
>>जयू भाटकर
मराठी रंगभूमी विश्वातील एक यशस्वी नाटय़संस्था व्यवस्थापक श्री. अशोक मुळये. काकांनी आपल्या सुंदर कल्पकतेतून साकार केला एक स्मरणीय स्नेह भेटीचा – स्नेह संमेलनाचा छोटेखानी कार्यक्रम. निमित्त होते मुंबई दूरदर्शनला पन्नास वर्षे.
जगावेगळा कार्यक्रम, संकल्पना राबविणारे, मालक, मुद्रक, प्रकाशक, आणि संपादक, सर्वस्वी मीच, ‘मी म्हणेन ते धोरण आणि लावेन ते तोरण’ या उक्तीचा परिचय व्यक्तिमत्त्वात असणाऱ्या मराठी रंगभूमी विश्वातील एक यशस्वी नाटय़संस्था व्यवस्थापक श्री. अशोक मुळये, वय 79 वर्षे. अशा मुळये काकांनी आपल्या सुंदर कल्पकतेतून साकार केला एक स्मरणीय स्नेह भेटीचा – स्नेह संमेलनाचा छोटेखानी कार्यक्रम. निमित्त होते मुंबई दूरदर्शनला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने काही निवडक दूरदर्शनमध्ये काम केलेल्या मंडळींचं छोटंसं घरगुती स्नेहसंमेलन. स्थळ – प्रभादेवी, मुंबईतील विनायक गवांदे आणि माधुरी गवांदे या दांपत्याचं घर. घरच्या आपुलकीने त्या सुंदर भेटीची मैफल डॉ. याकूब सईद, अरुण काकतकर, डॉ. किरण चित्रे, नीना राऊत, शिवाजी फुलसुंदर, अजित नाईक, रविराज गंधे, मीना गोखले-पानसरे, माधवी कुलकर्णी, माधवी मुटाटकर, दीपक शेडगे, वासंती वर्तक, विजय भिंगार्डे, रत्नाकर तारदाळकर, शीला जुन्नरकर, अमृता राव, नंदकुमार पाटील आणि अस्मादिक या उपस्थितीने दूरदर्शन शाळकरी वर्गाचा आनंद देणारी ठरली.
मराठी नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका विश्वातील सर्वच कलावंत आणि रंगकर्मींचा प्रितीयुक्त आदर लाभलेल्या श्री. मुळये काकांच्या स्वागताला सुरुवात झाली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, एबीपी माझा वृत्तवाहिनीचे संपादक श्री. राजीव खांडेकर या दोघांच्या हस्ते अनुक्रमे दूरदर्शन ज्येष्ठ निर्माता याकूब सईद (वय वर्षे 89) आणि अरुण काकतकर (वय वर्षे 75) या दोघांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला.
2 ऑक्टोबर 1972 रोजीच्या मुंबई दूरदर्शनच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचे साक्षीदार-निर्माते श्री. याकूबजी बोलू लागले. उद्घाटनाचा कार्यक्रम, प्रमुख पाहुणे त्यावेळचे राज्याचे राज्यपाल मा. अली यावर जंग- संध्याकाळी 5.30 च्या सुमारास तेव्हाचे केंद्र संचालक श्री. पी. व्ही. के. कृष्णमूर्ती यांच्या सूचनेनुसार राजभवनला त्यांनी केलेला फोन, पलीकडून राजभवनमधील राज्यपालांच्या स्वीय साहाय्यकांनी दिलेला प्रतिसाद, ‘‘प्रोग्राम तो कल है,’’ असं सांगितल्यावर तारखेचा झालेला घोळ, स्वीय सहाय्यकांनी चुकून दोनऐवजी लिहून घेतलेली तीन तारीख, चूक सुधारण्यासाठी घाबरलेल्या याकूबजींनी केलेली आठवण ‘‘सर जी, आज दो तारीख है, प्रोग्राम अभी 6.30 बजे हैं।’’ हे संभाषण झाल्यावर बंद झालेला दूरध्वनी, त्यानंतर पुढच्या 15 मिनिटांत वाऱ्याच्या वेगाने हललेली शासकीय यंत्रणा, कार्यक्रमस्थळी आलेला पोलीस फौजफाटा आणि 6.15 वा. मा. राज्यपालांचे झालेलं आगमन आणि ठरल्याप्रमाणे वेळेत झालेला तो मुंबई दूरदर्शनचा उद्घाटन समारंभ पार पडला. हा प्रसंग पिढ्यान्पिढ्या आठवणीत राहावा असा. त्याच उद्घाटन समारंभातला आणखी एक किस्सा श्री. याकूबजींनी सांगितला तो असा, उद्घाटन समारंभाचा संपूर्ण कार्यक्रम साधारण दोन-सवा दोन तासांचा थेट प्रसारित झाला, मात्र त्या थेट प्रसारणाचं रेकार्ंडग करावं हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. परिणामी, त्या ऐतिहासिक सोहळय़ाच्या उद्घाटन समारंभाचं चित्रीकरण आज उपलब्ध नाही. ही मनाची हूरहूर सांगताना याकूबजींचे शब्द जड झाले.
