आपला माणूस – ध्यास इतिहासाचा

261

>> माधव डोळे

इतिहासाबद्दलचे कोणतेही ऍकॅडमीक शिक्षण न घेता केवळ जिज्ञासा, कष्ट करण्याची तयारी, भटकंती आणि शिस्त या जोरावर इतिहासतज्ञ सदाशिव टेटविलकर यांनी ठाण्यासह कोकणच्या इतिहासाचा अभ्यास करण्याचा ध्यास घेतला. ठाण्याच्या बी.जे. हायस्कूलमध्ये अकरावीपर्यंत शिक्षण घेतले. घरची परिस्थिती बेताची. संसाराचा गाडा हाकण्यासाठी अनेक लहानमोठय़ा नोकऱया केल्या, पण इतिहासाच्या अभ्यासाचा छंद सोडला नाही. गड-किल्ले फिरत असताना टेटविलकर यांची गो.नी. ऊर्फ अप्पासाहेब दांडेकर यांची भेट झाली आणि त्यांचे आयुष्यच बदलले. एवढेच नव्हे तर इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. गड-किल्ल्यांचा अभ्यास ‘सजगतेने’ कसा करायचा याचे धडेच अप्पासाहेबांनी त्यांना दिले. 1981 मध्ये टेटविलकर यांनी त्र्यंबकेश्वर ते रत्नागिरी अशी अकराशे किलोमीटरची सह्याद्री परिक्रमा केली. झाडे, झुडपे तुडवत, दऱया, डोंगर पार करत त्यांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. 27 दिवसांत त्यांनी कोकणातील 20 किल्ले सर केले. या अनोख्या अनुभवाचे लेखन त्यांनी आपल्या डायरीतून केले. प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची नोंद त्यात केली. डायरी लेखन हा त्यांचा लहानपणापासूनचा छंद. त्यांनी समविचारी तरुणांच्या मदतीने ठाण्यात भ्रमंती मंडळाचीदेखील स्थापना केली.

