
>> महेंद्र पाटील
माझं मन गेली कित्येक वर्षं अतिशय शांत होतं, किंबहुना ते शांत आहे असं भासवत तरी होतं. माझंच मला. अनेक पावसाळे आले गेले, ऋतू येऊन गेले. पण तू आली नाहीस. हळूहळू तुझी वाट पाहायचं सोडून दिलं मनाने… मग एक दिवस शिशिरात पानगळ व्हावी तशा आठवणीसुद्धा एक-एक करून गळून पडत गेल्या. नवा ऋतू काय घेऊन येईल याची पुसटशी कल्पनासुद्धा मनाला नसताना अचानक तू पुन्हा समोर आलीस. अवचित येणाऱया वळवाच्या पावसासारखी. एकीकडे बुद्धीने मनातल्या भावनांचा पसारा मोठय़ा मुश्किलीने आवरायला घेतला होता. पण तू पुन्हा आलीस आणि मन सैरावैरा धावू लागलं. पांगलेल्या एक-एक आठवणी पुन्हा एकदा जोडण्याची मनाची वेडी धडपड सुरू झाली. तू समोर आलीस आणि मी निःशब्द झालो. एकीकडे वाट पाहून थकलेले डोळे पुन्हा स्वप्नांच्या गर्दीत हरवून गेले. यावेळी तू काय करशील? कोणती स्वप्नं निर्माण करशील? मनाला किती दूर घेऊन जाशील माझ्या? तुझ्या माझ्यातील जुने बंध पुन्हा कसे आठवशील? मनात किती गोष्टी सांगायच्या राहून गेल्या असतील त्या सांगशील का? माझ्या मनातल्या भावनांचा बांध तुटून पुन्हा त्या आठवणींच्या पुरात आपण वाहून तर जाणार नाही ना, ही भीती वाटू लागली. अनेक प्रश्नांनी मन बेचैन झालं आणि तुझ्या समोर आलं. पण तू खूप वेगळी वाटलीस मला या क्षणी. तुला पुन्हा भेटल्यावर, तुझ्या सोबत बोलल्यावर, तुझ्या सोबत समुद्रकिनारी चार पावलं चालल्याचे, तुझ्या सोबत पावसाळे काढल्याचे… खूप गोष्टी मनाला बेचैन करून गेल्या. एका क्षणाला असंही वाटलं की, तू पुन्हा जशी आधी होतीस तशीच होऊन येशील का? तीच कविता मी ऐकवीन तुला आणि तिथेच वाट पाहीन तुझी. ज्या वळणावर तू मला एकाकी, एकटा सोडून गेली होतीस.
नव्याने समोर आलीस… आणि बरसून गेलीस आषाढाच्या धारांसारखी. तुझं हे बरसणं म्हणजे आपल्या सगळ्या जुन्या भेटींच्या अबोल क्षणांचा हिशेब चुकतं करत होतं की काय, असं माझ्या वेडय़ा मनाला वाटू लागलं. क्षणभर. तुझ्यातला हा बदल सुखावणारा असला तरी माझ्या मनाला मात्र अस्वस्थ करणारा होता. कारण तुझ्या मनातल्या शब्दांची बरसात थांबली तर, मन खिन्न होऊन जाईल. पुन्हा तुझे शब्द कानावर पडून मनापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत मन व्याकूळ होईल. तशा तुझ्या प्रत्येक गोष्टी व्याकूळ करून जायच्या माझ्या मनाला. तुझी आठवण, तुझे शब्द, तुझा अबोला अन् तुझी शांतता… जी मला ऐकायला खूप आवडायची.. शांततेत ऐकण्यासारखं काय असतं ते विचार कधी माझ्या मनाला. कारण तू समोर असतानाची शांतता आणि तू दूर असतानाची शांतता माझ्या मनाला तुझ्या मनातलं गुज सांगत राहायची अन् मग रात्र ते ऐकून एक हळुवार गाणं गायची. तुझ्या माझ्या खूप भेटी मनातल्या मनात राहिल्या होत्या. त्या सर्व भेटी म्हणे रात्रीने तिच्या स्वप्नात पाहिल्या होत्या. तिच्याही डोळ्यातून तेव्हा सरी वाहिल्या होत्या. तुला एक विचारू? तुझ्या मनाला कधी दिसल्या का गं आपल्या भेटीगाठी? तुला कधी भासला का माझ्या मिठीतला गोडवा?
तुझ्या उत्तरात आता असेल नीरव शांतता. रात्र पुन्हा ऐकू लागेल तुझी माझी प्रेमकथा. असं नसतं गं! इतकंही नसतं गं प्रेम वेडं! बघ कधी विचार करून. नाहीतर रात्र जाईल सरून. उगवतीचा सूर्य एक नवा प्रकाश जन्माला घेऊन येईल. सूर्याच्या सोनेरी किरणांनी रात्रीच्या मनातली सुंदर स्वप्नं हळूहळू वितळत जातील आणि थेंब होऊन ओघळतील माझ्याच पापण्यांतून. कदाचित तुझ्याही पापण्यातून. ‘कदाचित’ या शब्दाचा खूप राग यायचा ना गं तुला. पण आता तोच शब्द आपल्याला पुन्हा नव्याने जोडणारा दुवा ठरू पाहतोय. कदाचित तुला माझी आठवण येत असेल, कदाचित मला तुझी. कदाचित आपल्या जुन्या भेटीच्या वळणावर तू जाऊन शोधशील आपल्याच आठवणखुणा. कदाचित मलाही सापडेल तो हरवलेला जुना रस्ता. पण तू सापडशील का जशी आधी होती तशी! अल्लड, वेडी, अबोल. निःशब्द राहूनही वादळ निर्माण करणारी. वादळातून माझ्या मनाच्या कणाकणात उतरणारी. तुझी मी या वळणावर अशीच नेहमी वाट पाहीन. अट मात्र एकच आहे, तू पुन्हा आधी होती तशीच परतून ये. न बोलता खूप काही बोलणारी. आतासारखी नको बोलूनसुद्धा हरवून बसल्यासारखी. कारण तुझी ती शांतता, तुझा तो अबोला, घुमू दे जरा माझ्या मनात. आजन्म… चिरंतन… अश्वत्थाम्यासारखा…



























