तिसरा सत्कार झाला 100 मराठी नाटकांच्या दिग्दर्शनाचा अनोखा पल्ला गाठणाऱया नाटय़ दिग्दर्शक विजय पेंकरेंचा. घरगुती वातावरणातल्या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘नाटय़ दिग्दर्शक म्हणून मला अजून खूप शिकायचं आहे. रंगभूमीवरचा प्रवास चालू आहे. 100 नाटकांचं दिग्दर्शन केलं म्हणजे अंतिम ध्येय साध्य झाले असे नाही. हे करू शकलो याचं सारं श्रेय मराठी नाटय़रसिकांना आहे.’’ उपस्थित सर्वांच्या आग्रहामुळे आदरणीय श्री. याकूबजी आणि श्री. अरुण काकतकर यांच्याबद्दल काही आठवणी मी सांगितल्या. सन 1972 ते 1990 हा मुंबई दूरदर्शनचा सुवर्णकाळ होता. ज्याला मी वरळीच्या दूरदर्शन पेंद्रातलं सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निर्मितीचं बालगंधर्व युग म्हणतो. अशा वैभवशाली परंपरेतल्या दूरदर्शन पेंद्रात मला अनेक दिग्गजांचा सहवास लाभला. इथं काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, असं बोलून मीही थांबलो. त्यानंतर सत्यरंजन धर्माधिकारी यांनी आपले वडील ज्येष्ठ न्यायमूर्ती, विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांची शिस्त, संस्कार आणि मुंबई दूरदर्शन कार्यक्रमांबद्दलची आत्मीयता याबद्दल आपल्या तरुणपणातले दिवस आठवून सांगितले. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर मनमोकळेपणाने बोलून गेले. मुंबई दूरदर्शन म्हणजे सुवर्णसंचित. या संचिताचा या पेंद्राचा प्रवास पुस्तक रूपाने कुणीतरी लिहायला हवा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
त्यांच्या या भैरवी बोलानं अनौपचारिक कार्यक्रम संपला आणि मग स्नेहभोजन झाले. 3 तासांच्या या घरगुती कार्यक्रमात आम्ही दूरदर्शनचे माध्यमकर्मी मुंबई शहराच्या कोलाहलातून काही तास एकत्र आलो. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. या सोहळय़ात साऱयांचं लक्ष वेधून घेतलं होतं ते सुप्रसिद्ध प्रकाश योजनाकार श्री. शीतल तळपदे यांनी या कार्यक्रम मैफलीसाठी गवांदेंच्या घरातल्या प्रशस्त हॉलमध्ये केलेली सुंदर, समायोचित प्रकाशयोजना. ती सुखदायक वाटली. मुळये काकांच्या आदेशाने भास्कर शिंदेंनी सर्वांकडे जातीने लक्ष दिलं.
आणखी एक योगायोग असा, मुंबई दूरदर्शन पेंद्राचा उंच मनोरा (टी.व्ही. टॉवर), ज्या पंपनी उद्योग समूहानं बांधला, त्या समूहाचे वरिष्ठ अधिकारी महेश मुद्दा सपत्नीक उपस्थित होते. या सुंदर संमेलन भेटीचा निरोप घेऊन विनायक गवांदेंच्या घरातून बाहेर पडताना मनात विचार आला, वयाची 80 वर्षे गाठलेल्या एककल्ली स्वभावाच्या अशोक मुळय़े नामक व्यक्तिमत्त्वानं आपल्या कार्यक्रम संयोजनाच्या वाटचालीत विशेष मुलांच्या मातांचं स्नेहसंमेलन केलं. दहा बाय दहाच्या खोलीत 14 ते 20 माणसं राहतात, हे पाहून त्यांनी एकत्र कुटुंबाचं अनोखे संमेलन भरवलं. कार्यकर्ता ते संयोजक सबकुछ मीच, या एकाधिकार पद्धतीने चौदा वर्षे माझा पुरस्कार समारंभ घडवून आणला. माझ्या खिशात एकही दमडा नाही, पण खिशात दमडा असणारे अनेक जण माझ्या खिशात आहेत म्हणूनच असे कार्यक्रम मी करू शकतो, असे आवर्जून सांगणाऱया श्री. मुळये काकांनी मुंबई दूरदर्शनच्या 50 वर्षे वाटचालीची दखल घेऊन आम्हा काही जणांना एकत्र आणलं. एक छान कार्यक्रम आयोजित केला, हे ऋणानुबंध जन्मजन्मांतरीचे. मित्रहो, व्यक्ती, संस्था यांच्याप्रती सहृदयी कृतज्ञता आणि अभिजात रसिकता आजही निःस्वार्थपणे दाखविली जाते, याची प्रचीती या कार्यक्रमानं दिली. याबद्दल त्यांना कृतार्थ नमस्कार.
(लेखक दूरदर्शनचे निवृत्त सहाय्यक संचालक आहेत.)

























































