्षांनी म्हणजे 2022 साली पन्नाशीचा टप्पा येईल. हिंदुस्थानी संस्कृती परंपरेत आपली वेगळी मोहर उठवून ठेवणाऱया महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संवर्धनात मुंबई दूरदर्शन केंद्राचे योगदान उल्लेखनीय आहे. 2 ऑक्टोबर रोजी मुंबई दूरदर्शनचा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्ताने दूरदर्शनच्या इतिहासाला एक उजाळा.

आजपासून बरोबर 48 वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबर 1972 रोजी मुंबई दूरदर्शनच्या कार्यक्रम प्रसारणाची सुरुवात सुप्रसिद्ध सनईवादक आदरणीय बिस्मिलाखाँ यांच्या सनईवादनाने झाली. संध्याकाळी पहिले मराठी बातमीपत्र सादर झाले. त्याचे वृत्तनिवेदक होते डॉ. विश्वास मेहेंदळे. आपल्या देशात दूरदर्शनचा प्रारंभ राजधानी दिल्लीत 15 डिसेंबर 1959 साली झाला. त्यानंतर साधारण तेरा वर्षांनी मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम वरळीच्या केंद्रातून सुरू झाले.

आकाशवाणीच्या बहुश्रुत कार्यक्रमांमुळे रेडियोला प्रसिद्धीचे एक वेगळेच वलय प्राप्त झाले होते. मुंबईपुरतं बोलायचं झालं तर गिरगावात चाळीत मध्यमवर्गीय कुटुंबात घरी रेडिओ आला की सर्व चाळीत यजमान कुटुंब साखर वाटत असे. मनोरंजनाच्या अशा वातावरणात राज्यात मुंबई दूरदर्शन केंद्राचं आगमन झालं. कृष्णधवल प्रसारण सुरू झालं. 1972 ते 1980 या कालावधीत मुंबई दूरदर्शनची खऱया अर्थाने लोकप्रियता वाढली. नव्या नवलाईने सुरू झालेल्या संध्याकाळच्या मराठी बातम्या घरोघरी सर्व कुटुंब पाहू लागले. दूरदर्शनच्या हिंदी, इंग्रजी बातम्यांचं राष्ट्रीय प्रसारणही वरळीच्या स्टुडिओतून होऊ लागलं. अभिनेत्री स्मिता पाटील तेव्हा हिंदी, इंग्रजी बातम्या वाचत होती. मराठी बातम्या देणारी नामवंत वृत्तनिवेदकांची फौज उभी राहीली. वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे, प्रदीप भिडे, स्मिता तळवलकर, चारुशिला पटवर्धन, शोभा तुंगारे, वासंती वर्तक आणि अन्य वृत्तनिवेदक प्रेक्षकांच्या घरातले, कुटुंबातले, जिव्हाळय़ाचे आदरार्थी बनले. इथल्या विविध कार्यक्रमांतून सूत्रसंचालक, निवेदक म्हणून सहभागी झालेला सुधीर गाडगीळ अवघ्या मराठी मनाच्या गळय़ातला ताईत बनला. मराठी नाटय़ावलोकन, नाटय़धारा कार्यक्रमातील लोकप्रिय नाटकाची संपादित दृकश्राव्य झलक नाटय़रसिकांना पाहता आली. संगीत रंगभूमीवरील पालवी, किलबिल, युवदर्शन या कार्यक्रमांनी राज्याची भावी पिढी आपल्या कलागुणांच्या सादरीकरणाने नवा जोश, नवी उमेद घेऊन रसिकांसमेर आली. प्रतिभा आणि प्रतिमा कार्यक्रमातून विविध क्षेत्रांतील थोरामोठय़ांच्या भेटी होऊ लागल्या. प्रवाहाविरुद्ध जगणारी, जगावेगळं, अपवादात्मक काम करणारी अनेक माणसं मुलुखावेगळी माणसं कार्यक्रमातून सर्वदूर पोहोचली. दैनंदिन आरोग्य स्वास्थ्याला केंद्रबिंदू ठरवून आरोग्य नेऊ घरोघरी हे ब्रीदवाक्य घेऊन आरोग्य संपदा विभागाने संपूर्ण राज्यात विविध विद्यापीठांच्या सहकार्याने अभिनव अभियान सुरू केलं. मुंबई दूरदर्शनच्या ज्ञानदीप कार्यक्रमाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. कष्टकरी कामगारांच्या दैनंदिन जीवनाचं, त्यांच्या कलागुणांचं दर्शन कामगार विश्वमधून घडलं. उद्योग क्षेत्रातल्या विविध समस्या, प्रश्न यांना उद्योग विश्व कार्यक्रमात प्राधान्याने स्थान मिळाले. क्रीडांगण कार्यक्रमातून खेळाच्या मैदानावरचं राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचं क्रीडा नैपुण्य पाहता आलं. वर्षानुवर्षे रेडिओवरच क्रिकेट समालोचन ऐकणाऱया पिढीला थेट प्रसारणामुळे घरात चहाचा आनंद घेत स्टेडियमवरच्या टेस्ट मॅच आणि वन डे क्रिकेटचा आनंद घेता आला. महिलांच्या जगाचं अनोखं दर्शन सुंदर माझं घर मधून पाहता आलं. आरोही, चित्रहार, छायागीत या कार्यक्रमांनी लोकप्रियतेचं शिखर गाठलं. महाराष्ट्र भूमीतली भक्तीसंप्रदायाची परंपरा भजन, लोकसंगीत कार्यक्रमातून दिसू लागली. गजरा कार्यक्रमाच्या आकर्षक निर्मितीमुळे लाखो प्रेक्षक आठवडय़ातल्या गजरा कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहू लागले. आठवडय़ाच्या कार्यक्रम रूपरेषेची झलक दाखवणाऱया साप्ताहिकीने अभिनेत्री भक्ती बर्वेच्या सादरीकरणाने उभ्या महाराष्ट्राला मनोरंजनाचा वेगळाच आनंद दिला. ज्येष्ठ कलावंत बबन प्रभू आणि याकुब सईद या जोडीने हास-परिहासच्या माध्यमातून समस्त प्रेक्षक वर्गाला पोट धरून हसवलं. दर शनिवार, रविवारी मराठी चित्रपट मराठी प्रेक्षकांना घरातल्या टीव्हीवर पाहता आले.

