गोष्ट सांगतो ऐका…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> किरण खोत (निवेदक-सूत्र संचालक)

गोष्टी ऐकायला सगळय़ांनाच आवडतात. म्हणूनच एखादा मुद्दा गोष्टीच्या माध्यमातून जर मांडला तर तो लोकांना लगेचच समजतो. आजही रात्री झोपताना आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टींची आठवण आपल्यापैकी अनेक जणांना असेलच.

तुम्ही कोणत्या वेळी कोणती गोष्ट सांगता यावरूनसुद्धा सांगितलेल्या गोष्टीतले यश-अपयश ठरले जाते. गोष्ट सांगताना श्रोत्याची मानसिकता समजून घेणे खूप गरजेचे आहे. जसे की, ती वेळ कोणती आहे, तो दिवस कोणता आहे इत्यादी.

काही लोकांना गोष्टी या पुस्तकात वाचायला आवडतात, तर काही लोकांना त्या ऑडिओ बुक्स माध्यमातून ऐकायला आवडतात. काही लोकांना त्या छोटय़ा छोटय़ा व्हिडीओजच्या माध्यमातून बघायलादेखील आवडतात. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वावर, त्याच्या व्यक्ती चरित्रावर चित्रपटदेखील बनतात आणि लोक थिएटर हाऊसफुल करून तो चित्रपट पाहतात. हीसुद्धा एक गोष्टच असते.

गोष्टीतल्या नायक किंवा नायिकेशी जेव्हा वाचणारा, ऐकणारा एकरूप होऊन जातो तेव्हा त्याला ती गोष्ट आपल्याच आयुष्याचा एक भाग असल्याचे जाणवते आणि मग आपोआप तो त्या गोष्टीत समरस होऊन जातो. म्हणूनच तुमचा मुद्दा जर तुम्हाला गोष्टीच्या माध्यमातून पटवून द्यायचा असेल तर काही बाबींची काळजी नक्की घ्या.

– कथा खूप कमी शब्दांत सांगितली तरीही समजणार नाही किंवा खूप लांबलचक करून सांगितली तर ती कंटाळवाणी वाटेल. म्हणूनच तुम्हाला सुवर्णमध्य गाठता येणे गरजेचे आहे.
– गोष्ट सांगताना तीन विभागांत विभागायला हवी. तिचा आरंभ, तिचा मध्य आणि सर्वोत्कृष्ट शेवट.
– गोष्टीतून आपला मुद्दा सांगितल्यामुळे अनेक फायदे होतात. जसे की, जे सांगायचे असते ते लोकांपर्यंत अगदी सहज पोहोचते. त्याला छान प्रतिसाद मिळतो.
– गोष्ट सांगताना तुमच्या आवाजातले चढउतार, शक्य असल्यास वेगवेगळय़ा पात्रांसाठी वेगवेगळे आवाज काढणे त्याची परिणामकारकता वाढवते.
– आपल्या वैयक्तिक जीवनातील गोष्टी जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण अगदी सहज बोलत जातो. आपल्याला संहितेची आवश्यकता नसते.
– गोष्ट सांगताना त्याला किती मीठ-मसाला लावून सांगितले यापेक्षा त्यातून काय धडा मिळणार आहे, याकडे तुमचे लक्ष असायला हवे.
– लोकांना जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही सांगता तेव्हा त्याचा मथितार्थ लगेचच सांगू नका. लोकांना ते शोधू द्या, पण याचीदेखील खात्री घ्या की, अपेक्षित बोध घेण्याऐवजी काही वेगळा तर अर्थ निघाला नाही ना! जर योग्य पद्धतीने तुम्ही गोष्ट मांडलीत तर तुमचे बोलणे लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहते आणि तुम्हाला अधिक ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी, बघण्यासाठी लोक उत्सुक होतात. त्यामुळे छान गोष्ट सांगणे या कलेला एक उत्तम वक्ता बनण्यासाठी आत्मसात करणे खूप गरजेचे आहे.