कवडसे – काही हरवलेली स्वप्नं…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> महेंद्र पाटील

आजची सकाळ नेहमीपेक्षा वेगळी आणि अबोल होती. रोजच्या सूर्यकिरणांनी पहाटेची सुरुवात व्हायची तशीच ती झाली, पण ते सोनेरी किरणं, तो पहाटवारा, ते कोवळं धुपं, सगळं काही आज नेहमीसारखं वाटत नव्हतं का कुणास ठाऊक? अशी मनाची नेहमीच हतबल अवस्था मी आजही अनुभवत होतो. त्याचवेळी जुनी गोड आठवणीतील पहाट आठवत होतो. विचार करत होतो आपली पहाट गोड केव्हा होते? कशी होते? त्यामागे काय कारण असतं? असे बरेच प्रश्न मनाला पडून गेले. इतक्यात जुन्या आठवणींच्या गर्दीतून एक गोड पहाट माझ्या डोळय़ासमोर येऊन उभी राहिली. त्या पहाटेला कधीच विसरू शकणार नाही अशी ती पहाट गोड, नेहमीपेक्षा वेगळी, धूसर धुक्यातील पहाट आज मला नवीन स्वप्नं घेऊन जगायला शिकवत होती. नव्या आशा, नव्या दिशा, सगळं काही त्या पहाटेने दिलं मला आणि मी विचार करू लागलो. काही दिवस असे येतात आणि आपल्याला नवी स्वप्नं देऊन जातात. ती स्वप्नं पूर्ण होतील की नाही हे तेव्हा कळत नसलं तरी मनाला त्या क्षणांचा आनंद मात्र सुखावून जातो.

दिवसाची सुरुवात होते आणि दिवसामागून दिवस निघून जातात. आपल्याला ओढ लागते आपण पहाटे पाहिलेल्या स्वप्नांची आणि मन दाही दिशांत ठाव घेत राहतं. त्या दिवशी पहाटे मनाला खूप आनंद झाला आणि तो आनंद काही दिवस टिकला. कारण खूप दिवस उलटून गेले तरी ती स्वप्नं काही पूर्ण झाली नाहीत. म्हणून काल माझं मन त्या स्वप्नांचं शोध घेत दूर दूर चालू लागलं. खूप दूर अशा स्वप्नांच्या गावी येऊन पोहचलं. तिथे स्वप्नांचा शोध घेऊ लागलं. काही स्वप्नं सापडली, पण त्यांना घरी घेऊन जायचं ठरवलं तरी त्या स्वप्नांनी यायला नकार दिला. त्यामुळे मन बेचैन झालं आणि विचार करू लागलं की, ही स्वप्नं माझ्यासोबत यायला तयार नाही? काही स्वप्नं वाटच पाहत उभी होती की केव्हा या वेडय़ा मनाचं लक्ष आपल्यावर जाईल आणि केव्हा आपण याच्यासोबत याच्या गावी जाऊ, पण नेमक्या त्याच स्वप्नांकडे मनाचं लक्ष गेलं नाही आणि ती स्वप्नं तशीच उपेक्षित राहिली. मन रिकाम्या हाताने घरी परतू लागलं. त्या गावातून जाता जाता संध्याकाळ झाली. संध्याकाळी मन परतीच्या वाटेवर असताना खूप उदास आणि सुनं सुनं वाटू लागलं. मन सारखं मागे वळून पाहत होतं. कारण त्याला वेडी आशा होती की, आपल्या मागोमाग एखादं तरी स्वप्नं धावत येईल आणि आपल्यासोबत प्रवास करेल, पण खूप दूर आल्यावर एकही स्वप्न त्याच्या मागोमाग आलं नाही. मनाने मागे वळून पाहिलं तेव्हा जुन्या भावनांचे बंध सैल झाले होते. चार पावलांचं अंतर आता मैल झालं होतं.

प्रवासात रात्र सरून गेली आणि हवलेल्या स्वप्नांचं दुःख मनात असताना पहाट झाली. त्यामुळे नेहमीच गोड वाटणारी पहाट आज अचानक उदास वाटू लागली. किती गंमत असते ना आयुष्यात! खरं तर स्वप्नं म्हणजे मृगजळ. कधी हाती लागेल सांगता येत नाही, पण अशक्य ते शक्य करायचं असा मनाचा नेहमीच हट्ट असतो. त्यामुळे एक पहाट जी गोड स्वप्नं दाखवून गेली त्या स्वप्नांचा शोध घेत मन स्वप्नांच्या गावी जाऊन पोहोचतं, तरीसुद्धा रिकाम्या हाताने घरी परततं. काय कारण असेल याचा विचार करत बसतं आणि त्यामुळे ती पहाट उदासीन वाटू लागते. कारण सर्व काही असून नसल्यासारखं असतं. जी स्वप्नं आपल्याला हवी असतात तीच आपल्यासोबत नसतात. आपण ज्या स्वप्नांना मागे सोडून आलो तीसुद्धा आता नाराज झालेली असतात. त्यामुळे कोणत्या स्वप्नांमागे धावत जायचं आणि कुठे थांबायचं हे आपणच ठरवलं पाहिजे. कारण स्वप्नं आपल्याला त्यांच्या मनाप्रमाणे खेळवत राहतात आणि आपण खेळत राहतो जन्मभर. कधी कधी एकच स्वप्नं दोघांचं असतं आणि दोघांच्याही पदरी निराशा येते, तर कधी हरवलेल्या स्वप्नांचा शोध घेताना आपण स्वतःची ओळख हरवून बसतो.

स्वप्नं आणि सत्यामधलं अंतर किती दूर आणि किती जवळ असेल हे कोणीच सांगू शकत नाही, पण आपणच ठरवायचं असतं आपलं ठिकाण आणि प्रवास करायचा हळूहळू का होईना, पण एक दिवस स्वप्नांच्या गावी जाताना एक वेळ अशी येते जिथे आपल्याला वाटतं की यासाठी केला होता अट्टहास? आपलं मन तिथे थांबतं, पण तिथे कधीच रमत नाही. कारण पुन्हा एक पहाट येते आणि नवी स्वप्नं देऊन जाते. पुन्हा एकदा मन वेडंपिसं होतं. दूर दूर चालत जाऊन एकच गाणं गातं,
दूर तू जाताना हातात हात घ्यायचा राहून गेला. लबाड अश्रू डोळय़ामधला तोवर मनात वाहून गेला.

 [email protected]