विश्वासार्हता या निकषावर आज राज्यात, देशात आणि जगभर साडेनऊच्या बातम्या लाखो प्रेक्षक पाहतात. बातमी संदर्भ आणि सत्यता यांची खातरजमा करतात. गेले अनेक वर्षं महाराष्ट्र शासनाचा जय महाराष्ट्र कार्यक्रम प्रसारित होतो आहे. आमची माती, आमची माणसं कार्यक्रमाने तर लोकप्रियतेचा उच्चांक ओलांडला. कष्टकरी शेतकऱयांना नवी माहिती मिळाली. पुढे दूरचित्रवाणी क्षेत्रात नवं तंत्रज्ञान आलं. स्पर्धाही वाढली. धोरणात्मक बाब म्हणून देशभरात राज्याराज्यातल्या दूरदर्शनच्या प्रादेशिक केंद्राची नावं बदलण्यात आली. मुंबई दूरदर्शनचं बारसं सह्याद्री वाहिनी असं झालं. मराठमोळं सह्याद्री नाव, वाहिनीच्या दर्जेदार कामामुळे जनमानसात आपलंसं झालं. नोव्हेंबर 2002 पासून महाचर्चेत थेट प्रसारण प्रत्येक शुक्रवारी वरळीच्या स्टुडिओतून सुरू झालं. विविध गुणवैशिष्टय़ांनी महाचर्चा कार्यक्रम लोकप्रिय ठरला. 2002 ते 2020 या 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात या कार्यक्रमाला विविध सहा पुरस्कार मिळाले. 18 वर्षं या कार्यक्रमाची निर्मिती करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून 2001 पासून केंद्राने आणखी एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला. तो म्हणजे सह्याद्री नवरत्न पुरस्कार समारंभ. राज्याच्या विविध नऊ क्षेत्रांतील नामवंतांना पुरस्कार देऊन गौरवण्याची परंपरा सुरू झाली. हिंदुस्थानी दूरदर्शनच्या इतिहासातील सर्व राज्यांचा विचार करता ही सुरुवात मुंबई दूरदर्शनने केली. पुढे पुरस्कार उपक्रमात वाढ झाली. समस्त महिला वर्गाचाच सन्मान म्हणून सह्याद्री हिरकणी पुरस्कार समारंभ सुरू झाला. त्याही पुढे जाऊन आदिवासी कुटुंबातील तरुणींनी प्रवाहाविरुद्ध जाऊन जे विधायक काम केलं त्या आदिवासी युवतींचा गौरव म्हणून सह्याद्री नवज्योती पुरस्काराचा उपक्रम अवतरला. कर्तृत्ववान मुलीने, लेकीने धीरोदात्त आईचा सन्मान करायचा या अभिनव संकल्पनेतून प्रेरणा पुरस्कार मुंबई दूरदर्शनने सुरू केला. त्याला एवढी लोकप्रियता मिळाली की तातडीने दूरदर्शन महासंचालनालयाने हिंदी राष्ट्रीय कार्यक्रमासाठी हिंदी प्रेरणा पुरस्कार समारंभाची जबाबदारी मुंबई दूरदर्शनवर सोपवली. या यशाचे श्रेयकर्ते मुंबई दूरदर्शनचे सर्व शिलेदार आहेत.

