तर्कनिष्ठ टिळक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कौस्तुभ सावरकर

एखादी गोष्ट तर्क संगत नसेल तर ती कुणीही सांगितलेली असू द्या, कधीही टिळकांनी स्वीकारली नाही. सतत पुढच्या काळात आता केलेल्या कृतीचे काय परिणाम होऊ शकतील हे पडताळून पाहिलं आणि मगच त्या गोष्टी केल्या. धर्मकारण, राजकारण एकत्र करत असतानाही त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही त्याचा वापर केला नाही. लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्षाला 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे त्यानिमित्त…

लोकमान्य टिळकांच्या मते स्वातंत्र्ययुद्ध हे कायम अर्थयुद्ध होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की, कुठलीही राज्ये ही त्यांच्या आर्थिक बळावर जिंकली अथवा केली जातात. आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये खूप मोठा वाद होता. खरं तर त्या वेळच्या सर्व समाजसुधारकांमध्ये आणि टिळकांमध्ये कायमच वाद राहिलेला आहे तो म्हणजे आधी सामाजिक सुधारणा की स्वराज्य. टिळकांचं मत असं होतं की, माणसाच्या किमान स्वतःच्या मूलभूत गरजा भागवण्याचा अधिकार मिळण्यासाठी त्याला राजकीय स्वातंत्र्य हवं. ते मिळाल्यावर आपला समाज आपल्या पद्धतीने सुधारता येईल. टिळकांचा कायम संवादावर विश्वास होता. ब्रिटिश लोकांचा आपल्या सामाजिक सुधारणेमधला हस्तक्षेप त्यांना नको होता. आता यावर अनेक विचारधारेच्या अनेकांची मतं भिन्न असतील, पण त्या वेळच्या सर्व पुढाऱयांमध्ये आणि आजच्या नेत्यांमध्ये एक मूलभूत फरक असा होता की, जी विचारसरणी ते अंगीकारत त्या विचारसरणीला अनुलक्षूनच त्यांची वागणूक असे आणि केलेल्या गोष्टींच्या परिणामाची जबाबदारी घ्यायची त्यांची कायम तयारी असे. टिळक त्याला अपवाद नव्हते. आगरकरांचा थोडा त्या वेळच्या समाजसुधारकांवर रोष होता तो म्हणजे समाजसुधारक हे आक्रमक नाहीत. कच खातात. जे टिळकांचंही मत होतं.

खरं तर एकत्रित देशभर स्वराज्य लढय़ाला लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली आणि माझ्या मते आधुनिक हिंदुस्थानच्या राजकारणाची नवी व्याख्याही त्यांनीच मांडली. धर्मकारण आणि राजकारण सर्वप्रथम टिळकांनी सुरू केलं. सार्वजनिक गणेशोत्सव हे त्यांचं एक महत्त्वाचं उदाहरण. ‘राजकीय नीतिमत्ता ही सर्वसामान्य पातळीवरून तपासता येणार नाही’ असं टिळकांचं मत होतं आणि त्यांनी ते वेळोवेळी सिद्धही करून दिलं. एकदा एका भाषणात टिळक म्हणाले की, ‘शिवाजी महाराजांनी अफझल खानाच्या पोटात नाइलाजानं वाघनखं खुपसली असं काही इतिहासकार म्हणतात, पण समजा महाराजांनी जाणूनबुजून अफझल खानाच्या पोटात स्वतःहून वाघनखं खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढला असं मान्य केलं तर बिघडलं कुठे?’ या उदाहरणातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की, आपण किती बापुडवाणे आहोत. आपल्याला नाइलाज म्हणून हिंसा करावी लागली. असली मखलाशी करण्यापेक्षा आपल्याला पटत होतं म्हणूनच आपण हिंसा केली हे मान्य करणं हे नैतिकदृष्टय़ा टिळकांच्या मते योग्य असं उदाहरण होतं. टिळकांमुळे त्या वेळची बहुसंख्य तरुण पिढी आक्रमक होत होती. त्यातलं एक मोठं उदाहरण म्हणजे विनायक दामोदर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर.

