कवडसे – तुझ्या मनाचे लहरी ऋतू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेंद्र पाटील

तुझं मन माझ्या मनाला
खूप काही देऊन जायचं
कधीतरी जाता जाता
दिलेलं सर्व घेऊन जायचं
असं तुझ्या मनाचं हे देणं आणि घेणं
नेहमीच होत्याचं नव्हतं करून जायचं

तुलाही कळत होती माझ्या मनातील हुरहूर आणि अंतरीच्या वेदना, पण तुझ्याकडे वेळच नसायचा मागे वळून पाहायला. आणि तू कधीतरी वळून पाहशील या आशेवर मी निरंतर तुझी वाट पाहत बसायचो. ऋतू यायचे, बदलून जायचे. तू कधी पाहायचीस, कधी नाही. तुझं हे वागणं माझ्यासकट सगळय़ांना अचंबित करून जायचं. मी त्या वळवाच्या पावसाला म्हणायचो, तुझ्यासारखीच आहे ही. येते कधीतरी आणि हूल देऊन निघून जाते. जसं तू अचानकपणे येतो आणि बरसणार असं वाटत असताना अलगद निघून जातोस…

बहुदा तुझी सवय तिला लागली असावी, पण तुला दोष देऊन काय फायदा म्हणा, कारण निसर्गातील सगळय़ा येणाऱया ऋतूंचा लहरीपणा तिच्यात होता… कारण कधी कधी तिच्या कठोर शब्दांनी मन घायाळ व्हायचं आणि माझ्या कोवळय़ा मनातील सुंदर असे क्षण कोमेजून जायचे, हिरमुसले व्हायचे तेव्हा जाणीव व्हायची की शिशिराची पानगळ सूर झाली असावी आणि तोच गुण तुझ्यात आला आणि तुझ्या शब्दांनी माझ्या मनातील आठवणींची सुंदर पाने गळू लागली, पण असं वाटत असतानाच पुन्हा एखादी पहाट अशी यायची की, जणू काही झालंच नाही असं तू बोलून जायचीस आणि तूच दिलेल्या एक एक जखमांवर तूच फुंकर घालून जायचीस मग पुन्हा काही दिवस खूप छान जायचे माझं मन मला सांगायचे जरी आता चैत्राची पालवी फुटली असेल तरी पुढे वैशाख आणि ग्रीष्मसुद्धा येतात आणि पुन्हा माझ्या मनात एक अनामिक हुरहूर असायची आणि पुन्हा तुझ्या काही विसंगत वागण्यामुळे वैशाख वणवा यावा तसं आयुष्य होऊन जायचं आणि होत्या नव्हत्या तितक्या गोड आठवणी ग्रीष्मात होरपळून निघायच्या.

असं मनातल्या मनात मी सतत या ऋतुगणिक बदलणाऱया तुझ्या स्वभावाला खूप पंटाळायचो आणि आता पुन्हा कशातच गुंतायचे नाही असं मनाशी पक्पं ठरवायचो आणि मीसुद्धा थोडंफार का होईना, पण कठोर होण्याचा प्रयत्न करायचो. यात काही दिवस निघून जायचे. तू निःशब्द आणि माझ्या मनात अनेक शब्दांचं तांडव. तरीसुद्धा आपल्यात काहीच संवाद व्हायचा नाही. कधी कधी वाटायचा तुझ्या माझ्यातील हा अबोलासुद्धा खूप काही बोलून जातो आणि न बोलतासुद्धा मनातील काही गुज खोलून जातो. कारण त्या अबोल्यानंतर अचानकपणे तू कधीतरी स्वतः समोरून बोलायला यायचीस आणि मला वाटायचं आता तू आलीस, कधी निघून जाशील, पण असं न होता तू बोलत जायचीस आणि आपण बोलता बोलता खूप दूर दूर निघून जायचो. तुझ्या शब्दांची बरसात माझ्या मनावर व्हायची आणि तेव्हा मला तुझे शब्द आषाढाच्या धारा वाटायचे आणि मी त्यांना माझ्या मनावर झेलून घेत नखशिखांत भिजून जायचो. तुझं बरसणं थांबलं की मग श्रावण यायचा आणि पुन्हा कधी ऊन कधी पाऊस असे अधे-मध्ये तुझे कोवळे भास देऊन जायचा. तेव्हा ती कधी श्रावण सर व्हायचीस तर कधी इंद्रधनूच्या रंगात मिसळून जायचीस. असे तुझ्या मनाचे अनेक रंग मी माझ्या डोळय़ांनी स्तब्धपणे पाहत राहायचो. कारण दुसरा काहीच पर्याय नव्हता माझ्यासमोर. तू माझ्या आयुष्यात अशी होतीस की, तुला न कधी बांधून ठेवता आलं ना कधी तुला दूर करता येईल.

अशा वेळी मनाचे काय करायचं असतं जेव्हा आपल्या मनाला कोणताही निर्णय घायची सोय नसते तेव्हा ते बिचारं शांतपणे तुझ्या मनाच्या लहरीपणाच्या लाटांचे तडाखे खात जगत होतं. त्याला असं जगताना पाहून तुला काहीच वाटायचं नाही याचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं. कधी कधी वाटायचं तुला मन आहे की नाही? आणि असलं तर त्यात काही भावना आहेत की नाही? आणि भावना असल्या तर त्यांना काही जाणीव आहे की नाही? आणि जाणीव असली तर ती मनमोकळेपणे तू व्यक्त का करत नाहीस? असे असंख्य प्रश्न तू मागे सोडून जायचीस. परवासुद्धा तू असंच केलं. छान सुंदर गुलाबी थंडीचा ऋतू आला की आपण भेटूया असं म्हणालीस आणि खूप सारी सुंदर स्वप्न मनात तरळू लागली आणि त्या स्वप्नांच्या सुंदर दुनियेत माझं मन केव्हाच निघून गेलं, पण तुझा लहरीपणा पुन्हा एकदा माझ्या मनाला कुठच्या कुठे घेऊन गेला.

तुझ्या मनाशी माझ्या मनाला बोलायचं असलं की तुला वेळ आणि तुला वेळ असतो तेव्हा तू तो माझ्या मनाला देत नाही. मग त्यातून निर्माण होणारी घुसमट, काsंडमारा कधीतरी शब्दातून कठोरपणे वक्त होतो आणि तू म्हणतेस तुझ्या या कठोरपणामुळे मी तुला टाळत होते, पण एक सांगू, हे सगळं तू सहजपणे बोलून जातेस, पण त्यामुळे माझ्या मनावर होणारे घाव कित्येक दिवस भरत नाही आणि त्या वेदना घेऊन जगत असतो मी आणि तू ज्या गोष्टी टाळत होतीस त्याला टाळणं म्हणत नाही. त्याला झुलवत राहणं म्हणतात. एका मनाचं दुसऱया मनाला झुलवत राहणं आणि तू तेच करत आलीस आजवर आणि तुझ्या आताच्या या वाक्याने माझ्या मनाला आता तुझ्या मनाचे हे लहरी ऋतू यापुढे माझं मन सहन करणार नाही. कारण सहनशीलतेचा अंत पाहून झाला, आता तुझ्या मनाच्या लहरी ऋतूंना फक्त एक निरोप दे

आता माझ्या मनाला नको तुझे हळवे क्षण
अन् नको तुझ्या भावना, नको तुझ्या आठवणी
नको त्या यातना, नको तुझ्या श्रावण सरी
नको त्या आषाढ धारा, नको दे दुखः
आता द्यायचे काही असेल तर शाश्वती दे
एका अतुट अशा नात्याची

– [email protected]