ठाण्यातील ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉ. दाऊद दळवी यांचे भाषण 1996 साली सदाशिव टेटविलकर यांनी प्रथम ऐकले आणि ते त्यांच्या प्रेमात पडले. दाऊद दळवी आणि टेटविलकर यांची मैत्री गाढ होती. गड-किल्ले कसे बघावेत, त्याचे पैलू कोणते, इतिहासाशी संबंधित कागदपत्रांचा अभ्यास कसा करायचा याची शिकवण दळवी यांनी दिली. इतिहासाचा अभ्यास करताना इतिहासाशी संबंधित असलेली साधनेदेखील अतिशय महत्त्वाची असतात. त्यात जुनी मराठी भाषा वाचावी लागते, त्याचा अर्थ काढावा लागतो. टेटविलकर यांनी ब्राह्मी तसेच पाली भाषेचादेखील अभ्यास केला. त्यामुळे त्यांना इंग्रज, पेशवे व शिवकालातील दुर्मिळ पत्रांचे वाचन करता आले. त्याचा उपयोग अभ्यासासाठी झाला. टेटविलकर यांची दुर्गयात्री, दुर्गसंपदा ठाण्याची, ठाणे किल्ला, विखुरल्या इतिहासखुणा, गड-किल्ल्यांच्या जावे गावा, दुर्गलेणी- दीव-दमण-गोवा, महाराष्ट्रातील विरगळ, ठाणे इतिहासापासून भविष्यापर्यंत, राजधानी रायगड, तुमचे आमचे ठाणे अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. ठाणे शहराचा बारकाईने अभ्यास करत असतानाच त्यांनी ठिकठिकाणी सापडलेल्या दुर्मिळ मूर्ती तसेच शिलालेखांचेही अवलोकन केले. कोकणात अनेक ठिकाणी अतिशय जुन्या मूर्ती सापडल्या. या मूर्तींचे वयोमान काढणे हे जिकिरीचे काम असते, पण टेटविलकर यांनी सखोल अभ्यास करून अनेक दुर्मिळ मूर्ती तसेच शिलालेखांवर प्रकाशझोत टाकला. विशेषतः ऐतिहासिक विरगळ हा त्यांचा अभ्यासाचा खास विषय. ठाणे जिह्यात व परिसरात त्यांना दहा ते बारा अतिशय दुर्मिळ मूर्ती सापडल्या आहेत. त्यात सदाशिव व महंताच्या मूर्तींचाही समावेश आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे यातील पाच मूर्ती गायब झाल्याची खंत ते अनेकदा व्यक्त करतात. इतिहासाचा अभ्यास, गड-किल्ल्यांची भ्रमंती. लेखन तसेच याविषयीची व्याख्याने देत असतानाच टेटविलकर यांनी तरुणांमध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी यासाठी डॉ. दाऊद दळवी व अन्य सहकाऱयांच्या मदतीने 2 ऑक्टोबर 2010 रोजी कोकण इतिहास परिषदेची स्थापना केली. आतापर्यंत रत्नागिरी, ठाणे, गोवा, पनवेल, शहापूर, सिंधुदुर्ग, महाड, कल्याण येथे या परिषदेची संमेलने झाली आहेत. या माध्यमातून अनेक नवे इतिहासाचे अभ्यासक तयार झाले. विद्यार्थ्यांना ही परिषद म्हणजे एक मेजवानीच असते. सदाशिव टेटविलकर यांचे ठाणे शहराशी अतुट नाते असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ठाणे हे तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. येथील प्राचीन वास्तू, गडकिल्ले, आदिवासी समाज, ग्रामदेवता, पोस्ट खाते, मंदिरे, नाटय़गृहे याचा त्यांनी जवळून अभ्यास केला. अनेक वर्तमानपत्रांमध्ये व मासिकांमध्ये त्यावर लेख लिहिले. ठाणे हे किमान अडीच हजार वर्षांपूर्वी वसले असावे असा त्यांचा अंदाज आहे. ठाण्याला लाभलेली निसर्गरम्य खाडी, खारफुटी, दुर्मिळ झाडी या सर्व गोष्टींचे जतन व्हायला हवे, असा त्यांचा नेहमी आग्रह असतो. राजा शिलाहार कपर्दीन याने आपला कारभार येथूनच सुरू केला. शिलाहाराने शेवटच्या सोमेश्वर राजापर्यंत म्हणजे 1265 पर्यंत एकूण 450 वर्ष राज्य केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, पोर्तुगीज यांचीही राजवट या शहराने अनुभवली. या प्रत्येक राजवटीच्या काळात ठाणे शहराची सांस्कृतिक, भौगोलिक जडणघडण झाली. या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारे ‘तुमचे आमचे ठाणे’ हे टेटविलकर यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरले आहे. ठाण्यातील गड-किल्ले, जुने वाडे, मूर्ती, कागदपत्रे, दुर्मिळ वस्तू याचे जतन व्हावे व हा अमूल्य ठेवा तरुण पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी स्वतंत्र कलादालन निर्माण करण्याचे प्रयत्न टेटविलकर हे गेली अनेक वर्षे करीत आहेत. मात्र या त्यांच्या प्रयत्नांना म्हणावी तितकी साथ कुणी दिलेली नाही. कलादालनाचे स्वप्न साकार करणे ही केवळ त्यांची जबाबदारी नसून समस्त ठाणेकरांची जबाबदारी आहे. टेटविलकरांच्या या इतिहासवेडय़ा ध्यासाला प्रतिसाद देणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो. नी. दांडेकर, ग. ह. खरे अशी महाराष्ट्रात इतिहासतज्ञांची फार मोठी परंपरा आहे. याच परंपरेतील एक पाईक आहेत सदाशिव टेटविलकर. ठाणे शहराचा चालताबोलता इतिहास म्हणून त्यांच्याकडे आदराने बघितले जाते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या