ठसा – डॉ. दिलीप डबीर

>> महेश उपदेव

राष्ट्रीय कीर्तनाची गुढी ज्यांनी उभारली आणि जगात दिगंत केली, ते राष्ट्रीय कीर्तनरत्न प्रा. डॉ दिलीप डबीर यांचा इहलोकीचा प्रवास नुकताच संपला. त्यांच्या निधनाने समृद्ध राष्ट्रीय कीर्तन परंपरेचा महत्त्वाचा दुवा निखळला आहे.

वैदर्भीय हरिकीर्तन संस्थेंतर्गत चालविण्यात येणाऱया कीर्तन महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते, महाविद्यालय स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, युवकांनी कीर्तनाकडे वळावे याकरिता ते नेहमी प्रयत्नशील राहिले. नागपूरकरांना कीर्तनाची गोडी लावली, एवढेच नाही तर त्यांचे कीर्तन असले की, युवा मंडळीही आवर्जून कीर्तनाला उपस्थित राहायची, कीर्तन महाविद्यालयातून चारशे ते पाचशे कीर्तनकार विद्यार्थी अख्ख्या महाराष्ट्रातून घडविले. कीर्तनासारखा कठीण प्रकार अगदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डबीर बुवांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मूळचे चंद्रपूरचे असलेले बुवा नागपुरात स्थायिक झाले. ‘वक्ता दशसहस्रेषु’ प्राचार्य राम शेवाळकर, माजी कुलगुरू पंकज चांदे, ज्येष्ठ नारदीय कीर्तनकार मोईनबुवा कुबेर यांची दिलीप बुवांना मोलाची साथ लाभली. नागपूरच्या कीर्तन महाविद्यालयातून पुणे, मुंबई, विदर्भातील अनेक कीर्तनकार विद्यार्थी त्यांनी घडविले. एवढेच नाही तर कीर्तन शास्त्र्ाामध्ये पदवी बीए, एमए हा अभ्यासक्रम त्यांनी स्वतः आखला. येथेच बुवा थांबले नाहीत, पुणे, मुंबई, संभाजीनगर आणि अकोला येथे महाविद्यालयाच्या शाखा सुरू केल्या. यासोबतच त्यांनी नारदीय कीर्तन प्रकार सादर करून अर्धशतक सेवा दिली. कीर्तनासाठी बुवांनी महाराष्ट्रासह अख्खा हिंदुस्थान पिंजून काढला. राज्य शासनाच्या शासकीय कीर्तन महोत्सवाचे ते अनेक वर्षांपासून मार्गदर्शक होते.

डबीर बुवा यांनी हिंदुस्थानी कीर्तन परंपरेला राष्ट्रीय कीर्तनाचा अध्याय जोडला. हा प्रयोग नवा होता. मात्र बुवांनी हट्टानं केला. मला लख्ख आठवतं, बाबासाहेब पुरंदरे एकदा बुवांच्या कीर्तनाकरिता उपस्थित होते. बुवांनी देशभक्तिपर आख्यान लावलं आणि वासुदेव बळवंत साक्षात उभे केले. शरीरभर रोमांच फुलले, राष्ट्रभक्तीचा गजर झाला. वडील असलेल्या बाबासाहेबांनी बुवांना घट्ट आलिंगन दिलं होतं. बाबासाहेबांचे नेत्र डबडबले होते. बाबासाहेब म्हणाले, हा राष्ट्रभक्तीचा स्फुल्लिंग नव्या कीर्तन प्रकारातून प्रवाहित झाला पाहिजे आणि हे ‘हरिभक्तपरायण’ काय लावतोस? आजपासून ‘राष्ट्रीय कीर्तनरत्न’ हीच उपाधी लावायची. बाबासाहेबांचा आदेश झाला आणि डबीर बुवांनी हा आदेश कायम मानला. राष्ट्रीय कीर्तनाचा प्रवाह अक्षुण्ण रहावा याकरिता बुवांनी केलेल्या अथक प्रयत्नांतून कीर्तन महाविद्यालय सुरू झालं, ते नावारूपाला आले. शेकडो ‘कीर्तनरत्न’ या महाविद्यालयाने घडवले. नवोदित, शिक्षित आणि उच्चविद्याविभूषित अशी मंडळी कीर्तनाचा करीअर म्हणून विचार करू लागली. भक्ती परंपरेतून राष्ट्रीय विषयांना वाहिलेली कीर्तन संहिता लिहिली जाऊन ती प्रस्तुत होऊ लागली. कीर्तनप्रेमींनीही या बदलाची नोंद घेतली आणि तिचा स्वीकार केला. यामागचं चिंतन, मनन आणि अध्ययन डबीर बुवांचं आहे. डबीर बुवांचं घराणं कीर्तन परंपरेतलं. त्यांचे वडीलही कीर्तनकार होते. संध्या वहिनी, मुलगा अनुभव आणि कन्या प्रचीती कीर्तन परंपरेचं भूषण आहेत. डबीर परिवाराचा श्वास कीर्तन आहे. विदर्भाच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या कीर्तन क्षेत्रातील अग्रगण्य कीर्तनकार म्हणून प्रा. डॉ. दिलीप डबीर यांचे नाव महाराष्ट्राला परिचित होते. नागपुरात सहकार नगर येथील गजानन मंदिरामागे राहणारे डबीर हे धरमपेठ महाविद्यालयातून मराठीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. ‘मराठीतील कीर्तनकार’ या विषयावर त्यांनी पीएच. डी. प्राप्त केली होती. डबीर कुटुंब हे मूळचे ब्रह्मपुरी येथील आहे. त्यांचे वडील चंद्रपूरच्या सहकारी बँकेत व्यवस्थापक असल्याने दिलीप डबीर यांचे शालेय शिक्षण चंद्रपूरला आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात झाले. आपल्या ओजस्वी वाणीतून कीर्तनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना जागरूक करणारे कीर्तनकार अशी त्यांची ख्याती होती. उत्कृष्ट कलावंत, मनमिळाऊ मित्र गमावल्याच्या संवेदना कला, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतील मंडळींकडून व्यक्त होत आहेत. राष्ट्रीय कीर्तन परंपरेतील ‘दिलीप बुवा डबीर’ नावाचं बिल्वपत्र पशिवलिंगावर कायमचं अर्पण झालं!