ठसा – डॉ. शशिकांत अहंकारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय मिरजकर

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील डॉ. शशिकांत अहंकारी यांचे गेल्या आठवडय़ात निधन झाले. मराठवाडय़ाच्या प्रामुख्याने ग्रामीण भागात त्यांची ओळख ‘आरोग्यदूत’ अशीच होती. अर्थात, ते विविध क्षेत्रांत कार्यरत हेते. शिक्षणानंतर त्यांनी जाणीवपूर्वक आपले कार्यक्षेत्र ग्रामीण मराठवाडा निवडले. शैक्षणिक जीवनात छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना 1972 च्या दलित विद्यार्थी शिष्यवृत्ती आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. पॅण्टीनमधील पदार्थांच्या भाववाढीविरुद्ध विद्यार्थ्यांसह तेही रस्त्यावर उतरले. युवक क्रांती दलात असताना त्यांनी 1974 च्या विकास आंदोलनात सहभाग घेतला. बाबा आमटे आणि आनंदवन हे त्यांचे जिव्हाळय़ाचे विषय होते. त्यांनी आनंदवन मित्रमंडळही काढले होते. हॅलो मेडिकल फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या मासिक पाळीतील समस्या, सॅनिटरी पॅडचा वापर यासंदर्भात जनजागृती, कोरोना काळात दर्जेदार मास्क निर्मिती असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. त्यांना प्रत्येक कार्यात भक्कम साथ मिळाली ती त्यांची पत्नी राणी यांची. 1993 च्या भूपंपानंतर ऑक्सफॅम (इंडिया) यांच्या आर्थिक सहकार्यातून त्यांनी भारत वैद्य प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. या केंद्रातून आतापर्यंत 300 भारत वैद्य कार्यकर्ते प्रशिक्षित झाले आहेत. बाल आरोग्य प्रकल्प सेवा संस्थेच्या माध्यमातून UNFPAच्या आर्थिक सहकार्यातून 1998 ते 2001 या कालावधीत 12 गावांमधून सेवा प्रकल्प राबविण्यात आला. 1999 ते 2004 या कालावधीत CIDA या संस्थेच्या मदतीने व पुणे येथील बायफ संस्थेच्या सहकार्याने 25 गावांतून स्वयंसिद्धी प्रकल्प राबविण्यात आला. यामध्ये महिला व मुलींचे आरोग्य सुधारणे, लिंगभाव समानतेची भावना रुजवून महिलांचे सबलीकरण करण्याचा प्रयत्न झाला. युनिसेफच्या सहाय्याने, गाव सहभागाने सूक्ष्म नियोजन हा उपक्रम राबविला. शासन आणि गाव यांच्यात समन्वय साधत गावातील समस्या गावातील लोकांच्या सहभागाने सोडविण्याचा प्रयोग या माध्यमातून करण्यात आला. लोहारा तालुक्यातील 42 गावांमधून व तुळजापूर तालुक्यातील 30 गावांतून ही योजना राबवली गेली. युनिसेफ, महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने 2005 मध्ये ‘हॅलो’तर्फे त्यांनी अणदूर येथे नवजात शिशू व बालकांतील आजारावरील एकात्मिक उपचार प्रशिक्षण पेंद्र सुरू केले. अत्याचारग्रस्त महिलांसाठी काम करणाऱया दिल्लीची फोर्ड फाऊंडेशनच्या सहकार्याने अत्याचारित महिलेस मानसिक आधार देणे, त्यांचे कौटुंबिक प्रश्न सोडविण्याचे काम केले. तुळजापूर व लोहारा तालुक्यातील 50 गावांत सावली केंद्रामार्फत महिलांचे समुपदेशन आणि सक्षमीकरण केले जाते. महिलांना उपजीविकेच्या साधनांची माहिती देऊन त्यांना स्वतःच्या पायांवर उभे केले जाते. महिला मदत पेंद्रामार्फत पंचायत राजमध्ये महिलांचा सहभाग वाढवून लिंगभाव समानतेची भावना रुजविण्याचे कार्य करण्यात आले. त्यासाठी DFID चे आर्थिक सहकार्य लाभले.

कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाचे कार्य करण्यात आले. कळंब, लोहारा, तुळजापूर, उमरगा या पाच तालुक्यांतील एकूण 903 विधवा महिलांपैकी 50 वर्षांच्या आतील एकूण 367 महिलांची माहिती संकलित करून अतिगरीब व गरजू 200 विधवा महिलांना स्वयंरोजगार/लघुउद्योगासाठी प्रशिक्षण व आर्थिक मदत करण्यात आली. 903 कोरोना विधवा महिलांच्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी व मानसिक आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत सेवा देण्यात आली. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले. जानकी रुग्णालयाच्या माध्यमातून महागडय़ा आरोग्य सेवेला व आरोग्य क्षेत्रातील बाजारीकरणाला पर्याय उभा केला. ग्रामीण भागातील रुग्णांची गरज ओळखून अल्प दरात सर्व सोयीसुविधांसह आरोग्य सेवा देण्यात येते. शासकीय सेवेअंतर्गत मिळणाऱया सर्व सोयीसुविधांची अंमलबजावणी या रुग्णालयात होते. डॉ. शशिकांत अहंकारी यांना शासनाच्या वतीने विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

[email protected]