उद्योग, बळ, स्वदेश प्रेम हे ज्या देशाजवळ नसेल त्याचं स्वातंत्र्य कधीही टिकणार नाही. त्यातही आर्थिक बळ हवंच हा त्यांचा कटाक्ष होता. म्हणूनच ज्या वेळी गोदी कामगारांचा संप टिळकांनी सुरू केला त्याचे पडसाद मँचेस्टर इथल्या कापड गिरण्यांवर व्हायला लागले होते. स्वतंत्र हिंदुस्थानातले उद्योग हे शेतीभिमुख असायला हवेत असं ते मानत होते. त्यासाठी त्यांनी लातूरला जिनिंग मिल सुरू केली आणि मुंबईत बॉम्बे स्टोअर्स. जिथे आजही परदेशी पाहुण्यांची गर्दी जास्त असते. त्यांनी श्रीधरपंतांना म्हणजे त्यांच्या मुलाला सांगितलं होतं की, ‘चपलेचा व्यवसाय केलास तरी चालेल, पण त्या चपलेला थेट विदेशातून मागणी यायला हवी.’ आर्थिकदृष्टय़ा आपण स्वावलंबी झाल्याशिवाय आपण जगाच्या स्पर्धेत टिकूच शकणार नाही यावर त्यांचा विश्वास होता.

कुठलीही गोष्ट तर्कनिष्ठ असेल तरच ते स्वीकारत असत. भावनेच्या भरात काही करणं म्हणजे बिनडोकपणाचं लक्षण आहे असं ते मानत असत. अशा अनेक गोष्टी वेगवेगळय़ा वेळच्या वाचनातून आढळल्या आणि जेव्हा जेव्हा त्या गोष्टीतून वेगवेगळे टिळक आढळायला लागले तेव्हा तेव्हा टिळकांचं बहुआयामीपण अधोरेखित होऊ लागलं. गीतारहस्यातसुद्धा टिळकांनी कर्मयोगावर जास्त भर दिलाय. ‘वासांसि जीर्णानि यथा विहाय’ या गीतेतल्या श्लोकाबद्दल ते लिहितात की, ‘आपण आपले कपडे जुने झाल्यावर जसे ते कपडे उतरवून दुसरे नवीन कपडे घालतो, तसेच आत्मा जीर्ण झालेलं शरीर टाकून देऊन दुसरं शरीर परिधान करतो. त्यामुळे शरीराचे फार लाड पुरवू नयेत. कारण आत्मा महत्त्वाचा, शरीर हे केवळ एक माध्यम’, असेही टिळक सांगतात.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बहुआयामी व्यक्तिमत्त्व, राजकीय धुरीण. ‘ही खरं तर जबाबदारी सरकारची आहे, पण देश आपला आहे.’ हे त्यांचं वाक्य आज तर जास्तीत जास्त अमलात आणायला हवं. अर्थात, लोकमान्य टिळक यांनी स्वतःला देवापेक्षा सामर्थ्यवान कधीही भासू दिलं नाही. एखादी गोष्ट तर्क संगत नसेल तर ती कुणीही सांगितलेली असू द्या, कधीही टिळकांनी स्वीकारली नाही. सतत पुढच्या काळात आता केलेल्या कृतीचे काय परिणाम होऊ शकतील हे पडताळून पाहिलं आणि मगच त्या गोष्टी केल्या. धर्मकारण, राजकारण एकत्र करत असतानाही त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही त्याचा वापर केला नाही. आज खूप गोष्टी टिळकांकडून शिकण्यासारख्या आहेत, सर्वसामान्य माणसांनी आणि राजकारण्यांनीसुद्धा. देशापेक्षा कुणीही महत्त्वाचा नाही. ‘देशकार्य म्हणजेच देवकार्य’ यावरून आपण आत्मपरीक्षण करायला हवे.

(लेखक ‘लोकमान्य एक युगपुरुष’ या चित्रपटाचे पटकथा लेखक आहेत.)

– [email protected]