
>> कल्याणी हर्डीकर
महालक्ष्मी महामायेचा आदिशक्तीचा वैश्विक प्रवास पाहताना आपल्या जीवनात आजूबाजूला वावरणाऱया श्रमिक-बौद्धिक-शारीरिक काम करणाऱया सर्वसामान्य महिलाही साक्षात लक्ष्मीच्याच स्वरूपात पाहता यायला हव्यात. जात-धर्म-वर्ण-वर्गाचा अंधकार नाहीसा करून त्यांच्यातल्या क्षमतांचाही सन्मान करता यायला हवा, तरच खऱया अर्थाने लक्ष्मीपूजन केल्याचा आनंद साजरा होईल.
लष्म्या सह हृषीकेशो देव्या कारुण्यरूपया।
रक्षकस्सर्वसिद्धान्ते वेदान्तेषु च गीयते।।
परमेश्वर, परमात्मा मोक्ष देणारा आहे, पण तो जर लक्ष्मीसहित नारायण असेल तरच, लक्ष्मीशिवाय मोक्ष कदापिही शक्य नाही असे लक्ष्मी-नारायणाच्या आराधनेविषयी सांगितले जाते. आपण सगळेच लक्ष्मीचे उपासक आहोत. तिचा अखंड सहवास मिळावा म्हणून आपण सतत धडपडत असतो. तिचा पाय आपल्याच घरात स्थिर राहावा म्हणून कसली कसली व्रते-वैकल्ये करत असतो. दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे तर लक्ष्मीपूजनच.
देवदेवता या खरे तर मानवी मनातल्याच अत्युच्च कल्पना आहेत. विष्णू-लक्ष्मी म्हणजे आदर्श दंपती. नववधू आणि वराला आपण लक्ष्मी-नारायणाचा जोडा म्हणतो. नववधू त्या घराची गृहलक्ष्मी म्हणून समृद्ध तांदळाचे माप ओलांडून गृहप्रवेश करते. घरदार वैभवसंपन्न-फळतेफुलते-बहरवणारे बनवणारी ती लक्ष्मीच मानतो आपण. देवता ते मानवी नातेसंबंध आणि मानवी नातेसंबंध ते देवता असलेला हा खरा तर देवदेवतांचा प्रवास हिंदू संस्कृतीत आहे.
अमरकोषात आणि त्याच्यावरच्या क्षीरस्वामींच्या टीकेत मिळून पार्वतीचीच एपूण 24 नावे येतात आणि सत्त्व- रज- तम गुणांप्रमाणे ती महासरस्वती – महालक्ष्मी – महाकाली रूपात येते असे पौराणिक कालातले उल्लेख आहेत. महालक्ष्मी ही शक्ती, स्थिती आणि लय यांची अधिष्ठात्री आहे. या आदिशक्तीला भक्ती, मुक्ती, प्रदायिनी म्हटले आहे. जगाचे पालनपोषण करणे हे तिचे प्रमुख कार्य आहे. तिच्याच कृपेमुळे विद्याशक्ती, श्री, संपत्ती प्राप्त होतात. रजोगुणांची ती अधिष्ठात्री. हे जीवकर्म करीत असताना कर्माचे कर्तृत्व आणि भोक्तृत्व आपणाकडेच आहे असा मोह निर्माण करणाऱया महिषासुर असुराचा ती वध करते आणि जीवाला परमात्म मार्गाकडे नेते. श्रीविष्णूच्या या अहंता शक्तीलाच महालक्ष्मी-नारायणी म्हणतात.
व्यंकटेश- पद्मावती आणि जैन परंपरा
हिंदू आणि जैन परंपरांमध्ये पद्मावती, कमला, मातृदेवता आढळते. पद्म म्हणजे कमळ. कमळावर आरूढ झालेली पिंवा वसलेली लक्ष्मी म्हणजे पद्मावती. या देवतांना शासन देवता म्हणून जीन मूर्तीबरोबर पुजण्यास प्रारंभ झाला. जैनांमध्ये असे मानले जाते की अंबिका, पद्मावती, विद्यादेवी या शासन देवता जीन तीर्थांचे रक्षण करतात. धरेंद्र देवाच्या आणि पार्श्वनाथाच्या संदर्भात पद्मावती देवीचा कायम उल्लेख केला जातो. तिची उपासना जैनांच्या दोन्ही पंथांमध्ये म्हणजे दिगंबर- श्वेतांबरांमध्ये केली जाते.
