नागपूरची भरारी- तनुजा नाफडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>महेश उपदेव

हिंदुस्थानच्या लष्करात प्रथमच गैर लष्कराच्या व्यक्तीला मार्शल टय़ून बनवण्याचा मान मिळाला आणि ती व्यक्ती म्हणजे गायिका, संगीतकार तनुजा नाफडे. नागपुरात गायनाची कारकीर्द घडवणाऱया तनुजा यांच्या या कामाचा वेध घेणारा हा लेख.

इंग्रजांच्या काळापासून लष्करामध्ये मार्शल टय़ून ही सैन्य दलातील व्यक्ती बनवत होती. त्याच टय़ूनचा वापर आजपर्यंत सुरू होता. जगाच्या इतिहासात प्रथमच गैर लष्कराच्या व्यक्तीने मार्शल टय़ून तयार केली. तीच मार्शल टय़ून आता हिंदुस्थानच्या लष्करात वाजविण्यात येणार आहे. मार्शल टय़ून बनविण्याचा मान राज्याच्या उपराजधानीतील डॉ. तनुजा नाफडे यांना मिळाला आहे. डॉ. नाफडे यांच्या या आगळ्यावेगळ्या कामगिरीमुळे नागपूरच्या शिरपेचात नवा तुरा खोवला गेला आहे. डॉ. नाफडे यांनी तयार केलेली मार्शल टय़ून शंखनादाच्या स्वरूपात सैन्यदलात गुंजणार आहे.

नागपूरच्या संगीतकाराने तयार केलेली मार्शल टय़ून लष्कराने नुकतीच मान्य केली आहे. हिंदुस्थानच्या इतिहासात मराठी माणसाने आपला झेंडा कायम उंचच ठेवला आहे. या देशासाठी जे काही सर्वोत्तम करता येईल तेच करण्यासाठी मराठी माणसाचा कायम प्रयत्न राहिला आहे. आपल्या कर्तृत्वाने मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा झेंडा उंच फडकवणारी घटना नुकतीच घडली आहे. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता दिल्लीच्या जनरल माणेकशा सेंटर सभागृहात देशाचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी नागपूरच्या डॉ. तनुजा नाफडे यांना ताम्रपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. त्याआधी डॉ. तनुजा नाफडे यांनी संगीतबद्ध केलेल्या हिंदुस्थानी लष्कराच्या नव्या मार्शल टय़ूनचे लोकार्पण लष्करप्रमुखांच्या हस्ते करण्यात आले. यापूर्वी लष्कराची मार्शल टय़ून ही इंग्रजांनी बनवलेली होती. तसेच यापूर्वी लष्कराच्या विविध धून बनवण्याचे काम लष्करातील तज्ञ वाद्यवृंद वादक करायचे. यावेळी प्रथमच लष्कराने बाहेरच्या तज्ञ संगीतकाराची सेवा घेत ही मार्शल टय़ून तयार करून घेतली आहे.

लष्करासाठी ही मार्शल टय़ून संगीतबद्ध करणाऱया या डॉ. तनुजा नाफडे सध्या नागपूरच्या धरमपेठ महाविद्यालयात संगीत विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मूळच्या इंदूरच्या असलेल्या डॉ. तनुजा नाफडे यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण इंदूरमध्येच पूर्ण केले. त्यानंतर त्या पुढील शिक्षणासाठी मुंबईत आल्या. मुंबईत पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केले. लहानपणापासून संगीत साधना करणाऱया तनुजा नाफडेंनी डॉ. प्रभा अत्रे, शोभा गुर्टू अशा दिग्गज संगीत अभ्यासकांकडे संगीताचे धडे घेतले. इंदूरमध्ये अविकसित कळी असलेल्या तनुजा नाफडेंचे या काळात परिपूर्ण पुष्पात रूपांतर झाले. याच काळात त्या नागपूरच्या रवी नाफडेंशी विवाहबद्ध झाल्या. नागपूरला आल्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘भारतीय रागमाला’ या विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी मिळवली. याचदरम्यान त्या धरमपेठ महाविद्यालयात संगीत विभागात विभागप्रमुख म्हणून नोकरी करू लागल्या. त्या ठिकाणी त्यांनी पदव्युत्तर संगीत विभाग सुरू तर केलाच, पण अल्पावधीतच हा विभाग एका वेगळय़ाच उंचीवर नेऊन ठेवला. याच काळात त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये आपली वाटचाल सुरू केली. मैफली गाजवत असतानाच त्यांचा एक अल्बमही रिलीज झाला. तोही चांगलाच गाजला.

हिंदुस्थानी लष्कराच्या महार रेजिमेंटचा 2016 मध्ये अमृत महोत्सव होता. यावेळी महार रेजिमेंटचे विशेष गीत असावे अशी सूचना आली. त्यावेळी रेजिमेंटचे मेजर जनरल चंद्रशेखर ओक यांनी ब्रिगेडियर सोहेल यांना हे गीत तयार करण्यास सांगितले. हे गीत तयार झाल्यावर संगीत कोण देणार हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी आपल्या मित्राची पत्नी असलेल्या डॉ. तनुजा नाफडे यांना त्यांनी विचारले. डॉ. नाफडेंनी तत्काळ होकार दिला. त्यांनी हे गीत संगीतबद्ध करून रेजिमेंटच्या गायकांकडून गाऊन घेतले. अनेक वेळा सराव झाल्यावर 6 नोव्हेंबर 2016 रोजी रेजिमेंटच्या अमृत महोत्सवात हे गीत गायले गेले. या गीताची धून तत्कालीन लष्करप्रमुखांना इतकी आवडली की, त्यांनी या गीताची धून लष्कराची मार्शल टय़ून बनवावी असा प्रस्ताव मांडला. लष्कराच्या चाळण्यांमधून गेल्यावर हा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर डॉ. नाफडे यांनी लष्कराच्या वाद्यवृंदातील वादकांना ही धून वाजवायला शिकवणे हे एक आव्हान होते. कारण हे वादक पाश्चात्य वाद्यांवर पाश्चात्त्य संगीत वाजवायला शिकलेले होते. त्यांना हिंदुस्थानी शास्त्र्ााrय संगीताच्या मिररमध्ये रचलेली धून वाजवायला शिकवणे आणि त्याच वेळी या टय़ूनमधील जोश आणि चैतन्य कायम ठेवायचे होते. मात्र डॉ. नाफडेंनी हे शिवधनुष्य पेलले. ही मार्शल टय़ून तयार झाली, त्याचे ध्वनिमुद्रण झाले आणि त्याचे लोकार्पणही झाले.

आपल्याला अपघाताने मिळालेली ही संधी एक परमेश्वरी योजना होती असे मत डॉ. तनुजा नाफडे व्यक्त करतात. मात्र त्याचवेळी त्यांची संगीत साधना आणि ही धून तयार करताना त्यांनी घेतलेली मेहनत दुर्लक्षिता येत नाही. यानंतर देशातील प्रमुख लष्करी कार्यक्रमांमध्ये आता ही मार्शल टय़ून वर्षानुवर्षे वाजवली जाईल त्यावेळी समस्त देशवासीयांना ही आठवण येईल की, या टय़ूनची निर्मिती नागपूरच्या एका नागपूरकर मराठी कलावंताने केलेली आहे.

summary- article by mahesh updeo on tanuja naphade