राज्याच्या लोकसंस्कृती आणि लोकजीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या अशा या मुंबई दूरदर्शन केंद्रात मला निर्मिती विभागात सहाय्यक निर्माता, निर्माता, सहाय्यक केंद्रसंचालक या तिहेरी भूमिकेत अगणित विविध कार्यक्रमांची निर्मिती, सेवा करता आली हे माझं भाग्य समजतो. इथल्या वेगळय़ा कामामुळे माझ्यासारख्या सामान्य चेहऱयाला अनेक दिग्गजांना, नामवंतांना भेटता आले. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कर्तृत्ववान व्यक्तींना जवळून पाहता आलं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक स्मरणीय कार्यक्रम, प्रसंग, घटना यांचा साक्षीदार होता आलं. माझ्या व्यक्तिगत जीवनात एक वेगळा आनंद. मित्रहो, भविष्यातील आव्हानाची लाट फार मोठी आहे. प्रत्येक नवा दिवस नवं तंत्रज्ञान घेऊन येत आहे. अत्याधुनिक यंत्रणा उपल्बध होत आहे. मात्र दूरदर्शन यंत्रसामग्रीबरोबर कार्यक्रमनिर्मितीसाठी पत्रकारिता, साहित्य, नाटक, चित्रपट, संगीतात व्यापक अनुभव असणारे नवे चेहरे या चेहऱयांची संख्या वाढायला हवी. थोडक्यात, कार्यक्रम विभागात निर्मितीकौशल्य असणाऱया प्रतिभावंतांची संख्या वाढायला हवी. मला खात्री आहे की मुंबई दूरदर्शनने दर्जेदार कार्यक्रम निर्मितीचं आव्हान कालपर्यंत पेललं. आणि उद्याही पेललं जाईल. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की, मुंबई दूरदर्शन हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा पवित्र देव्हारा आहे. त्याचं पावित्र्य दर्जेदार कार्यक्रम निर्मितीच्या रूपाने जपूया,

(लेखक मुंबई दूरदर्शन केंद्राचे माजी सहाय्यक केंद्र संचालक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या