पद्मावती-बालाजीची प्राकdकथा ः पद्मावती आणि विष्णू यांचे परस्परांवर निस्सीम प्रेम होते. एकदा दोघांमध्ये काही मतभेद झाले. पद्मावती रागावली. विष्णूला सोडून एकदम दक्षिणेत येऊन राहिली. विष्णूही पाठोपाठ निघाला. ती सापडेना. वेंकटाद्री टेकडीपर्यंत येऊन ठेपला. दमला, थकला. एक झोपडी बांधून तिथे राहू लागला. बपुलादेवीने त्याला पाहिले. ती श्री विष्णूच्या प्रेमात पडली, ‘‘श्रीनिवास’’ म्हणून हाकारू लागली. तिरुपती, बालाजी, पद्मावतीच्या प्राकdकथांप्रमाणेच पंढरपूरच्या दिंडीरवनाशी संबंधित पुराणकथा आहे. वेंकटरमणाची पत्नी पद्मावती तशी विठ्ठलाची प्रेयसी पद्मा. पद्मा आणि पदूबाई एकच. तीच रुक्मिणी होऊन प्रकटली असे पदूबाईचे धनगर भक्त मानतात. त्यामुळे तर पंढरपुरात पद्मतीर्थ निर्माण झाले. असा हा वेंकटरमणाचा-पद्मावतीचा, विठ्ठल-पदूबाईचा, विष्णू-लक्ष्मी अनुबंध केवळ आंध्र-महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही. तो सर्व हिंदुस्थानभरचा जैन-बौद्ध-हिंदू-शीख यांचा आहे. वैदिक तत्त्वज्ञानातला ब्रह्म आणि माया या संकल्पनेच्या प्रभावातून आदिबुद्ध आणि प्रज्ञापारमिता या संकल्पना आल्या. बुद्धमातेला महामाया, आदिमाता, महामाता म्हणून मानले जाते. तिबेटमध्ये तिला ग्युदुत्मा म्हटले जाते. महामाता आदिमाता म्हणून तिला पुजले जाते.
महालक्ष्मीची वैश्विक रूपे
महालक्ष्मीला श्री कमला, पद्मावती असेही म्हणतात. ऐश्वर्य, समृद्धी, सौंदर्याची देवता समजतात. विष्णूबरोबर असेल तर लक्ष्मी, विष्णू भूदेवीसह असेल तर ती श्री क्षीरोद्भवसंभवा. श्री कमला, श्रीलक्ष्मीचे जन्मस्थान समुद्र. समुद्रमंथनातून 14 रत्ने बाहेर आली तशीच लक्ष्मीही आली. रोमनांची देवी व्हीनस हीसुद्धा समुद्रातून उत्पन्न झाली. ग्रीकांची अथेना म्हणजेही लक्ष्मीच बरं का! श्री कमला म्हणजे अफ्रोडायटिस. अफ्रो म्हणजे फेस. समुद्रफेन. या समुद्रफेसामधून अफ्रोडायटिस जन्मली अशी ग्रीक पुराणकथा आहे. ही सौंदर्य, सृजन निर्मिती, मातृत्वाची देवता मानली जात होती आणि तिचा उत्सव साजरा केला जात होता. ग्रीक, रोमन संस्कृतीत कमळ हे सृजनशीलता, भरभराट, वैभव, समृद्धी आणि कामुकतेचे प्रतीक मानले जात असे. आपण ज्याप्रमाणे महालक्ष्मीची पूजा करतो तशा या देवतांची पूजा होत असे. त्यांचे सण साजरे केले जात असत. अफ्रोडायटिसच्या सुकुमार सौंदर्यामुळे सृष्टीतील पशुपक्षी आनंदित होत असत आणि तिच्या श्वासोच्छ्वासामुळे फुले उमलत असत अशी काव्यमय वर्णने केली जात असत. ग्रीक, रोमनांप्रमाणेच जैनांमध्येही ही लक्ष्मी आहे.




























































