तुमचा आवाज तुमची ओळख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> किरण खोत, (निवेदक, सूत्रसंचालक)

माणसाचा आवाज ही खरंतर त्याची एक जगावेगळी ओळख आहे. एकसारखी दिसणारी अनेक माणसं आपल्याला भेटतात पण एकसारखा आवाज असणारी माणसं भेटणं हे मात्र विरळच. म्हणूनच आपला आवाज परमेश्वराने दिलेली ही एक दैवी देणगी आहे.

 आवाज हा माणसाबरोबर उपजत येतो, पण या आवाजाला प्रशिक्षण देऊन आणखीन समृद्ध बनवता येते. डेमोस्थेनीससारख्या अनेक जगप्रसिद्ध वक्त्यांचा मूळ आवाज तितकासा चांगला नव्हता, परंतु योग्य सराव करून त्यांनी आपल्या आवाजात सुधारणा आणली आणि ते पुढे जाऊन उत्तम वक्ते बनले. मोबाइल किंवा अन्य सॉफ्टवेअरवरती आपण जेव्हा तो आवाज रेकॉर्ड करतो तेव्हा त्या मोबाइलची असणारी गुणवत्ता, आधुनिकता महत्त्वाची असते. म्हणूनच मोबाइलवर रेकॉर्ड केलेला आपला आवाज प्रमाण आहे हे मानणे चुकीचे आहे. याकरिता तुम्ही रेकॉर्डिंग स्टुडिओलाच जाणे योग्य.

बरेचदा आपल्याला या गोष्टीचा अनुभव आला असेल की, समोरच्या माणसाला आपण जेव्हा फोन करतो तेव्हा त्याच्या आवाजावरून तो आनंदी आहे, रागात आहे किंवा चिंतेत आहे हे ओळखतो. त्यामुळे आपला आवाज समोरच्याला आपली मनस्थिती काय आहे, याबाबतची माहिती देऊ शकतो. एक उत्तम श्रोता एक उत्तम वक्ता होऊ शकतो. समोरचा व्यक्ती बोलत असताना तो कोणते शब्द वापरतो आहे, त्याचे उच्चार कसे आहेत, बोलत असताना त्याचा स्वर कसा आहे, त्याच्या आवाजातील चढ-उतार त्याच्या देहबोलीला किती जुळून येणारे आहेत या गोष्टींचे निरीक्षण केल्यावर आपल्यालासुद्धा आपल्या बोलण्यात, आपल्या आवाजात बदल आणता येतात. योग्य प्रशिक्षण घेतल्यास हे शक्य होते. प्राणायाम आणि श्वसन प्रक्रियेशी निगडित योगसाधना केल्याने आवाज सुधारतो. नियमित झोप आणि आवाजाला दिलेला योग्य आराम आवाजाची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत करतो.

आपला आवाज बसू नये याकरिता मोठय़ाने ज्या ठिकाणी स्पीकर्स, डीजे किंवा ढोलपथक अशा पद्धतीचे आवाज असतील तिथे बोलणे टाळावे आणि इशाऱयांनी आपला संकेत समोरच्या व्यक्तीला किंवा समूहाला द्यावा. तुमच्या आवाजाचे आरोग्य हे तुमच्या स्वरयंत्राच्या आरोग्यावर निर्भर करते आणि त्यामुळे अति तिखट, तेलकट न खाणे, जागरण न करणे, मोठय़ा आवाजात न बोलणे हे उत्तम उपाय आहेत. आपल्या आवाजाबद्दल कोणताही न्यूडगंड न बाळगता त्याला आवश्यक व्यायाम आणि प्रशिक्षण देऊन त्याचे योग्य जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. आपल्या आवाजावर आपले प्रेम असणे गरजेचे आहे.